गेल्या काही महिन्यांपासून, ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने, ठाणे शहरातील विकासकामांना मोठ्याप्रमाणात 'बहर' आला असून, त्याचाच एक भाग म्हणून, वाघबीळ गाव रस्त्यावरील, विजयनगरी-ऍनेक्स बिल्डिंग क्र. ३१ आणि ३२च्या बाहेर, गेल्या काही दिवसांपासून नवीन रस्तेबांधणी व रस्ते सुशोभीकरणाचे काम, ठामपा प्रशासनाने सुरु केले आहे. मात्र, हे काम करताना रस्त्यालगत असणाऱ्या झाडांच्या सभोवती, सिमेंट-ब्लॉकचे ३×३ फूट आकाराचे चौथरे उभारुन, त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम संबंधित अभियंता व ठेकेदाराकडून सुरु करण्यात आलेले आहे. त्यासाठी त्या चौथऱ्याच्या आतील बाजूस खडीदेखील टाकण्यात आलेली आहे. याचाच अर्थ, सदर चौथरा सिमेंटने भरण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून, वृक्षांच्या मुळाशी सुरु असलेले काँक्रीटीकरण त्वरित थांबविण्यात यावे, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर यांनी केली आहे.
अशाप्रकारे झाडांची मुळे बंदिस्त करुन, त्यावर काँक्रीटीकरण करणे म्हणजे, झाडांचा श्वास कोंडण्यासारखेच आहे. शिवाय यामुळे झाडांच्या मुळाशी पावसाचे पाणी झिरपणार नाही, हेही आणखी महत्त्वाचे कारण आहे. अशा अनैसर्गिक प्रकारामुळे, झाडांची मुळे कमकुवत होऊन, पावसाळ्याच्या दिवसांत वादळीवाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडतात. अशा दुर्घटना यापूर्वी ठाणे शहरात घडून, जीवितहानी झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली, झाडांचा श्वास कोंडण्याचा जो काही प्रकार, महापालिका प्रशासनाच्या सौजन्याने सुरु आहे, तो त्वरित बंद करण्यात यावा, झाडांच्या भोवताली असलेले सिमेंट-ब्लॉक काढून, झाडांच्या सरळ रेषेत मातीचा भराव टाकण्यात यावा, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या नियमानुसार कोणत्याही झाडाच्या ३ मीटरपर्यंतच्या परिघात, काँक्रीटीकरण करण्यात येऊ नये असा नियम असतानादेखील, ठाणे महानगरपालिकेच्या सबंधित अधिकारी व ठेकेदाराकडून तो दुर्लक्षित करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत, "झाडे लावा... झाडे जगवा" या महाराष्ट्र शासनाच्या घोषणेचे तंतोतंत पालन करुन, सुशोभीकरणाच्या नावाखाली फसवणूक न करता, झाडांच्या भोवताली केलेले सिमेंटचे बांधकाम थांबवून, तिथे नैसर्गिकपद्धतीने मातीचा सलग भराव टाकावा आणि खऱ्याअर्थाने पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर यांनी आपल्या पत्राच्या शेवटी केली असल्याची माहिती धर्मराज्य पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख सजय दळवी यांनी दिली.

0 टिप्पण्या