भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत आपल्या अभिवादनपर भाषणात म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. असे युगपुरुष व्यक्तिमत्त्व जगातून गेले तरी त्यांचे विचार व कार्य जनतेच्या अंत:करणात सदैव जिवंत राहतात, त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला, असे त्यांनी नमूद केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच शक्य झाले. समाजातील विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान त्यांनी देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या लोकशाहीला दृढ पाया दिला. त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकर यांनी केले, - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
---------------------------------
दरम्यान महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला भेट देऊन खासदार वर्षा गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींस अभिवादन केले. यावेळी आमदार डॉ. ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कचरू यादव, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष सुभाष भालेराव, महिला अध्यक्ष ट्युलिप मिरिंडा, रोशन शहा, रहेनुमा सिद्दीकी, दीपक काळे आधी उपस्थित होते.
मुंबई काँग्रेसच्या वतीने देशभरातून आलेल्या बौध्द भिक्खू संघास चिवरदान व भोजनदान आणि भीम अनुयायींना अल्पोपहारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भाषणात खा.गायकवाड म्हणाल्या, केंद्रात व राज्यात मनुवादी विचाराचे सरकार आल्यापासून दलित, मागास समाजावरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महिला व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत.ऑनर किलिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वळवला जातो. सरकारकडे तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही. भाजपा सरकार जाणीव पूर्वक दलित, वंचित, मागास व अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष करत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे भाजपाचे प्रेम हे केवळ दिखावा आहे, भाजपा व आरएसएस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कधीच स्विकारले नाही. संविधान व लोकशाही पायदळी तुडवत भाजपा सरकार काम करत असून बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचा त्यांचा अजेंडा आहे. संविधान हे आपल्या देशाचा आत्मा आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व ते कोणतीही किंमत देऊन करू,


0 टिप्पण्या