Top Post Ad

कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास सदा ज्वलंत राहो....


   भारत देश हा शोषण करणाऱ्या जाती धर्माचा आणि शोषण करू देणाऱ्या जाती धर्माचा देश आहे म्हणून ते दोघेही एकत्र राहून आपली उपजीविका चालवून जगतात.विशेष भांडवलदार आणि कामगार एकाच पक्षात,संघटनेत राहू शकतात,एकच मंदिरात पूजा करून देवाला आशीर्वाद मागतात. असा हा जगा वेगळा देश आहे.म्हणुनच पांच हजार वर्षा पूर्वी धर्मसत्ता देशात होती.पण एक हजार वर्षा पूर्वी ब्रिटिश लोकांनी मागासवर्गीय  समाजाला शिक्षण,आरोग्य,आणि स्वरक्षण करण्याचा अधिकार दिला.त्यात महार समाजाचे लोक सर्वात पुढे आले त्यांनी आपला कौशल्य,शौर्य दाखवुन दिले होते.त्यामुळे ब्रिटिशानी लढाईत सर्वात पुढे त्यांना ठेवले.त्यांनीच ब्रिटिशाहाच्या बाजुने संघर्ष करून धर्मसत्तेचा माज असलेली पेशवाई गाडली. त्या लढाईला १८१८ ते २०२० ला फक्त दोनशे दोन वर्ष पूर्ण होते.नेमकी राज्यात व केंद्रात पेशवा विचारांच्या वारसदारांची सत्ता होती त्यामुळेच २०० वर्षाची कोरेगांव भिमाची लढाई डोळ्यासमोर होऊन काळजाला घायाळ करणारी होती. 
    
  २०१८ ला राज्यात व केंद्रात पेशव्यांच्या विचारांचे सरकार होते.त्यांच्या मनात दोनशे वर्षाची सल कायम होती. बहुजन समाज म्हणजेच मागासवर्गीय समाजसाठी,कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास आहे.तेच मनुवादी मानसिकता असणाऱ्या पेशव्यांच्या रक्ताच्या वारसदारांना मान्य नव्हता. तो पुसून काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्याचं बहुजन समाजातील तरुणांना वैचारिक मानसिक दुष्ट्या आंधळे बनवुन संघर्ष करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यात ते पूर्णपणे फसले. पेशवाई पुन्हा इतर मागासवर्गीय आदिवासी यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने सत्ताधारी झाली होती.नीती तीच होती,शल,कपट,कट कारस्थान खोटे बोल पण रेटून बोल. म्हणुन मोहन भागवत पांच हजार वर्षा पूर्वी आमची धर्मसत्ता होती.हे गर्वाने सांगतात.पण धर्माची होती की अधर्माची हे ते सांगत नाही.

     पेशवाईत फक्त महारांनाच अन्याय, अत्याचार सहन करावा लागत होता काय?. मराठे आणि इतर मागासवर्गीय समाजावर किती ही धार्मिक, सांस्कृतिक,मानसिक गुलाम बनविणारे रितीरिवाजाच्या नांवाखाली भयानक अन्याय अत्याचार झाले, तरी ते त्या विरोधात पेटून उठत नव्हते. म्हणूनच त्यांच्या जातीचा इतिहास नाही. जो अन्याय अत्याचारा विरोधात संघर्ष करतो त्यांची नोंद होते.

