Top Post Ad

गणाचा मुख्य तो गणाधीश...


टिळक - गांधी- नेहरु यांच्याशी संघर्ष करीत केवळ 36 वर्षात स्वत:चे एक नवीन युग युगपुरुष डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केले. सनातनी प्रवृत्तींचा बुरखा फाडून आंधळ्यास डोळे, मुक्याला वाचा, पांगळ्याला पाय देवून संर्घषासाठी बहुजनास सक्षम बनविणारे फुले, शाहू, आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. ज्यांच्यामुळे आपली प्रज्ञा जागृत झाली. ते बहुजनांतील विचारवंत फुले, शाहू, आंबेडकरांपेक्षा टिळक, गांधी , नेहरु यांच्या शुध्दीकरणाच्या पाट्या उचलून कोणाची फसवणूक करीत आहेत?  सनातनी कितीही मोठा असला तरी राष्ट्रीय पातळीवर किती खोटा हे डॉ. बाबासाहेब यांना पटवून दिल्याने कोणी शब्दाचे खेळ करुन खोटा इतिहास पटवु शकत नाही. 

भारतभूमीला स्वराज्य की, सुराज्य हवे हे वास्तव कळत  नाही तोपर्यंत खरी लोकशाही कळणार नाही. सर्व जातींना सोबत घेवून शिवबांनी सुराज्याची निर्मिती केली. शेतकऱयांच्या शेतातील भाजीच्या देठाला हात लावाल तर याद राखा असा सैन्यांला दम देणारा खरा रयतेचा जाणता राजा होता. राज्याभिषेकाला विरोध करणाऱया ब्राम्हणांचा  समाचार घेताना शिवराय बौध्द विचार नि संस्कृतीकडे झुकले होते. 14 वर्षाच्या शंभुराजांनी संस्कृतमधुन बुध्दभूषण ग्रंथ लिहिताच एकजात ब्राम्हणांची झोप उडाली. एकसंघ ब्राम्हणांनी  विश्वासघात करुन शिवरायांना मारले तर संभाजी राजे यांना विश्वासघाताने औरंगजेबाच्या स्वाधीन केले. 

बौध्द संस्कृतीच्या मुळावर गणपती बसविण्यासाठी नानासाहेब पेशवे यांनी पुण्यात सारस बागेत पहिला गणेशोत्सव सुरु केला. शनिवारवाडा गणेश महालात गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्थी ब्राम्हणांच्या मोठ्या भोजनावळीच्या पंगती उठत. ब्राम्हणांना भोजनदान आणि वरती सोने चांदीची नाणी दक्षिणा देवून नुसता चंगळवाद मांडला होता. गणपतीची आठ ठाणकं, तो अष्ठविनायक तिर्थस्थळावर अमाप पैसा खर्च केला. दरवर्षी गणेशोत्सवात राज्याची तिजोरी खाली झाली की जनतेवर सक्तीने कर लादुन महसूल गोळा करीत. पेशव्यांना पुंभाराचा मातीचा तर सोनाराचा धातुचा बनविलेला गणपती चाले पण सोनार, कुंभार यांच्या गणेशोत्सावात सहभागी झाल्याचे मान्य नव्हते. एका सोनाराने आपल्या घरी गणपती बसवून गणेशोत्सव साजरा केल्याची बातमी कळताच पेशव्यांनी त्या सोनाराला कडक शिक्षा केली. 

गण म्हणजे लोकसमुह, गणाचा मुख्य तो गणाधीश आणि गणाधीशाचं राज्य ते गणराज्य होय. ही लोकशाही बौध्द परंपरा त्याला छेद देण्यासाठी पेशव्यांनी गणेशोत्सव सुरु केला. त्याकरीता पोटभरु संत, कवी, साहित्यिक, शाहीर यांना फसवून वापरले. अशा धुर्तांचा समाचार घेताना प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ` मेंदूच्या जटा उपटण्याची ताकद असणाऱया शाहीरांनी केवळ पेशवे यांना खुश करण्यासाठी गण लिहिले. गण हे गणपती या देवतेची स्तुती करणारे होते. पुढे ब्राम्हण शाहीर पठ्ठे बापुराव यांनी पेशवेकालीन गणाची आपल्या तमाशात री ओढली. 

