Top Post Ad

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी मोफत शाडू माती, मूर्तिकारांना विनामूल्य मंडप जागा, प्रायोगिक तत्वावर रंगांचे मोफत वाटप

मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. प्रत्येक परिमंडळात १०० टनासोबत आवश्यक तेवढी शाडू माती मूर्तिकारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ९१० टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आली आहे.  यासोबतच पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या एकूण ९९३ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप परवानगी देण्यात आली आहे. ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.mcgm.gov.in) ‘नागरिकांकरीता’ या रकान्यामध्ये ‘अर्ज करा’ या रकान्यात ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/इतर उत्सव)’ या सदरामध्ये मागणी नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक  प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.  

सन २०२४ मध्ये २०० पेक्षा अधिक मूर्तिकारांना मिळून ५०० टन इतकी माती मोफत देण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी एप्रिल २०२५ पासूनच पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांनी मोठ्या प्रमाणात शाडू मातीची मागणी केली अणि महानगरपालिकेने त्यांची मागणी पूर्ण केली आहे, हे उल्लेखनीय आहे. श्रीगणेशोत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही देखील सुरू केली आहे. प्रशासनाकडून निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक उत्सवासाठी सर्व बाबींचा अवलंब केला जात आहे. यावर्षी दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत ९१० टन २३५ किलो इतकी शाडू माती मोफत वाटप करण्यात आली आहे. सर्वाधिक शाडू मातीचे वितरण हे ‘के पूर्व’ विभागात झाले असून, या विभागात ९६ टन ६१५ किलो इतकी शाडू माती वाटप झाली. त्यापाठोपाठ ‘जी उत्तर’ विभागात ९१ टन २० किलो, ‘पी उत्तर’ विभागात ८२ टन ४५५ किलो, ‘डी’ विभागात ७४ टन २०० किलो; तर ‘एफ दक्षिण’ विभागात ७२ टन ६०० किलो शाडू माती वाटप करण्यात आली. 

पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया मूर्तिकारांसाठी महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास प्राधान्य’ या तत्वावर आवश्यक ती जागा देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.  पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया ९९३ मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागाही मोफत देण्यात आली आहे. यामध्ये आर दक्षिण विभागातून १३९ मूर्तिकारांना त्यापाठोपाठ के पश्चिम विभागात ९० मूर्तिकारांना तसेच पी उत्तर विभागात ७४, पी दक्षिण विभागात ७२ मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे. एकूण सहा पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे. यात ७ हजार ८०० लीटर रंग आणि ३ हजार लीटर इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी या रंगांचा वापर करून श्रीगणरायाच्या मूती्र रंगवाव्यात. जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल. श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून सेवा-सुविधा करण्याची कार्यवाही केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत.  मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापणा व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच ९९७ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपासाठी जागाही देण्यात आली. 

मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग विशेषतः रासायनिक रंग हे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. या शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने मूर्तिकारांना आवाहन केले आहे की, शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा आणि जलाशयांचे प्रदूषण टाळावे. याच अनुषंगाने महानगरपालिका प्रशासन आता मूर्तिकारांना मूर्ती रंगविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक रंगही देणार आहे. यामध्ये पांढरा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल असे सहा पर्यावरणपूरक रंग महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये इतर रंगांच्या तुलनेत पांढरा रंग मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक पांढरा प्रायमरही देण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी आपापल्या परिसरातील प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. मूर्तिकारांनी या पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सवाला हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. 

गणाचा मुख्य तो गणाधीश...




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com