निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याचा निषेध करण्यासाठी तसेच लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं याकरिता शिवसेना, मनसे यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी आज मुंबईत विराट मोर्चा काढला. फॅशन स्ट्रीट चर्चगेट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, तसेच डाव्या पक्षांचे नेते यांच्यासह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे व राज्यभरातील लाखो नागरिक सहभागी झाले. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा. मतदारयाद्या अद्ययावत करा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत आवाज पोहचवण्याचा मोर्चा आहे. आत्तापर्यंत या विषयावर सगळे जण बोलले आहेत. मी पण माझी भूमिका मांडली आहे. या विषयावर आता नव्याने बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही सगळेजण अत्यंत ताकदीने मोर्चासाठी जमलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दुबार मतदार आहेत हे आम्ही सांगतो आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील हे सगळे सांगत आहेत. भाजपाचे लोक सांगत आहेत, अजित पवारांचे लोक सांगत आहेत एकनाथ शिंदेंचे लोक सांगत आहेत की दुबार मतदार आहेत. मग निवडणूक घेण्याची घाई का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. दुबार मतदारांबाबत केवळ आरोप नव्हे तर प्रत्यक्ष पुरावे राज ठाकरे यांनी सभेदरम्यान दाखवले. राज्य निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात हा विराट मोर्चा आहे. मतचोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्यांचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. अॅनाकोंडाला आपल्याला आता कोंडावंच लागेल. नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत. रोज कुठून तरी पुरावे येत आहेत. तरीही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग गप्प बसले. आपला पक्ष चोरला, नाव चोरलं, निशाणी चोरली माझे वडील चोरी करायचा प्रयत्न झाला आणि ते पण पुरलं नाही म्हणून आता मतचोरी करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की विरोधी पक्षांनी म्हणजे आपण कसा लाभ घेतला याचा पर्दाफाश करेन. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. मुख्यमंत्री जेव्हा असं बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांनी मतचोरी मान्य केली आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा, महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत आहे. अजितदादा बारामतीमध्ये असताना आपल्या परिवाराशी बोलतात तसे त्या सभेत बोलले. यावरून काही अक्कल नसलेले लोक ‘ट्वीट’ करीत आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करीत आहेत. अजित पवारांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणारे महामूर्ख आहेत. त्यांनी मुंबईतील रुग्णालयात जात आपल्या मेंदूची तपासणी करावी, दादांचं बारामती होमग्राउंड आहे, तिथल्या शेतकऱ्यांसोबत घरोबाच नातं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्मविश्वासाने ते बोलले. मात्र, त्यांचं व्यक्तव्य कसं चुकीचं आहे. हे दाखवण्यासाठी काहींचा प्रयत्न असतो. तेच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेली चमकोगिरी पाहायला मिळाली, मविआचा आज निघालेला मोर्चा हा महाराष्ट्राला मनोरंजन देणारा आणि हौशा- गौश्या- नवशांची हास्य जत्रा असल्याची टिका केली आहे. भविष्यातला पराभव पाहता हा मोर्चा होता, या हास्य मोर्चाचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र महाराष्ट्राला मनोरंजन देणारा आजचा हा मोर्चा निघाला - अमोल मिटकरी


0 टिप्पण्या