मुंबई उपनगरी रेल्वेवर पुन्हा एकदा एक अत्यंत दुर्दैवी व टाळता येण्याजोगी घटना घडली आहे. वाशी रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटका आल्याने श्री. हर्ष पटेल यांचे दुःखद निधन झाले. या घटनेमुळे दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असलेल्या मुंबई लोकल व्यवस्थेतील एक गंभीर व दुर्लक्षित समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे — रेल्वे स्थानकांवरील बंद अथवा निष्क्रिय आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (Emergency Medical Rooms – EMRs). ही घटना घडण्यापूर्वीच या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी PG Portal वरील तक्रार क्रमांक MORLY/E/2025/0042485 अंतर्गत मुंबई रेल प्रवासी संघाचे उपाध्यक्ष श्री. सिद्धेश देसाई यांनी मुंबईतील सर्व उपनगरी रेल्वे स्थानकांवरील EMR तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
ही मागणी केवळ प्रशासकीय नव्हे, तर एका वैयक्तिक शोकांतिकेतून पुढे आलेली होती. २२ नोव्हेंबर २०२५ रोजीच श्री. देसाई यांचे चुलत बंधू श्री. निलेश प्रभू, जे बँकेत कर्मचारी होते, हे गोरगाव ते नालासोपारा प्रवास करत असताना लोकल ट्रेनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले. त्यांना भायंदर स्थानकावर उतरवून जीआरपीमार्फत शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र EMR उपलब्ध नसल्यामुळे अमूल्य वेळ वाया गेला आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले. जर त्या स्थानकावर सुसज्ज व कार्यरत EMR असता, तर तात्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकले असते. दुर्दैवाने, आज तीच चूक पुन्हा घडली आहे.मध्य रेल्वे (CR) मार्गावर अनेक उपनगरी स्थानकांवरील EMR हे डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळे व सेवांच्या सातत्याअभावी बंद करण्यात आले आहेत. सध्या कल्याण, वाशी, भायखळा, विक्रोळी आणि घाटकोपर ही मोजकीच स्थानके अशी आहेत जिथे काही प्रमाणात EMR कार्यरत असल्याचे सांगितले जाते. उर्वरित लाखो प्रवासी गंभीर धोक्यात प्रवास करत आहेत.
दररोज सुमारे ७० लाखांहून अधिक प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. इतक्या प्रचंड गर्दीत हृदयविकार, अपघात, अचानक तब्येत बिघडणे या घटना सामान्य आहेत. अशा परिस्थितीत EMR बंद असणे म्हणजे उपचारात विलंब, टाळता येण्याजोगे मृत्यू आणि कुटुंबांचे अपरिमित नुकसान. वाशी येथे हर्ष पटेल यांचा मृत्यू ही अपघाती घटना नसून, व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे.
मुंबई रेल प्रवासी संघाच्या ठोस मागण्या
मुंबई उपनगरी रेल्वेतील (CR व WR) सर्व बंद EMR तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावेत
प्रत्येक EMR मध्ये पात्र डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी कायमस्वरूपी नेमण्यात यावेत
ऑक्सिजन, AED/डिफिब्रिलेटर, जीवनावश्यक औषधे व प्राथमिक उपचार साहित्य अनिवार्यपणे उपलब्ध ठेवण्यात यावे
जिथे पूर्ण EMR शक्य नाही, तिथे किमान First-Aid Centres व AED यंत्रणा त्वरित बसवण्यात याव्यात
EMR पुनर्स्थापनेसाठी स्थानकनिहाय स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्यात यावे

0 टिप्पण्या