नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. एकबाजूला धर्मांध, धनदांडगे आणि दुसऱ्या बाजूला सरंजामी जात दांडगे यांच्या पैशाच्या महापुरात गरीब, शोषित, वंचित निवडणुकीला उभे राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात गोरगरीब, संख्या दुर्बल, मार्जिनल, एससी, एसटी, भटके, ओबीसी जातसमूहातून आलेले उमेदवार मैदानात उतरले होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी या विषम राजकीय लढ्यात वंचिताना राजकीय आत्मभान दिलेले आहे. त्यामुळेच ही वंचितांची फळी निकराने लढली. राजकीय गुलामगिरी झुगारण्यासाठी वंचित जातसमूहांचा राजकीय महाप्रवाह बाळासाहेब आंबेडकर निर्माण करत आहेत.
त्याबदल्यात वंचितला विद्वान म्हणवणाऱ्या लोकांनी अनेक शिव्या शाप दिलेले आहेत. बी टीम चे आरोप लावलेले आहेत. बदनामीचे कट रचलेले आहेत. पण आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. पाहुण्यांच्या चपलीने विंचू मारायला निघालेल्यांच्या डोक्यापल्याडचा हा विषय आहे. किंवा ते कळतय पण वळत नाही या मोडवर आहेत. त्यातील बहुतांश मंडळी सरंजामी प्रस्थापितांच्या छावणीत कम्फर्ट शोधत आहेत. अशा प्रागतिक शक्ती लयास गेल्या तर आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात एक नवा पर्याय म्हणून उदयास येऊ लागलेली आहे. बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर हे जनतेत आहेत. लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. जातिव्यवस्थेने विषम केलेला राजकीय संघर्ष झुंजारपणे लढत आहेत. सोबतीने अंजली आंबेडकर जीवाचे रान करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे फायरब्रँड युवा नेता सुजात आंबेडकर हा महाराष्ट्र पिंजून काढत आहे.
हिंगोलीत वैदू समाजाचा कार्यकर्ता तर जामखेडमध्ये कोल्हाटी समाजाचा कार्यकर्ता आता नगरसेवक म्हणून निवडून आणलेला आहे. अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे नगरपरिषदेत सुतार समाजाची महिला नगराध्यक्ष झाली आहे. ही खरोखरच एक महान सुरुवात आहे. “भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची” म्हणत स्वाभिमानी राजकारणाची पायवाट निर्माण करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आता विजय होताना दिसतो आहे. पुढील काळात वंचितचे आमदार आणि खासदार ही मोठ्या संख्येने निवडून येतील अशी आशा निर्माण झाली आहे.
ज्यांच्या डोक्यावर कधी फेटा बांधला गेला नाही त्यांच्या डोक्यावर बाळासाहेब आज फेटा बांधत आहेत. ज्यांच्या अंगावर कधी विजयाचा गुलाल उधळा गेला नाही त्यांच्या अंगावर आज सुजात विजयाचा गुलाल उधळत आहे. ज्यांनी आजवर दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये सतरंज्या उचलल्या त्यांना आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब स्वतःची ओळख आणि ऑफिसेस देत आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांना मानाचा शाहिरी मुजरा! सप्रेम जयभीम!!
- शाहीर सचिन माळी
0 टिप्पण्या