*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी अनुयायांना उत्तम सेवा-सुविधा पुरविण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न प्रशंसनीय*
*भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे गौरवोद्गार*
*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथे ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार, विविध शासकीय संस्थांकडून विद्यार्थांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शिष्यवृत्ती, नोकरीविषयक आदींचा माहिती पुस्तिकेत समावेश
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून चैत्यभूमी (दादर) येथे येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सोयी-सुविधांमध्ये दरवर्षी सातत्याने आमुलाग्र सुधारणा आणि वृद्धी होत आहे. तसेच, जनसंपर्क विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती अनुयायांना माहिती पुस्तिकेतून उपलब्ध करून दिली जाते. अनुयायांना अधिकाधिक उत्तम प्रकारच्या सेवा- सुविधा देण्यासाठी तसेच माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, असे गौरवोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी काढले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष. भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथे आज ५ डिसेंबर रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. भीमराव आंबेडकर बोलत होते.
उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) विनायक विसपुते, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, प्रतीक कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, भिकाजी कांबळे, प्रकाश जाधव, शिरीष चिखलीकर, यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच अनुयायी आदी यावेळी उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी आणि इतर मान्यवरांनी जनसंपर्क विभागातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. तसेच, अनुयायांसाठी दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित आणि महानगरपालिका मुद्रणालयाद्वारा मुद्रित ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर आणि अन्य ठिकाणी पुरविण्यात आलेल्या विविध नागरी सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली आहे.
तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध ठिकाणी केलेल्या भाषणांमधून मांडलेले शैक्षणिक विचार; राज्य शासन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, बार्टी, अन्य शासकीय संस्था, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आदींकडून विद्यार्थांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, शिष्यवृत्ती आदींची माहिती तसेच शासकीय नोकरीविषयक संस्था आणि त्यांची संकेतस्थळे आदींचा यंदाच्या माहिती पुस्तिकेत समावेश करण्यात आला आहे.
ही पुस्तिका अनुयायांना विनामुल्य वितरित केली जाते. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/Ebook/Mahaparinirvan%20Day%20Information%20Book%202025.pdf या लिंकवरून डाऊनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध आहे.

0 टिप्पण्या