छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर पार पडला होता. त्यामुळे हा दिवस त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने साजरा होत असतो. एवढेच नव्हे तर या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात प्रत्येकाचे मस्तक हे शिवरायांप्रती नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. कारण शिवराज्याभिषेक दिनी डोळ्यासमोर येतात ते त्यांचे कष्ट, त्याग, समर्पण आणि संघर्ष. त्यांना लाभलेल्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. स्वतःचे शीर तळहातावर घेऊन, घरावर तुळशीपत्र ठेवून, स्वतःच्या पत्नीचे सौभाग्य पणास लावून, जीवाभावाचे कित्येक बालसवंगडी गमावून, जीवाची परवा न करता, मृत्यूला न घाबरता रक्ताच पाणी करून, समोर अफाट शक्तीच्या प्रचंड ताकतिच्या श्याह्यांचे साम्राज्य उभे ठाकलेले असताना स्वराज्य निर्माण करणे हे जगातील श्चर्यच म्हणावे लागेल. त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे देव, धर्म, जात, पोटजात, गट-तट या पलिकडील असून शोषकांविरुद्ध, शोषितांचे, दुर्बलांचे , अबलांचे, शेतकरी तथा सामान्य जनता किंवा रयतेचे होते.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक सत्य जाणून घेताना, आमच्या हे लक्षात येते, की आम्हाला प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास राज्यभिषेकासह शिकवला जातो. परंतु त्यामध्ये राज्याभिषेकाला कोणी व का विरोध केला? त्यांचे पुरोहित्य करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र सोडून वाराणसीहून गागाभट्टांना का बोलवावे लागले? त्यांनी दुसरा राज्याभिषेक का केला? राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? राज्याभिषेक विरोधाचा विपरीत परिणाम राजमाता जिजाऊंच्या प्रकृतीवर कसा झाला? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासाने दडवून ठेवली होती आणि आमच्याही सद्विवेकाला त्याबद्दल कधी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस झाले नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या काही कट्टर तथा सच्च्या अनुयायांनी त्यांच्या समकालीन साहित्याच्या मुळाशी जाऊन सत्यशोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं त्यामुळे इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली.
शिवाजी महाराजांनी १६६८ पासूनच रायगडची राजधानी म्हणून निवड केली होती. त्या गडाच्या सभोवती नैसर्गिक तटबंदी असल्यामुळे महाराजांनी स्वतः त्याचे बांधकाम करून घेतले होते, तो अतिशय भक्कम व सुरक्षित गड होता. त्याच गडावर आपला राज्याभिषेक सोहळा होऊन आपण अनभिषिक्त राजे व्हावे अशी मनीषा व्यक्त करताच , शूद्रांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही ,असे म्हणत दरबारातील अधिकारी तथा नोकरांसह महाराष्ट्रातील तमाम भट पुरोहितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकून, राज्याभिषेकास नकार दिला. त्यानंतर दरबारातील केशवभट सोमनाथभट आणि भालचंद्रभट या तिघांना महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या गागाभट्टला राज्याभिषेकाचे पुरोहित्य करण्यासाठी निमंत्रित करावे म्हणून वाराणसीला पाठवण्यात आले .परंतु त्यांनीही त्याच सबबीखाली नकार दर्शवला त्यानंतर मात्र कायस्थ असणाऱ्या बाळाजी आवजी यांनी निळो यसाजी यांना शिवाजी महाराजांचे घराणे हे राजस्थानमधील उदयपूरचे मूळ रहिवासी असून त्यांचा संबंध शिसोदिया राजपूत घराण्यासोबत असल्याचे काही बनावट कागदपत्र घेऊन पाठवण्यात आले व सोबत त्यांना राज्याभिषेकाची अतिरिक्त दक्षिणाही मिळेल असे आश्वासित केले.
त्यानंतर मात्र गागाभट्ट तयार होऊन सर्व धर्मग्रंथांना गुंडाळून अभिलाषेपोटी रायगडाच्या पायथ्याशी येऊन पाचाडात थांबले. तेथेही त्यांना महाराष्ट्रीयन भट पुरोहितांनी व काही ब्राह्मण्यवाद्यांनी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगण्यात आले, की आपण शिवाजीचा राज्याभिषेक केला, तर ब्राह्मणशाहीला, पुरोहितशाहीला न्यूनता आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपला शब्द फिरवला व शिवाजी महाराजांच्या ऐवजी आपण बाळाजी आवजीचा राज्याभिषेक करण्यास तयार असल्याचे संगितले . यामधून असे ध्वनित होते, की एखाद्या महान व्यक्तीचं कर्तुत्व नाकारून सामान्य व्यक्तीला मोठं करावं व सर्व बागडोर आपल्याच हातात ठेवावी! परंतु धनाच्या अभिलाषेपोटी व जिवाच्या भीतीपोटी गागाभट्टांनी,' गागाभट्टी ' हा ग्रंथ लिहून त्यामध्ये कायस्थ हलके असल्याची व शिवाजी महाराजांच्या घराण्याचा संबंध हा उदयपूरच्या राजपूत घराण्याशी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करून राज्याभिषेक सोहळा पार पाडला.
