Top Post Ad

पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपेल- रामशेठ ठाकूर

बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद  व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. २० लाख रुपयांची वैयक्क्तिक  देणगीही त्यांनी या वेळी जाहीर केली. या विश्रामधाम नूतनीकरणासाठी रामशेठ ठाकूर यांनी आतापर्यंत एकूण ७० लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनीही या उपक्रमासाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

लोणावळा येथील विश्रामधामाच्या नूतनीकरणाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. यावेळी  कामगार नेते महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पन्नास वर्षापूर्वी विश्रामधाम उभारणीत सक्रीय सहभाग असलेले माजी अध्यक्ष कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, अजय वैद्य, माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यकारणी सदस्य दिवाकर शेजवळ, प्रकल्प निरीक्षक दीपक म्हात्रे, वास्तुविशारद मनोज गोलतकर, राजू माळी आणि भाजपाचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि कार्यकारिणी सदस्य तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेले मुंबई मराठी पत्रकार संघाचे कलावंत देवदास मटाले, स्वाती घोसाळकर, रश्मि महांबरे, प्रशांत चिडे, सिध्देश शिगवण, सुरेश ठुकरूल आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांचा विशेष सत्कार रामशेठ ठाकूर आणि महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आला.

पत्रकार संघाचे लोणावळा येथील विश्रामधाम थ्री-स्टार करण्याचा शब्द विद्यमान कार्यकारिणीने दिला होता. विद्यमान विश्वस्त, आजी-माजी अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या सूचनांचा एकत्रित विचार करून अखेर थ्री-स्टार विश्रामधामाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले दमदार पाऊल मुंबई मराठी पत्रकार संघाने टाकले आहे. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोणावळा येथे या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. येत्या मार्चपर्यंत हे अद्ययावत विश्रामधाम उभे राहील असे आश्वासन अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिले. दी. गो. तेंडुलकरांच्या या स्मृती केंद्रास त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ साली एक हजार रुपयांची देणगी दिली होती. पत्रकार संघाच्या या भिंतींनी गेली ५० वर्षे अनेक जिव्हाळ्याच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत आणि म्हणूनच हा जिव्हाळा जपून या विश्रामधामाचे नूतनीकरण केले जाईल असे संदीप चव्हाण म्हणाले.

पत्रकारांच्या या विश्रामधामाच्या उभारणीत अनेकांचे श्रम आहेत. मीही अनेक सामाजिक संस्थात रामशेठजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो. माझ्यातर्फे मी ५ लाखाची देणगी तर पत्रकार संघाला देत आहेच, पण भविष्यातही मी पत्रकार संघासोबत कायम जोडला जाईन, असे महेंद्र घरत म्हणाले. या वास्तूच्या उभारणीसाठी पत्रकार संघाच्या तत्कालीन कार्यकरिणी  सदस्यांनी खूप  हालअपेष्टा सोसल्या. त्या सगळ्यांच्या वतीने मी आज हा सत्कार स्वीकरत असल्याची कृतज्ञ भावना माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी व्यक्त केली. पत्रकार संघात वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असतानाच विश्रामधाम नूतनीकरणाचे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे. सर्व कार्यकारिणी आणि विश्वस्तांचे आम्ही त्यासाठी आभारी आहोत, अशी भावना कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी व्यक्त केली. निवेदन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com