बाबासाहेबांना संगीताची फार गोडी होती. आपल्याला चांगले गायन, वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी बाबासाहेब वैद्य गुरूजी यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे गुरूजी या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती. बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडील अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपूर येथील शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
या सर्व बाबी लक्षात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना विविध सुंदर वाद्यांच्या बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.
डॉ. हर्षदीप कांबळे यांनी बाबासाहेबांना शास्त्रीय संगीताद्वारे जगप्रसिद्ध कलाकारांकडून आदरांजली देण्याचा हा एक अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रम १० वर्षांपूर्वी सुरू केला आहे. संगीतात जात, पात, धर्म हे भेदभाव नसतात. ७ स्वर, २२ श्रुती या निसर्गनिर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे. चर्मवाद्य, तंतुवाद्य, सुषिरवाद्य, घनवाद्य यांची मोठी परंपरा भारतीय संगीत क्षेत्राला आहे. बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगीत संस्था दरवर्षी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी सकाळी ६ वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते.राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाबाबत म्हणतात की “डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती, म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो. पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपल्याला ध्यानधारणेच्या (विपश्यना) अवस्थेत नेते.”
भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धं शरणं गच्छामिच्या बासरी वादनाने सुरुवात केली आणि त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धं शरणं गच्छामि, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना अशा वाद्यस्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात.
यात प्रामुख्याने पंडित भवानीशंकर (पखवाज), पंडित अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन), उस्ताद दिलशान खान (सारंगी), उस्ताद शाहिद परवेज खान (सितार), फ्लूट सिस्टर्स म्हणून प्रसिद्ध सुचिस्मिता व देबूप्रिया चॅटर्जी (बासरी), पंडित प्रभाकर धाकडे (व्हायोलिन), पंडित रोनू मजुमदार (बासरी), उस्ताद रफीक खान, शफीक खान (सितार), पंडित संगीता शंकर (व्हायोलिन), पंडित नॅश नॅबर्ट (बासरी), पंडित तेजस उपाध्ये (व्हायोलिन), उस्ताद उस्मान खान (सितार), पंडित रितेश तागडे (व्हायोलिन), पंडित राकेश चौरसिया (बासरी), पंडित मिलिंद रायकर व यज्ञेश रायकर (व्हायोलिन), उस्ताद साबिर खान (सारंगी), अभय भजन सोपारी (संतूर), पद्मभूषण डॉ. एन. राजम (व्हायोलिन), पंडित प्रवीण गोडखिंडी (बासरी), उस्ताद फारूख लतीफ खान (सारंगी), विदुषी कला रामनाथ (व्हायोलिन), पंडित राजेंद्र कुलकर्णी (बासरी), उस्ताद मुराद अली खान (सारंगी) यांचा सहभाग झाला आहे. आणि या सर्वांच्या बासरी, वीणा, व्हायोलिन, सितार वादनाला अखंड साथ देणारे तालविहार संगीत संस्थेचे प्रमुख, जगप्रसिद्ध तबलावादक पंडित मुकेश जाधव!
यावर्षीच्या राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात खालील जगप्रसिद्ध कलाकारांकडून होणार आहे :
• उस्ताद सुजात हुसेन खान — सितार
• पंडित राजेंद्र प्रसन्ना — बासरी
• पंडित अतुल कुमार उपाध्याय — व्हायोलिन
• पंडित मुकेश जाधव — तबला
• पंडित श्रीधर पार्थसारथी — मृदंगम
*स्थळ : श्री रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर.*
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी, ज्युडिशरीमधील अधिकारी, पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, सिने-नाट्य क्षेत्रातील कलावंत, सामाजिक संस्था, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, महिला व समाजातील सर्वच लहान–थोर घटक या वैशिष्ट्यपूर्ण अभिवादनात सहभाग घेतात. सकाळी सूर्योदयापूर्वी बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणारी आणि सतत दहा वर्षे चालणारी ही सांगितिक परंपरा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनोखी घटना आहे. या घटनेचे आपण साक्षीदार व्हावे, ही नम्र विनंती.
0 टिप्पण्या