समकालीन काही इतिहासकाराच्या नोंदी व शिवाजी महाराजांच्या दप्तर खाण्यातील जमाखर्च यावरून राज्याभिषेकासाठी चार कोटी सव्वीस लाख लाख रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये व्रात्यास्तोम विधी, शाही स्नानाच्या वेळी उपस्थित भटपुरोहितांची दक्षिणा, महाराजांची सुवर्णतुला तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जूनला उपस्थित पन्नास हजार ब्राह्मण स्त्री-पुरुष, मुले यांना दिलेली भेट व इतर काही खर्च यांचा त्यामध्ये समावेश आहे अशाप्रकारे राज्याभिषेकाला अनेक अडचणी येवुन शिवाजी महाराजांना नानाविध अपमान सहन करावे लागले. ज्यांच्या प्रेरणेने हे स्वराज्य निर्माण झालं होतं त्या राजमाता जिजाऊंना हे सहन न झाल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. राज्याभिषेकानंतर अवघ्या दहा दिवसात त्यांचा देहांत झाला.
शिवाजी महाराजांना कधी नव्हे एवढं दुःख झालं. आपलं छत्र हरवल्याचे त्यांना जाणवू लागले. त्यांना नाईलाजास्तव सर्व अपमान सहन करून राज्याभिषेक करणे अगत्याचे होते. त्याशिवाय राजा म्हणून मान्यता मिळणे शक्य नव्हते. राज्यातील ब्राह्मणांसह सर्व प्रजेला दंडित करण्याचा अधिकार मिळवायचा असेल तर वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करणे गरजेचे होते. परंतु राजमाता जिजाऊंच्या निधना नंतर त्यांना अपमानाचे शल्य आणखीच बोचू लागले. शेवटी उद्विग्न होऊन त्यांनी अवैदिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या राज्याभिषेकानंतर अवघ्या अठरा दिवसांनी म्हणजे २४ सप्टेंबर १६७४ रोजी त्यांनी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते दुसरा अवैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून ब्राह्मणी धर्माची सर्व बंधने झुगारून लावली. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक व त्यांचा राजस्थानातील राजपूत घराण्याची जोडण्यात आलेला संबंध याविषयी कॉ. शरद पाटलांनी आपल्या ' शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण मोहम्मदी की ब्राह्मणी ' या पुस्तकांमध्ये बरीच रहस्य जागर केलेली आहेत.
पहिल्या राज्याभिषेक प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा शुद्र म्हणून अपमान भट- पुरोहितांनी ज्या धर्मग्रंथांच्या आडून केला, त्या अपमानाचा बदला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच धर्मग्रंथाला जाळून घेतला. त्यांनी दि . २५ डिसेंबर १९२७ रोजी आपल्या काही ब्राह्मण मित्रांच्या सहकार्याने रायगडाच्या पायथ्याशी महाड येथील चवदार तळ्याकाठी मंत्रोच्चारात मनुस्मृतीचे जाहीर दहन केले. एवढेच नव्हे तर भारतीय संविधानामध्ये अशी व्यवस्था करून ठेवली, की लोकशाही पद्धतीने जो कोणी राजा (प्रधानमंत्री) होईल त्याचा राज्याभिषेक (शपथविधी) करण्यासाठी भट पुरोहिताची गरजच ठेवली नाही. दिनांक २२ मे २००४ रोजी भारतीय लोकशाहीला जगात मानाचं स्थान मिळालं होतं कारण त्या दिवशी अल्पसंख्यांक शिख समुदायातील डॉ. मनमोहन सिंग यांना अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायातील राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ दिली होती . तर ३० मे २०१९ रोजी ओबीसी समुदायातील नरेंद्र मोदी यांना अनुसूचित जाती(एस. सी.) समुदायातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ दिली. धर्मग्रंथाच्या व वर्णव्यवस्थेच्या भाषेत बोलायचे म्हटले, तर एका अतिशूद्र व्यक्तीने एका शूद्र व्यक्तीचा राज्याभिषेक केला. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेली करामत आहे याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच तर एक कवी म्हणतो की ,
*दोनच राजे इथे गाजले* *कोकण पुण्यभूमीवर*
*एक त्या रायगडावर* *एक चवदार तळ्यावर*
भिमराव परघरमोल मो.९६०४०५६१०४
व्याख्याता तथा अभ्यासक- फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
0 टिप्पण्या