     भिमा कोरेगाव पासुन ७ की.मी वर वढु गाव आहे.येथेच "छत्रपती संभाजी महाराज" यांचा खुन झाला व त्यांचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व दवंडी देऊन सांगितले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल.आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही "मराठा" पुढे आला नाही. (एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी हा इतिहास जरूर वाचवा,शिवश्री अमोल मिटकरी,श्रीमंत कोकाटे यांच्या सारख्या नव्या दमाच्या विचारवंताचे व्याख्यान आपल्या गांवात किंवा शाळेत जरूर लावावे.) तेव्हा एका पहिलवानाला ही बातमी समजली तो धाडस करतो सर्व शरीराचे तुकडे जमा करुन स्वत:च्या घरी आणुन शिंप्याच्या हातापाया पडुन त्याला तयार करतो आपला राजा आहे त्यास असे नाही सोडू शकत.तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाच धाडस पाहुन त्याचे नातलग ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात. आणि त्या पहिलवानाच्या अंगणात छत्रपती संभाजी राजेंना अग्नि डाग स्वत: तो पहिलवान देतो. त्या पहिलवानाचे नाव होते "गणपत महार" आजचा जयभिमवाला होय एका महाराने छत्रपती संभाजी राजेंना अग्नि दिली.आज ही संभाजी राजेंची "समाधी" ही महार वाडयात आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमुळे हा इतिहास उजळात येत आहे. ही बातमी मोगल व भटांना समजताच गणपत महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केले व महार जातीने दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली. त्यामुळे महारांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके टाकले अशी शिक्षा भटांनी सुनावली अशी कथा सोशल मीडियावर फिरते.पुढे ही बातमी पुण्यामध्येही पसरली लोक हया गणपत महाराला वंदन करु लागले.महाराचा देव झाला म्हणुन भट आणखी चिडले असे म्हणतात.

     ब्रिटिशांना पुण्यामध्ये शिरने शक्य होत नव्हते.पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते.हे सर्व महार सैनिक पहात होते.त्यांच्या सेनापतीचे नाव "सिध्दनाक महार" होते.तो इंग्रजां सोबत करार करतो तुम्हाला हे राज्य मिळुन देतो.तुम्ही "आमच्या महार समाजाचे मडके झाडू मुक्त करा." सन्मानाने जगण्याचा आधिकार दया. इंग्रज त्याची अट मान्य करतात.हाच सिद्धनाक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन" घेताे आणि म्हणतो राजे आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो शक्ती दया, आशिर्वाद दया.असे म्हणून हे ५०० महार सोबत घेऊन २८००० पेशव्यांच्या सैनिकांना संपून टाकतात. तो दिवस होता १ जानेवारी म्हणुन हा शौर्य दिन म्हणून पाळला जातो. हाच कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास आहे.

     मराठा मागासवर्गीय समाजाला हया इतिहासाची माहिती नसणे.हेच त्यांच्या मूळसमस्यांचे एक प्रमुख कारण आहे. पेशवाईत कोणीच सुख समाधानाने जगत नव्हते महार मराठे शूर होते म्हणूनच सरदार,सेनापती,वतनदार,देशमुख,पाटील होते.मराठा सेवा संघाच्या प्राध्यापक,विचारवंत अभ्यासकांनी हा इतिहास नव्याने लिहण्यास सुरवात केली आहे. हा इतिहास सर्वांनी जागृत होऊन मराठा मागासवर्गीय समाजाने वाचलाच पाहिजे. महारांच्या कंबरेला झाडू व गळ्यात मटके का आले ?.
    देशात नव्हे तर जगात महार जातीचा शौर्यवान जात म्हणुन गौरव होत होता.हा इतिहास डॉ.भिमराव आंबेडकर यांनी इंग्लंडला वाचला तेव्हा पासुन ते एक जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी जात असत.हा महार जातीचा इतिहास आहे.आज कोणी तुम्ही महार लोक नाही सुधारणार किंवा आपल्या पायरीने वागा,महार जातीचे नांव घेऊन शिवीगाळ केली तर म्हणणाऱ्याला कायद्या नुसार केस करून जेलची हवा खावी लागेल.पण तेव्हा महार लोक लढाऊ,प्रामाणिक इनामदार, विश्वासु आणि मर्दानगी दाखवून शौर्य गाजविणारे होते असा ज्या महार जातीचा इतिहास आहे.त्यामुळेच त्यांच्या गळ्यात मटके आणि कंबरला झाडू आला. हा एक सत्य इतिहास आहे.

