अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल असलेली सुमारे 4 हजार कोटी किमतीची १६ एकर जागा उद्योगपती मुकेश अंबानी याना देण्याचा घाट घातला जात आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मुळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला चालवण्यास देण्याऐवजी स्वतः मुंबई महानगरपालिकेने चालवले पाहिजे, पण तसे न करता हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याने याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला.
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मागील काही महिन्यापासून प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएमसी व संबंधित यत्रणांकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु मुख्यमंत्री वा कोणत्याही यत्रणांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही है गंभीर आहे, सरकारला मुंबईकांच्या आरोग्याची चिंता नाही त्याना फक्त उद्योगपतीचे हित पहायचे आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेत प्रगत वैदयकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटन म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येउ शकते. असेही राजेश शर्मा म्हणाले.
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सध्या १५० बेड्स उपलब्ध असून त्यातील १२५ बेड्सच वापरले जात आहेत. या रुग्णालयात केसरी व पिवळे रेशनकार्ड धारक ७० रुग्णांवर दररोज किरकोळ उपचार केले जातात. एका पेशंटवर मुंबई महानगरपालिका ३० हजार रुपये खर्च करते हे लक्षात घेता महिन्याला ९ कोटी रुपये खर्च केला जातो. संपूर्ण १५०० खाटांची रुग्णसेवा सुरू करायची असल्यास महापालिकेला वर्षाला ४५० कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई महानगरपालिकेनेच हे रुग्णालय ताब्यात घेऊन केईएम, नायर, सायन हॉस्पिटलप्रमाणे सुरू ठेवले तर मुंबईकरांसाठी अत्यंत फायद्याचे ठरु शकते.
सेव्हन हिल्स हॉस्पिटल हे अंधेरीत मोक्याची जागी १६ एकर जागेवर आहे, १५०० बेड्सची क्षमता आहे, बाजारभावानुसार या जागेचे ३ हजार ते ४ हजार कोटी रुपये मुल्य होते. हॉस्पिटलच्या शिल्लक असलेल्या जागेत मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु करता येऊ शकते. एम्स सारखे सर्व वैद्यकीय सुविधांनीयुक्त असे हॉस्पिटल होऊ शकते. कोविड काळात याच रुग्णालयात ६० हजार पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत. हे रुग्णालय खाजगी कंपन्यांना देण्याचा राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून पडद्याआडून ते केवळ मुकेश अंबानी यांच्या कंपनीलाच कसे मिळेल याबाबत नियोजन होत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला.
--------------------------------------------------------------------------

0 टिप्पण्या