नाशिकमध्ये २०२७ मध्ये हिन्दु कुंभमेळा होणार आहे. यासाठी सुमारे 14 हजार कोटीची आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. तसेच कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये 'साधुग्राम' उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत. नाशिकसह राज्यभरातील नागरिक या निर्णयाला विरोध करीत आहेत. तसेच अनेक पर्यावरणप्रेमीं संस्थांनीही जोरदार आवाज उठवला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात आंदोलन सुरू केले आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार ट्वीट करत साधूंच्या आडून उद्योगपतींसाठी जमीन हडपण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे सरकारला सुनावले आहे. तसेच ठाण्यातील पर्यावरण संस्था इको फ्रेन्डली लाईफ या संस्थेचे प्रमुख अशोक एन.जे. यांनीही प्रत्यक्ष तपोवन येथे जाऊन आंदोलन केले. आणि वृक्षतोडीला विरोध केला.
झाडे वाचवण्यासाठी आता पर्यावरण प्रेमी सोबत नेते मंडळी देखील सरसावले आहेत. तपोवन परिसरात झाडे वाचवावी या मोहिमेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेतला आहे. २९ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनीही या वृक्षतोडीला विरोध करून भाजप सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर आता राज ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मात्र नाशिक महापालिका आणि सरकार तसेच सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हटायला तयार नाहीत. यापूर्वी मनसेच्या हातात नाशिक महापालिका असताना नियोजन इतके उत्कृष्ट होते की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडे तोडावी लागली नाहीत. मग आता कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडावी लागत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारला धारेवर धरलंय. तुम्ही १ झाड तोडून २०० झाडं कुठं लावताय ते आधी दाखवा असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारलाय. माध्यमांशी बोलतां सयाजी शिंदे म्हणाले, 'तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक सोहळ्यासाठी झाडांची कत्तल करणे योग्य नाही. तुम्ही एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान करता, पण ते फालतू आहे. आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं उभी राहतील, पण ते झाड तोडू देणार नाही. सरकार आपलं असूनसुद्धा बेजबाबदार वागते आहे. मला अनेक फोन येतायत. नागपुरात ४५ हजार झाडे तोडणार आहेत, कर्जतमध्येही तसेच. आपल्या डोळ्यांसमोर जी झाडे तोडली जात आहेत, ती आपण वाचवली पाहिजेत; नाहीतर माणसं पेटून उठतील.' 'सरकारने डोळे उघडले पाहिजेत. तुम्ही किती झाडे लावली त्याचा हिशोब द्या. लोकांनी आवाज उठवला की तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण बोलणाऱ्याला बोलता आले पाहिजे. आपल्याकडे लोकशाही आहे की, हुकुमशाही हेच समजत नाही. झाडांवर राजकारण करू नका.' सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला असून त्यांनी सरकारकडे आधी उत्तराची मागणी केलीये. वृक्षतोड करून पुढची पिढी कशी जगेल याचा विचार केलाय का असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात स्वराज्य शक्ती सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी दिला आहे. तपोवन परिसरात १८०० वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव असून दुसऱ्या ठिकाणी १८ हजार झाडांसाठी खड्डेही करण्यात आले आहेत. “ज्यांनी हे खड्डे केलेत, त्यांनी स्वतःच त्या खड्ड्यात पुरून घ्यावं; पण तपोवनातील झाडांना हात लावू नका,” असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.तपोवनातील साधुग्राम परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या गुरुवारी नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी परिसरात वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, “तपोवन’ या नावातच ‘तप’ आणि ‘वन’ आहे. साधूसंतांनी शेकडो वर्ष तपश्चर्या केलेल्या भूमीवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय हा हिंदू धर्माच्या नावाखाली कार्यरत असलेल्या सरकारचा दुटप्पीपणा आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावात ‘देव’ असताना, त्यांनीच या पवित्र वनाची कत्तल करण्याची तयारी दाखवली आहे. उद्योजक अदानी-अंबानी यांच्या घशात ही जमीन घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०० वर्षांहून जुनी झाडे सरकार पुन्हा कुठून आणणार? दहा वर्षांच्या आतील झाडे तोडणार म्हणजे घरातील दहा वर्षांच्या मुलांना कापण्यासारखेच आहे! वृक्ष हे घरातीलच सदस्य आहेत. त्यामुळे एकही झाड तोडू देणार नाही. आंदोलन तीव्र करावे लागले तर मी स्वतः उपोषणाला बसेन.”नाशिककरांसाठी ही झाडं प्राणवायूचे मोठे स्त्रोत असल्याचे सांगत त्यांनी ओझोन थराच्या संरक्षणातही या वनक्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचा उल्लेख केला. “महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. हीच भूमी उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन पेटून उठेल,” असा त्यांनी इशारा दिला. यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका करताना “हिंदू-मुस्लिम मुद्दे निर्माण करून राजकारण करणे काहींचे काम आहे. पण आम्ही फक्त निसर्गाचे रक्षण करणारे. पंचतत्वांनी शरीर निर्माण झाले, त्या पंचतत्वांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे तीव्र शब्दांत सांगितले.


0 टिप्पण्या