Top Post Ad

साहित्य चळवळीचे भाष्यकार डॉ. म. ना. वानखडे जन्मशताब्दी अभिवादन समारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तात्विक विचारांचे अधिष्ठान असलेले दलित साहित्य चळवळीचे अग्रगण्य भाष्यकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रास परिचीत असलेले  डॉ.म.ना. वानखडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने रविवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता क्रांतिदर्शी डॉ. म. ना. वानखडे यांचा जन्मशताब्दी समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज डॉ. म. ना. वानखडे विचार प्रसार मंचच्या वतीने प्रसार माध्यमांना देण्यात आली. मुंबई प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे लघुनाट्यगृह (५वा मजला), रविंद्र नाट्य मंदिर येथे हा समारंभ होणार आहे. 

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे असणार आहेत, यांसह या समारंभास वक्ते म्हणून प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ लेखक यशवंत मनोहर, डॉ. राजकुमार (प्राध्यापक, दिल्ली वि‌द्यापीठ), डॉ. व्ही राजुनायक (प्राध्यापक, हैद्राबाद वि‌द्यापीठ), व ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक डॉ. प्रज्ञा दया पवार हे सर्व उपस्थित असतील. या समारंभाचे आयोजन  डॉ. म. ना. वानखडे विचार प्रसार मंच च्या वतीने करण्यात आले आहे..   दलित वर्गास प्रामुख्याने साहित्यात स्थान मिळायला लागले ते स्वातंत्र्योत्तर काळात, परंतू या लिखाणात प्रस्थापित भाषाशैली व कुंपणावर बसुन केलेल्या समालोचनाची छाप होती. पारंपारिक स्वभाषित-स्वबोलीत आणि स्वानुभवाधारीत दृष्टिने असलेली कमतरता यावर सर्वप्रथम भाष्य केले ते डॉ. वानखडे यांनी. 

यामुळेच डॉ. वानखडे यांना विसरून दलित साहित्य चळवळ पुढे वाटचाल करू शकत नाही. अश्या परिस्थितीत नवोदीत लेखक, साहित्यकार, भाष्यकार तसेच नवीन पिढीत डॉ. म. ना. वानखडे यांच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच डॉ. म. ना. वानखडे यांच्या समय कार्यकर्तृत्वास अभिवादन करावयाच्या हेतूने हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर विचार प्रसार आणि दलित नवलेखकांसाठी प्रबोधनात्मक परंतु तितकाच नवयुगीन माध्यमांधारीत तंत्रज्ञानाच्या मार्गाने पुढे जाण्याची गरज ओळखून, ऑनलाईन dmnwankhade.com या वेबसाईटचे उ‌द्घाटन व लोकार्पण देखिल या समारंभात करण्यात येणार असल्याचे डॉ. म. ना. वानखडे विचार प्रसार मंचा‌द्वारे जाहिर करण्यात आले आहे. तसेच, या समारंभाच्या निमित्ताने प्रतिकात्मक कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी व समाजात आत्मसन्मानाने जगण्यासाठी एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व  अनुभूती चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक सुश्री दीपा पवार यांचा  सत्कार देखील होणार आहे.

डॉ. म. ना. वानखडे यांचा संक्षिप्त जीवनपरीचय
डॉ. म. ना. वानखडे यांचा जन्म १९२४ मध्ये अमरावती जिल्ह्यातील थुगाव येथे झाला. महावि‌द्यालयीन काळात ते एक हुशार विद्यार्थी होते. अमरावतीच्या एडवर्ड कॉलेजमध्ये इंटरआर्ट्स मध्ये पहिले स्थान मिळवल्याबद्दल त्यांना एन. के. बेहेरे पुरस्कार मिळाला होता. तसेच १९४५ मध्ये नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी. ए. (ऑनर्स इंग्लिश) साठी माधवराव चांदोरकर सुवर्णपदक देखील मिळाले होते. १९६५ मध्ये त्यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा वि‌द्यापीठातून साहित्यात पीएचडी केली. त्यांना औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजचे संस्थापक डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी इंग्रजीचे प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून नियुक्त केले. अमेरिकेत शिक्षण घेत असताना डॉ. म. ना. वानखडेयांना अमेरिकेत वंशवादाचा सामना करणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांनी केलेल्या साहित्यिक बंडाने प्रभावित केले. 

त्यांना अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना होणाऱ्या वंशवाद आणि भारतातील दलितांना होणाऱ्या सामाजिक भेदभावाची समांतरता जाणवली. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांनी भारतीय समाजातील प्रचलित जातीय भेदभाव आणि पक्षपाता विरुद्ध ज्वलंत लेखन केले आणि दलित साहित्यिक बांधवांना, दलितांना होणाऱ्या सामाजिक भेदभावा विरुद्ध प्रखरतेने आणि निर्भयपणे लिहिण्याचे स्पष्ट आवाहन केले. "दलितांचे विद्रोही वाङ्मय" हे पुस्तक त्यांच्या लेखन आणि भाषणांचे संकलन आहे. १९७८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असताना ५४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तथापि, त्यांच्या निधना नंतर त्यांच्या लेखन आणि भाषणांचा दलित साहित्यावर खोल आणि कायमचा प्रभाव पडला. 

शैक्षणिक कामगिरी व्यतिरिक्त, त्यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण टप्पे असे होते :
(क) १९५७-६२: प्राचार्य, मिलिंद कॉलेज, औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर)
(ख) १९६२ : सदस्य, उच्च माध्यमिक मंडळ, पुणे.
(ग) १९६६-६८ : अधिष्ठाता, कलावि‌द्या शाखा, मराठवाडा विद्यापीठ.
(घ) १९६७ : दलित लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी "अस्मितादर्श" मासिकाचे संस्थापक संपादक,
(ङ) १९६८-७३ : सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी).
(च) १९७३ : सदस्य, साहित्य अकादमी (मराठी मंडळ), दिल्ली.
(छ) १९७३-७८ : अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी).
(ज) १९७४ : सदस्य, व्ही. सी. नियुक्ती समिती, नागपूर वि‌द्यापीठ.
(झ) १९७७-७८ : सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ, मुंबई.
(ट) १९७६ : अध्यक्ष, पहिले दलित साहित्य संमेलन, नागपूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com