   अहमदनगर जिल्ह्यातही घटना महारांच्या पोरांची मर्दानगी आणि शौर्य या मुळेच हत्याकांड घडल्याचा इतिहास आहे. म्हणून महारांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मटकं आणि कमरेला झाडू कसा आला?. हा इतिहास वाचला पाहिजे. असे का घडले ? खरच महार समाज इतका घाणेरडा होता का ?. महार समाजाचा इतिहास हा शौर्यांचा इतिहास आहे. त्यांच्या इतके साफ-स्वच्छ,प्रगत जात कोणतीच नव्हती. मग गळ्यात मडके आणि कमरेला झाडू अचानक कसे आले?. करीता ही हकीकत वाचा 
    एकदा रघुनाथ पेशव्याची पत्नी आनंदाबाई पेशवे आपल्या दासींसोबत फिरायला निघाली.अगोदरच पेशवे घराणे स्त्री लंपट आणि पुरुष लंपट होते हे जगजाहीर होते. अचानक आनंदाबाईला मातीवर एका पुरुषाच्या पाऊल खुना दिसल्या.त्या पाऊल खुणा सर्व सामान्य माणसापेक्षा मोठ्या आणि आकर्षक होत्या. आनंदीबाई त्या पाऊल खुनावरच भाळली.तिने त्या पाऊल खुना कुणाच्या आहेत याचा शोध घ्यायला लावले.शोधातून समोर आले की त्या पाउल खुना लोहारकाम करणाऱ्या चंद्रा महारांच्या होत्या. त्यावेळेस महार समाज राजांचे शस्त्र बनविन्याचे काम करीत असत.आणि ते युद्धात लढाई करण्यात शौर्यवान होते. जेव्हा आनंदाबाई त्याला पाहायला गेली तेव्हा तो तलवार बनविण्याचे काम करत होता.त्यामुळे सहाजिकच त्याच्या कामामूळे त्याचे शरीर पिळदार झाले होते. उष्णतेमुळे अंगावर अगोदरच कमी कपडे होते. त्यातल्या त्यात तेव्हा महार समाजाचे लोक कस्तुरीयुक्त पान खात होते.ज्यातुन सर्वबाजूला सुगंध दरवळायचा. चंद्राचे पिळदार शरीर आणि कस्तुरीयुक्त पानाच्या तोंडून येणारया सुगंधाने तिची कामवासना जागृत झाली.तिने त्याला राजवाड्यावर बोलविले.तिच्या नजरेतील कामवासना चंद्राच्या वडिलांनी ओळखली. त्याच्या वडिलाने त्याला राजवाड्यावर जावू दिले नाही. राणीला हा अपमान वाटला.एक राणी जर चंद्रा सारख्या महारावर भाळत असेल तर तिच्या राज्यातील इतर साध्या स्त्रियांची काय स्थिती होत असेल. (नितीन आगे चे प्रकरण आठवा) हा तिला प्रश्न पडला?. 

चंद्रा वाड्यावर आला नाही म्हणून तो एक राणीचा अपमान होता.त्याचा सुड म्हणून रघुनाथ पेशवेच्या सहीने तिने राज्यात फर्मान काढला की. "यानंतर महारांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू राहील.हे यासाठी की कोणत्याही महाराच्या तोंडुन कस्तुरीयुक्त पानाचा सुगंध कुणास जावू नये आणि ती थुंकी रस्त्यावर न टाकता मडक्यातच थुंकेल आणि कमरीला मातीवर सरपटणारा झाडू यासाठी की कोणत्याही "महाराच्या पाऊल खुणा मातीवरच्या पाहून जर राणी भाळू शकते तर इतर स्त्रियाही भाळतील म्हणून महारांच्या कमरेला झाडू लटकविण्यात आला." याचाच अर्थ असा होतो की महार गबाळ,अस्वछ नव्हतेच त्यांचा इतिहास हा अभिमानास्पद होता.जो ब्राम्हणांच्या कामवासनेने नासवला.हाच कोरेगांव भिमाचा प्रेरणादायी इतिहास आहे.

