ठाणे शहरात एका अज्ञात व्यक्तीने (उर्फ एक ठाणेकर) महेश आहेर आणि राधिका अंधारे यांच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोप करत अनेक ठिकाणी मोठे बॅनर लावल्याने खळबळ उडाली आहे. हे बॅनर गेल्या रात्री अचानक उभे राहिल्यानंतर संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.या बॅनरमध्ये सरळ शब्दांत लिहिले आहे की, “ठाणे महानगरपालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून ऐय्याशी करणाऱ्या महेश आहेर आणि राधिका अंधारे यांच्यावर कारवाई कधी होणार?”यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता व प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते योगेश मुंधरा यांच्या तक्रारीनुसार R&R योजनेत बनावट, दिशाभूल करणारे व नियमबाह्य कागदपत्रे वापरून राधिका अंधारे आणि तनुजा अंधारे यांना अनेक व्यावसायिक गाळे मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘एक व्यक्ती – एक गाळा’ हा नियम मोडून एकाच कुटुंबातील सदस्यांना अतिरिक्त गाळे देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. 2009 पूर्वी वास्तव्य सिद्ध करण्यासाठी एकही वैध पुरावा नसताना मंजुरी देण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली आहे. मिळालेल्या गाळ्यांपैकी एक गाळा नियमविरुद्ध भाड्याने दिल्याचे पुरावे देण्यात आले आहेत. .या सर्व प्रक्रियेमुळे महापालिकेला तब्बल ८ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. असे असताना कोणतीही कारवाई होत नसल्याने हे प्रकरण थेट ठाणेकरांना बॅनरद्वारे दाखवण्यात आले. बॅनरच्या तळात केवळ “एक ठाणेकर” असे लिहिलेले आहे. त्यामुळे हे बॅनर कोणी लावले, यामागील उद्देश काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बॅनरवरील भाष्य आणि आरोप हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. “जर आरोप एवढे गंभीर असतील, तर प्रशासन कारवाई कधी करणार?” असा प्रश्न ठाणेकर नागरिक करीत आहेत.

0 टिप्पण्या