ब्रिटिशांनी अस्पृश्यांना शिक्षण देणे ब्राम्हणांना मान्य नव्हते. `ब्राम्हण कितीही झाला भ्रष्ट तरी तिनही लोकी श्रेsष्ठ' हा मनुस्मृतीचा कायदा ब्रिटिशांना मान्य नव्हता. गुन्हेगाराला शासन या ब्रिटिश नितीने एका ब्राम्हणाला फाशी देण्यात आले. तेव्हापासून एकजात सगळेच ब्राम्हण राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरुन ब्रिटिशांना भारतातून घालविण्याच्या आंदोलनात सतत आघाडीवर होते. 

पुण्याच्या ब्राम्हणांनी ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज अशा विविध संघटना एकसंघ करुन राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी महात्मा फुले यांना काँग्रेसमध्ये सामिल होण्याची विनंती केली. तेव्हा महात्मा फुले म्हणाले ` माझ्या घालमोड्या दादा, तुम्ही लोक उटांवरुन शेळ्या हाकणारे, तुम्ही आमच्या सारख्या कुणब्यांशी बरोबरीने वागाल यावर माझा विश्वास नाही,' कारण ब्रिटिश शुद्रांसाठी शाळा काढणाऱया ज्योतीराव फुले यांच्या कार्याचे कौतुक करीत पण फुल्यांचे कार्य ब्राम्हणांची पोटदुखी होती. 

स्वत एक चिट फडांचा गेंधळ करणारे टिळक, महारांना गुन्हेगारीची टोळी म्हणत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महार परिषदेचे मंडप जाळण्यास  लावले. चिरोली खटल्यात लंडनला गेलेल्या टिळकांना तेथील लोकांनी म्हटले की,आपण भारतातील दिन-दुबळ्यांच्या बाजूने उभे रहात नाही. आपण प्रतिगामी असाल तर आम्ही आपणास कोणतीच मदत करणार नाही. प्रथम आपली पुरोगामी इमेज बनवा,'  नाविलाज झालेले टिळक अस्पृश्यता निर्मुलन परिषदेला हजर राहिले आणि भाषणात म्हणाले, `हिंदुचे देव अस्पृश्यता मानत असतील तर अशा देवांना मी अरबी समुद्रांत बुडवून टाकीन. मी  अस्पृश्यता पाळत नाही आणि मानत नाही. हे भाषण लंडन टाईम्स, अमेरिकन गार्डियन, मुंबई टाईम्स मधून छापून आले. पण टिळकांच्या केसरीने अस्पृश्यांबदल एक अक्षरही छापले नाही. फक्त चांभारांच्या गणपतीची कथा छापली. 

महार परिषदेचे प्रमुख विठ्ठल रामजी शिंदे यांनी आम्ही अस्पृश्यता पाळणार नाही. या जाहीरनाम्यावर सही करण्यास सांगताच टिळक म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारुन सही करीन तेव्हा शिंदे म्हणाले, आपण खाजगीत काय करता ते कार्यकर्त्यांना विचारुनच करता का? 1982 साली टिळक, आगरकर यांना मुंबई डोंगरी झेलमध्ये अटक झाली. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी एकही ब्राम्हण, बनिया, मारवाडी  पुढे आला नाही पण सत्यशोधकचे खजिनदार रामसेठ बापुशेठ उखणे यांनी महात्मा फुले यांच्या सांगण्यावरुन टिळक, आगरकरांना 10 हजार रुपयांचा जामीन दिला. त्याकाळात ती मोठी रक्कम होती. तुरुगांतून बाहेर आलेल्या टिळक, आगरकरांची भव्य मिरवणूक काढण्यास महात्मा फुले यांनी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांना सांगितले. टिळक , आगरकरांचा सत्कार करताना महात्मा फुले भाषणात म्हणाले `तुम्ही केवळ ब्राम्हण हिताचे राजकारण करु नका, सर्वांना सोबत घेवून चालाल तर या देशाचे मोठे नेते व्हाल!' उलट टिळकांनी अस्पृश्य जाती सोडून ब्राम्हण, खोत, जमीनदार, भांडवलदार आणि सावकार यांना सोबत घेवून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. आगरकर आपल्या सम्रग साहित्यात लिहितात `गुंड प्रवृत्तीने वाया गेलेले रामशेठ उखणेवर फुले यांनी चागंले संस्कार केल्यामुळे त्याने आम्हाला 10 हजाराचा जामीन दिला. 