    पेशवे तर सोडा परंतू महार समाजाच्या अंगी असलेले पराक्रम,शूरत्व व लढवय्यपणा इंग्रजांच्या ही पारखी नजरेतून सुटले नाही त्यांच्या ह्या गुणांचा पुरेपुर उपयोग पेशव्यांच्या विरोधात करून २८००० हजार पेशवाई सैनिक फक्त ५०० महार सैनिकांनी उभी कापून काढली.एक महार ५६ जणांना पुरुण उरत होता.पेशवे सैनिक न लढताच भांबावल्यासारखे सैरावैरा नुसतेच पळत सुटले. पेशवाई हारली आणि महारांनी ती पुर्णपणे नेस्तनाबूत करून टाकली.मग तेव्हा पासूनच एक म्हण पडली ती अशी कि तुझ्यासारखे असे छप्पन (५६) पाहिले. ह्या म्हणीचा खरा इतिहास हा आहे.
    महारांच्या पराक्रमी शौर्यमुळे इंग्रज खूपच खुश झाले होते आणि ह्या खुशीच्या बदलल्यात महारांना इंग्रजांनी जमीनी बहाल केल्या.पण महारांनी जमिनी पेक्षा इतिहासात कायम नांव राहावे आणि त्यांची आठवण राहावी म्हणून विजयस्तंभाची मांगणी केली. इंग्रजांनी ती मान्य करून विजयी स्तंभ बांधण्यात आला.त्या विजयी स्तंभावर ५०० महारांची नावे कोरण्यात आली.हाच तो १८१८ सालचा भीमाकोरेगावचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात शिक्षण घेतांना वाचला म्हणून त्यांनी आपल्या लोकांना सोबत घेऊन ह्या पराक्रमी शूरवीरांना वंदन करण्यासाठी १ जानेवारीला न चुकता जायाला लागले. म्हणुन आता लोक दरवर्षी जातात. कारण ते जर लढले नसते तर आपले अस्तित्व ही असून नसल्या सारखेच असते.

   महारांचा हा शुर व पराक्रमाचा इतिहास सोशल मिडियावर देशभर सध्या फिरत आहे. परंतु यातुन आजच्या बौद्ध झालेल्या महारानी कोणती प्रेरणा घेतली?. ६ डिसेंबर,१ जानेवारी,१४ एप्रिल,विजया दशमी धम्मचक्र परिवर्तन दीना सारखे ते लाखोंच्या संख्येने एकत्र येतात आणि जातात, पण विजयी होत नाही आजही खेड्यातील बौद्ध समाजाला मराठा पाटील इतर समाजाच्या राजकीय गुंडागर्दी मुळे गांव सोडून पळून जावे लागते, हे भिमाकोरेगांवला मानवंदना देण्याच्या लायकीचे नाहीत असेच म्हणावे लागेल.तेव्हा ते शत्रू बलाढ्य आणि मोठया संख्येने आहे हे माहित असुन सुध्दा जिद्दीने लढले. आज आम्ही संख्येने सर्वांना सोबत घेऊन ८५ टक्के होतो. हे माहित असुन ही पेशवाईच्या पालखीचे भोई होतो.म्हणजे कुठे तरी काही वैचारिक,स्वार्थीपणाची गडबड आहे.
 १ जानेवारी च्या "शौर्यदिनाचा इतिहास वाचुन इतिहास घडवावा" कि भिमा कोरेगांव ला जाऊन कुंटुंबिक सहल घडवीत राहणार?. तिथे ही वेगवेगळे बॅनर होडींग आणि स्टेज आणि वेगवेगळी भाषण!. मग कोणत्या तोंडाने आम्ही सांगणार आहोत की ५०० महार सैनिका कडून आम्ही प्रेरणा घेतली. खरच तुम्हाला कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास वाटतो का?. 

    कडू भिडे गुरुजी आणि एकबोटे यांनी सुपारी घेऊन २०० वर्षाची परंपरा बंद करण्याचे पूर्व नियोजन केले होते.त्याला पोलिसांनी व सरकारने योग्य ती मदत केली. त्यामुळे एक क्झाले ज्यांना हा प्रेरणादायी माहिती नव्हता तो इतिहास व वर्तमान जागतिक पातळीवर पोचला,  आता लाखो लोक दरवर्षी राज्यातुन नव्हे तर देशभरातून परदेशातून कोरेगाव भिमाच्या विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अभ्यास करण्यासाठी मोठ्या संख्येने यायला लागले. कारण कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास जगाला माहिती झाला.आजच्या पिढीला माहिती असणे आवश्यक आहे.म्हणूनच कोरेगांव भीमाचा इतिहास प्रेरणादायी असेल तर आपल्या आचरणातून दाखवून द्यावे हीच खरी त्या 500 शूरवीरांना मानवंदना असेल.कोरेगांव भीमाच्या लढाईत लढणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रमाण.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com