बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या हरकती - सूचनांची गांभीर्याने दखल घ्यावी.... आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांचे निर्देश
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रारूप मतदार यादी माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या संबंधित विधानसभा क्षेत्रांच्या दिनांक १ जुलै २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या आधारे, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना नोंदविण्यासाठी दिनांक ३ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱया सर्व हरकती व सूचनांची गांभीर्यपूर्वक आणि काटेकोरपणे दखल घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत आज दि. २८ नोव्हेंबर रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन कक्ष इमारतीत बैठक पार पडली. महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
दिनांक १ जुलै २०२५ रोजीच्या विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असून देखील चुकीच्या प्रभागात नावे समाविष्ट करण्यात आल्याचे हरकतीद्वारे निदर्शनास आल्यास सक्षम प्राधिकारी यांनी तात्काळ स्थळपाहणी करून खातरजमा करावी आणि अंतिम निर्णय घ्यावा, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, कोकण विभागाच्या अपर आयुक्त श्रीमती फरोघ मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) श्रीमती अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर जिल्हा) श्यामसुंदर सुरवसे यांच्यासह परिमंडळ उप आयुक्त, सर्व विभागांचे सहायक आयुक्त तसेच प्रारुप मतदार यादी हरकत व सूचना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना तसेच आक्षेप येत आहेत. या हरकतींची विभागांच्या सहायक आयुक्तांनी स्वत: तपासणी करुन पडताळणी करावी. तसेच, या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी परिमंडळ उप आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुदतीत प्राप्त होणा-या हरकती व सूचनांचा निपटारा पारदर्शकपणे केला पाहिजे. हरकती, सूचना दाखल करण्यासाठी आलेले नागरिक तसेच राजकीय पदाधिका-यांचे म्हणणे व्यवस्थितपणे ऐकून घेतले पाहिजे. संवेदनशीलतेने सर्व प्रक्रिया हाताळताना माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश श्रीमती जोशी यांनी दिले.
विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार म्हणाले की, मतदारांच्या सोईसाठी महानगरपालिका मुख्यालय तसेच २४ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमध्ये मतदार सहायता केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहेत. संभाव्य दुबार मतदारांबाबत प्रत्येक सहायता केंद्रात माहिती देण्यात येईल. तसेच, दुबार मतदारांशी निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून संवाद साधला जाईल. प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना दिनांक ३ डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे. प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या हरकती व सूचनांची छाननी करुन निर्णय घेण्यासाठी विभागांच्या सहायक आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार, प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये जर काही लेखनिकांच्या चुका (नाव, लिंग, चुकीचे टंकलेखन), दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले आणि दिनांक १ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदार यादीत नावे असूनही संबंधित प्रभागात नाव समाविष्ट झालेले नाही, मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास त्याची नोंद 'मार्क कॉपी'मध्ये घेण्यात यावी. अशा बाबी स्वत:हून अथवा अन्य मार्गाने निदर्शनास आणण्यात आल्यास त्याची तात्काळ दखल घ्यावी. प्रभागवार अंतिम मतदार यादी तयार करताना त्या चुकांची दुरुस्ती करावी. संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत किंवा कसे याची तपासणी करावी. जर, मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असतील तर त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करावे, असे बालमवार यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या