छत्रपती शिवराय यांची रायगडावर जाऊन समाधी शोधली आणि पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरु केली. डॉ. जे. बी. शिंदे म्हणतात ` उत्सव थोरांच्या नावांनी करावे, देवांचे करावे, थोर पुरे ।। त्यासाठीच महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. ब्रिटिशांनी सर्व जातीना प्रतिनिधीत्व देण्याचा निर्णय घेताच टिळक सतांपले आणि अथनीच्या सभेत म्हणाले, ` कुणबटांनी शेतात नांगर धरावयाचे सोडून पार्लमेंटमध्ये काय दिवे लावणार? परंतु ब्रिटिशांनी टिककांना भिक घातली नाही. 

स्वातंत्र्य संग्रामातील मास नेता असताना तेल गेले तूप गेले हाती धोपाटणे आले. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून टिळकांनी ब्राम्हण, खोत, जमीनदार, भांडवलदार आणा सावकार यांना संघटित करुन पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. परंतु त्यामध्ये अस्पृश्य जातींना सामावून घेतले नाही. 

श्रीमंत, गरीब, या गुलाम असलेल्या देशाला कोणताच उत्सव माहीत नसेल तर तो देश पशु सारखा असतो. महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरु केली. संताची वारकरी परंपरा सुरुच होती. टिळकांचा गणेशोत्सव ब्रिटिश विरोधी असला तरी महात्मा फुले यांच्या शिवजयंतीला पर्याय म्हणजे सांस्कृतीक संघर्ष होता. कारण गणपती मिथक, शिवराय, बुध्द, विठोबा, विरोधी होते. भक्ती करणारी माणसं जगभर सापडतील पण पुजनवेडी माणसं भारताशिवाय अन्यत्र कोठेही आढळणार नाही. पुजावेड्या लोकांचा देश अशीच भारताची ओळख असताना पुजा करतो ती वस्तु मुर्ती या प्राणी तशा प्रकारे सजीव या निर्जिव असू शकतो का? याचा साधा विचार माणसाच्या मेंदूत का येत नाही. स्वत देवपूजा या पोथिवाचनात कधीच न रमलेले टिळक यांनी अभिजन वर्गास सार्वजनिक गणेशोत्सव गुतंवून ठेवले. 

महात्मा फुले यांनी गणपतीवर विडंबन रचून गणपती अखंडात म्हणतात, 
  • पशुशिरी सोंड, पोर मानवाचे। सोंड गणोबाचे नोंद ग्रंथी ।। 
  • गणोबाची पुजा भाविका दाविती। ह्यरामाच्या खाती तुपपोळ्या।। 
  • उत्सवाच्या नावे द्रव्य भोदांडिती। वाटी खिरापती धुर्त भट।। 

लालबागच्या गणपती देखाव्यावर कोटी रुपये खर्च पण नवसाच्या भाविकांकडून 450 किलो चांदी, 250 किलो सोने ही वृत्तपत्रातील आकडेवारी आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यास  कोटी भाविक आल्याचे मंडळाचे म्हणणे  त्या भाविकांनी नारळ आणि दानपेटीत श्रद्धेने टाकलेली रक्कम याचा अंदाज केला तर मंडळाने खर्च केलेल्या रकमेच्या दसपटीने धनसंपत्ती जमा होते आणि ती सालाबादाप्रमाणे जमा होत आहे.  प्रत्येक मंडळाची भाविकांना भुलविण्यासाठी देखाव्यावर अमाप खर्च करण्याची स्पर्धाच सुरु आहे. गेल्या वर्षी दगडू हलवाईने पुण्यात सोमेश्वर असणाऱया राजघराण्याचे मोठे बॅनर लावलेले असतात. म्हणजेच चोर शिपाई मिळून अंधश्रद्धाळू जनतेला मताने आणि धनाने लुटतात. पुण्यात ही पेशवाई नव्हे तर काय आहे. 

