मुंबई महानगरापालिकेतील प्रशासक राजच्या माध्यमातून भाजपा महायुती फक्त स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत आहे. मुंबईतील रस्ते, प्रदुषण, आरोग्य सुविधा याकडे सत्ताधाऱ्यांचे साफ दुर्लक्ष केलेले आहे. आता कांजूरमार्गच्या डंपिग ग्राऊंडवरून न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. तसेच वायूप्रदूषणावरही न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले. मुंबईकरांना स्वच्छ हवाही देऊ न शकणाऱ्या अकार्यक्षम महायुतीला निवडणुकीत थारा देऊ नका असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व देशाची आर्थिक राजधानी आहे पण केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असूनही मुंबईचा फारसा विकास झालेला नाही. लाडका उद्योगपती व कंत्राटदार यांच्यासाठी मुंबई विकण्यास काढली आहे. मुंबईकरांना मुलभूत सुविधाही देऊ न शकणाऱ्या भाजपा महायुतीला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत घरी बसवा, असेही सचिन सावंत म्हणाले.

0 टिप्पण्या