बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. गुरुवारी, ८ जानेवारी रोजी दादर येथील ऐतिहासिक 'राजगृह' निवासस्थानी पक्षाचा अधिकृत निवडणूक जाहीरनामा दिमाखात प्रसिद्ध करण्यात आला. 'लोकआवाज, लोकसंकल्प, लोकशक्ती' असे ब्रीदवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यातून मुंबईतील सामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. या ऐतिहासिक जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये प्रा. अंजलीताई आंबेडकर (राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ मोकळे (राज्य उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते), चेतन अहिरे (मुंबई अध्यक्ष), स्नेहल सोहनी (महिला आघाडी मुंबई अध्यक्ष), सागर गवई (मुंबई युवा अध्यक्ष) यांची उपस्थिती होते. तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली होती.
वंचित बहुजन आघाडीने हा जाहीरनामा तयार करताना एक वेगळी पद्धत अवलंबली आहे. हा मसुदा कोणत्याही बंद खोलीत बसून तयार केलेला नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये, चाळीत, झोपडपट्ट्यांमध्ये आणि लोकांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या संवादातून हा जाहीरनामा साकारला आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन संघर्षाचा आणि आकांक्षांचा हा थेट प्रतिबिंब असल्याचे नेत्यांनी यावेळी नमूद केले. जाहीरनाम्यात ज्यांच्या श्रमावर मुंबई चालते, त्यांच्या हक्कांच्या तरतुद, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी, सामाजिक न्याय आणि हक्कांचे संरक्षण, ड्रेनेज, शुद्ध पाणी आणि दर्जेदार आरोग्याचा अधिकार, ज्यांचा आवाज प्रस्थापित राजकारणात नेहमी दडपला जातो, त्यांचा बुलंद 'लोकआवाज' बनून वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिकेत उतरली आहे," असा विश्वास यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय कार्यकारीणीतील सदस्यांची दांडी
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणाचे समिकरण बदलले असल्याचे दिसते. युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, ती ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू असते. यासाठी प्रत्येक पक्ष आपले महत्त्वाचे नेते आणि प्रचारक या रिंगणात उतरवत असतो. मात्र वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय कार्यकारीणीतील नेत्यांची फौज मात्र या निवडणुकीच्या प्रचारात दिसत नसल्याची कुजबूज कार्यकर्ते करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार आपल्या स्व-बळावर प्रचाराची धुरा पेलत आहेत. मात्र त्यांच्या सोबतीला
महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय कार्यकारीणीतील सिद्धार्थ मोकल आणि एखाद दुसरा चेहरा सोडला तर कोणी नसल्याची खंत उमेदवार देखील व्यक्त करीत आहेत. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका या ठिकाणी देखील हीच अवस्था असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. जाहीरनामा प्रकाशित करताना देखील ही स्थिती दिसून आली..

0 टिप्पण्या