भूषण भोईर या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी प्रभाग क्रमांक 3 मधील शाखाप्रमुखांनी आंदोलन केले. ज्यामध्ये विक्रांत वायचळ यांचा समावेश होता. पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने हकालपट्टी झाल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी तात्काळ राजीनामा दिला. मात्र निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे नाराजी नाट्य धोकादायक ठरू नये म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यात येऊन भुषण भोईर यांचे तिकीट कापण्यात आले. आपल्या या विजयाच्या गुर्मीत त्यांनी थेट कार्यकर्त्यांनाच धमकवायला सुरुवात केल्याची चर्चा ठाणेकर करीत आहेत. एका कार्यकर्त्याला फोनवरून धमकावल्याचं प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे..
मीनाक्षी शिंदे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना आगरी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्या कार्यकर्त्याला धमकावल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिनाक्षी शिंदे यांनी ज्या व्यक्तीला कॉल केला होता तो आणि ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या तो, असे दोघेही तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात आले होते. त्या दोघांनीही ही क्लिप खरी असल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्या जिवाला धोका असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे, मिनाक्षी शिंदे यांनी ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केला. एआयच्या माध्यमातून ही क्लिप तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आणि तशी पोलिसात तक्रारही दिली आहे. मिनाक्षी शिंदे यांच्या वक्तव्यानंतर आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि आगरी-कोळी समाजाचे अध्यक्ष बाळ्या मामा म्हात्रे हे आगरी-कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कापुरबावडी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली. खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे म्हणाले की, "ही ऑडिओ क्लिप ठाणे जिल्ह्यातच नाही रायगड पालघर जिल्ह्यात फिरत आहे. त्या विषयी बोलताना आणि चर्चा करताना लज्जास्पद वाटत आहे. ज्यांनी हे बोलले आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे भान ठेवले नाही. निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, लोकशाही आहे. लोकांना निर्भीडपणे मतदान करता आलं पाहिजे. अशा वेळी हे सरळ घरात घुसून मारू, पोरं पाठवू अशी धमकी देता. तेवढ्यावरच थांबत नाहीत, ते आता माझ्या समाजाबद्दल बोलतात. तुम्ही नगरसेवक झालात म्हणून तुम्ही महापौर झालात हे आमच्या समाजाने मदत केल्याचं फळ आहे. तुम्ही आमच्या समाजाविषयी असे बोलत असाल तर आमच्या समाजाची ताकद पाहण्याची तयारी ठेवा." निवडणूक आयोगाचा सन्मान करतो, कायद्याचे पालन करतो. नाहीतर या ठाणे जिल्ह्यात लाख दीड लाख लोकांचा मोर्चा मिनाक्षी शिंदे यांच्या विरोधात निघाला असता. आताही सांगतो संयम बाळगा. तुम्ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढा. पुन्हा आमच्या समाजाविषयी बोलण्याची हिंमतही करू नका असा इशारा बाळ्या मामा यांनी दिला.
मीनाक्षी शिंदे यांनी आगरी-कोळी समाजाबद्दल वापरलेली अपमानास्पद व गलिच्छ भाषा त्यांची संस्कृती आणि मानसिकता स्पष्टपणे दाखवते. त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी महानगरपालिकेची लूट केल्याचे गंभीर आरोप आहेत. अशा गलिच्छ विचारांचे आणि गैरप्रकारांशी जोडलेले प्रतिनिधी महानगरपालिकेत बसण्यास अजिबात पात्र नाहीत. मीनाक्षी शिंदे यांनी आगरी-कोळी समाजाबद्दल वापरलेली अपमानास्पद व गलिच्छ भाषा त्यांची संस्कृती आणि मानसिकता दाखवते. निवडणुका येतील-जातील, पण माणसाचा विचार आणि कृत्ये कायम लक्षात राहतात. महानगरपालिकेत केलेल्या सेटलमेंट आणि चोरी याची शिक्षा त्यांना पुढे आयुष्यात भोगावीच लागेल. - सामाजिक कार्यकर्ते अजेय जेया

0 टिप्पण्या