देखाव्यावर करोडो रुपये खर्च करणारी अनेक मंडळे त्याच्या दसपटीने कमवित असतात. 90 टक्के गणेशोत्सव मंडळे बेकायदा वीज वापरतात. पण त्याचा फटका नंतर सामान्य जनतेलाच बसतो. पुण्यातील गणपतीवर दहा दिवसात 100 कोटी तर मुंबईच्या गणपतीवर एक हजार कोटीची उलाढाल होते. यापैकी 60 ते 70 टक्के रक्कम ही केवळ देखाव्यावर खर्च होते.   महाराष्ट्रातील विविध शहरातील लहान मोठी गणेश मंडळे गणपती देखाव्यावर किमान 5 ते 25 लाख पर्यंत सहज खर्च करतात. गणपती उत्सव देखावा भव्य असेल तर भाविकांचा महापूर लोटतो आणि मंडळाच्या दान पेट्या हुंड्या ओसंडून वाहत असतात. भक्तांच्या अंधश्रध्देचा फायदा घेवून ही श्रीमंत गणेश मंडळे दरवर्षी सामाजिक कार्यापेक्षा देवाचे दागिने वाढविण्यात आणि स्वतचे उखळ पांढरे करण्यात धन्यता मानतात. गणपतीच्या नावाखाली अंधश्रध्दाळू जनतेच्या डोळ्यात धूळफेक ही देखील पेशवाई आहे. 

टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव हा गांधीगिरी हिंदुत्वाचा भाग आहे.  टिळक, गांधीजी प्रतिगामी चळवळीतील एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. टिळक गांधीमध्ये राजकिय मतभेद  होते पण सनातनी संस्कृतीचे समर्थक होते. टिळकांचे निधन होताच गांधीनी 1922 ला टिळक स्वराज्य फंड सुरु केला. 10 करोडच्या फंडास गोदरेजने मोठी रक्कम दिली. रेस्टॉन ऑफ इंडियाने 40 लाख फंड उभा केला तर केवळ मुंबईतून एक महिन्यात काँग्रेसने 60 लाखाचा फंड उभा केला. 

टिळक, गांधीबदल डॉ. बाबासाहेब म्हणत की, `स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी तो मिळविणारच' अशी घोषणा करणारे टिळक अस्पृश्य जातीत जन्मास आले असते तर स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे  आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन करणे माझे आद्यकर्तव्य आहे असे म्हटले असते. डॉ. बाबासाहेब, गांधीजी बदल म्हणतं गांधीजी अस्पृश्यांचे दायी असले तरी मी त्यांची माय आहे. गांधीजी इतका ढोंगी माणुस जगात कोठे सापडणार नाही. जो इन्सान इन्सान न बने वह महात्मा क्या बने! अशा गांधीना बाबासाहेब महात्मा नव्हे तर मिस्टर गांधी म्हणत. 

टिळकांना लोकमान्य तर गांधींना महात्मा ही पदवी ज्योतीराव फुले प्रमाणे कोणत्या जाहीर कार्यक्रमात जनतेने दिलेली नाही तर स्वत: लावून घेतलेली बिरुदावली आहे. अशा मंडळीचे मोठेपण सांगुन आमचे विध्दवान कोणाचा बुध्दीभेद करीत आहेत. बौध्दकालीन गणराज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी गणराज्य पध्दतीची बुध्दाच्या पंचशीलावर आधारीत राज्यघटना लिहिली. अशोक स्तंभ अशोक चक्र यांना मानाचे स्थान दिले. अज्ञान, अंधश्रध्दा आणि सनातनी गणपती कितीही थैमान घालत असला तरी बुध्दांची परंपरा असलेल्या बुध्द भूमीत गेली 62 वर्ष लोकशाही नांदत आहे त्या लोकशाहीचे खरे गणाधिपती टिळक - गांधी नव्हे तर फुले, शाहु आणि आंबेडकर आहेत. 

- एम. आनंद    मो. 9870055251 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com