Top Post Ad

कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथील दंगलप्रकरणी बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिज्ञापत्र


  कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथील दंगलीची जगभरात चर्चा झाली होती.

कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी पोलीस अधीक्षक पुणे (ग्रामीण) यांनी सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यामध्ये संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांनी दंगल भडकाविली, असे नमूद केले आहे. ते प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश पोलिसांना करावा. त्याचबरोबर ग्रामीण पोलीसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे मिलिंद एकबोटे यांना अटक झाली; परंतु संभाजी भिडे यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही, ही बाब गंभीर आहे. संभाजी भिडे यांना अटक करू नये, असा पत्रव्यवहार अथवा फोनरून संभाषण प्रशासनातील अधिकारी व राजकीय नेते यांचेमध्ये झाले होते काय? याची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यामागील कारणांचाही शोध घेण्याचा प्रयत्न करावा. दंगलखोर हे मोठ्या प्रमाणावर बाहेरून आले होते. ज्यांच्यावर दंगलीचा ठपका ठेवण्यात आला आहे त्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे व त्यांचे निकटवर्तीय यांच्या मोबाईलमधील घटनेच्याआधी 3 दिवसांचे CDR (call detail record) मिळविण्यात यावे. त्यामध्ये भीमा कोरेगावच्या आसपासच्या 12 गावांमध्ये राहणाऱ्या कोणाकोणा व्यक्तीला फोन आले होते किंवा केले होते, याची चौकशी करण्यात यावी. 

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले की, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथील रणस्तंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा ज्या-ज्या गावांनी ठराव केला, त्या गावांच्या सरपंचांची चौकशी करण्यात यावी व त्यांची साक्ष नोंदविण्यात यावी. त्यामध्ये बहिष्काराचा ठराव किंवा विरोध करण्याचा ठराव हा कोणी मांडला, त्याला कोणी अनुमोदन दिले, याची तपासणी करण्यात यावी. तसेच त्या गावचे ग्रामसेवक, तलाठी यांची चौकशी करण्यात यावी. त्या गावांचे पोलीस पाटील आणि तलाठी हे सरकारी अधिकारी असल्याने त्यांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस ठाण्याला त्या दिवशी गोंधळ होण्याची लेखी/तोंडी खबर दिली होती काय? याची चौकशी करण्यात यावी. 

  विशेष म्हणजे, ज्या ग्रामपंचातीमध्ये विरोधाचा ठराव झाला त्या गावच्या पोलीस पाटलांची व तलाठ्याची चौकशी करण्यात यावी. त्यांनी याबाबतची खबर पोलीस ठाण्याला दिली असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ही बाब कळविली होती काय? याची चौकशी करण्यात यावी. १ जानेवारी 2018 रोजी काहीतरी अनुचित प्रकार घडेल याची माहिती गुप्तचर विभागाकडे आली होती काय? आली असल्यास त्यावर त्यांनी काही कार्यवाही केली होती काय? याची चौकशी करण्यात यावी. तसेच पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांच्याकडे ग्रामपंचायत, तलाठी यांनी संबंधित घटनेपूर्वी काही माहिती सादर केली असल्यास ती त्यांना कधी पोचली? याची चौकशी करण्यात यावी. घटनेपूर्वी पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांना आदल्या दिवशी माहिती मिळाली असल्यास त्यांनी उपाय योजना का केल्या नाहीत? याची चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेपूर्वी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी वढु (बु.) या गावाला कधी भेट दिली होती? तेव्हा त्यांनी बैठक घेतली होती का? बैठकीत काय ठरले? बैठकीचा तपशील पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांना मिळाला होता काय? याचीही चौकशी करण्यात यावी.

सांगली येथे संभाजी भिडे यांचे वास्तव्य असल्याने सांगली एसटी स्टँडवरील ता. 29, 30, 31 डिसेंबर 2017 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज विशेषतः पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या एसटी फलाटावरील फुटेज मिळविण्यात यावे. तसेच त्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींचे फोटो हे स्थानिक ग्रामस्थांना दाखवून ते गावातील आहेत की बाहेरचे आहेत याची खातरजमा करण्यात यावी. तसेच ते दंगलीत सामील होते किंवा नाही याची शहानिशा करून घ्यावी.  तसेच 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषद झाली त्यादिवशी पुण्यात दंगल झाली का? 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यात दंगल झाली का? पुण्यात दंगल झाली नसेल तर एल्गार परिषदेचे संयोजक हे शहरी नक्षलवादी कसे? याची विचारणा तत्कालीन पोलीस कमिशनर, पुणे शहर यांना करण्यात यावी. तसेच 31 डिसेंबर, 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या 'एल्गार परिषद चे अध्यक्ष न्यायमूर्ती पी. बी. सावंत होते. या परिषदेला शहरी नक्षलवादी असे संबोधण्यात आले. ते कशामुळे आणि का संबोधण्यात आले, याची विचारणा पुण्याचे तत्कालीन पोलीस कमिशनर यांच्याकडे करण्यात यावी, असे महत्त्वाचे मुद्दे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उपस्थित केले आहेत.

 या दंगलप्रकरणात भिडे यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यांच्यावर केव्हाही कारवाई होई शकते असे संकेत महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. मात्र पुढे याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. एक जानेवारी 2021 ला अनिल देशमुख यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत संभाजी भिडे विरोधात आरोप पत्र दाखल करणार असे जाहीर केले मात्र अवघ्या दहा दिवसात भिडेला त्यांनी क्लीन चिट दिली ?

संबंधित बातम्या

पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळले

रश्मी शुक्ला यांची वकिली कशासाठी ?

कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास सदा ज्वलंत राहो....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com