मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, मराठी शाळा बंद करण्याचा सपाटा महाराष्ट्र शासनाने सुरु केला असून, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत, मराठी शाळा बंद करुन, त्याठिकाणची जागा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मराठीद्रोही कट रचला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भ्रष्ट पालिका प्रशासन, भुमाफिया आणि कणाहीन राजकारणी यांच्या अभद्र युतीविरोधात, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली, मराठी शाळांसाठी दि. १८ डिसेंबर-२०२५ रोजी, हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कम्युनिष्ट नेते प्रकाश रेड्डी, डाव्या चळवळीतील विचारवंत अजित अभ्यंकर, पत्रकार युवराज मोहिते, पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रणाली राऊत, काँग्रेसच्या रोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय शिंदे, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे विवेक भुरके आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी मराठी शाळांसाठीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारुन दडपशाही सुरु केली. याचसंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, "मराठी शाळांचे हे आंदोलन राजकीय नव्हे; तर, सामाजिक आहे. पोलिसांनी नियम व न्यायालयीन आदेश इतर राजकीय मंडळींनाही दाखवावेत, तेव्हा कुठे पोलिसांची दंडुकेशाही पेंड खायला जाते?" असा थेट प्रश्न उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, "पोलीस-कर्मचारी जरी मराठी असले; तरी, बहुतांशी आयपीएस-आयएएस अधिकारी हे अमराठी असतात. त्यांच्याच आदेशावर खालचे लोक चालतात. पोलिसांच्या या फक्त काठ्याच नाहीत तर, भैय्यांच्या लाठ्या असून, खालच्या बाजूला परप्रांतीय भैय्ये आणि वरच्या बाजूला गुजराथी भांडवलदार यांच्यात मराठी माणसाचं सॅन्डविच झालेलं आहे... त्याच विरोधातला हा एल्गार आहे, तो रोखण्याचा प्रयत्न कशाला? काही हिंसक घडणार आहे का? असा सवाल विचारुन, रोखठोक प्रतिपादन केलं. दरम्यान, हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंतच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, काहीवेळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ पोहोचल्यावर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत, आझाद मैदानात आणल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी सर्व वक्त्यांनी मराठी शाळा वाचविण्यासाठी शेवटपर्यंत एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोर्चाला 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, सचिव नरेंद्र पंडित, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी, पक्षाचे माहिती अधिकार कक्षप्रमुख अनिल महाडिक, अविनाश सावंत, सचिन उगले आदी पदाधिकारी आणि 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे कामगार सदस्य उपस्थित होते.


0 टिप्पण्या