कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथील कर्मचारी राजेंद्र कदम यांनी ३५ वर्षे कक्ष सहाय्यक म्हणून सेवा बजावून २८ जुलै रोजी निवृत्ती घेतली. निवृत्ती कार्यक्रमात त्यांनी आपल्या वैचारिक परंपरेनुसार सहकारी कर्मचाऱ्यांना भेट म्हणून प्रबोधनकार ठाकरे लिखित “देवळाचा धर्म, धर्माची देवळे” आणि दिनकरराव जवळकर लिखित “देशाचे दुश्मन” ही दोन पुस्तके दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी परिचारिका ईश्वरी बुरांबे , श्रिजा सावंत , सहाय्यक अधिसेविका माया गिरी व इतर १९ महिला कर्मचारी यांनी राजेंद्र कदम यांना बोलावून या पुस्तकांचे वाटप का केले, अशी विचारणा केली. त्यानंतर या पुस्तकांना “घाणेरडे आणि विकृत” असे म्हणत त्या त्यांच्या अंगावर फेकण्यात आली आणि माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि दिनकरराव जवळकर हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील विचारवंत असून त्यांच्या लेखनाचा आदर संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो. प्रबोधनकारांची “ब्राम्हण्यांचा इतिहास, कोंदड्याचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, खरा ब्राम्हण, देवळाचा धर्म व धर्माची देवळे” ही पुस्तके आणि दिनकरराव जवळकरांचे “देशाचा दुश्मन” हे पुस्तक समाजजागृतीसाठी ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील “देशाचा दुश्मन” या पुस्तकासाठी न्यायालयात वकील म्हणून मांडणी केली होती. अशा या दोन्ही लेखकांच्या पुस्तकांचा अपमान करणे, तसेच त्यांना “घाणेरडे व विकृत” म्हणणे हा केवळ या विचारवंतांचा अपमान नसून संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही तुडवणारा प्रकार असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. “तुम्हाला पुस्तके नको होती, तर शांतपणे परत करू शकत होतात. मात्र अपमान करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे हा संपूर्ण शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा अपमान आहे,” असे संभाजी ब्रिगेडचे मत आहे.संभाजी ब्रिगेडने या तीनही महिला कर्मचाऱ्यांना ईश्वरी बुरांबे, श्रिजा सावंत आणि माया गिरी यांना कस्तुरबा रुग्णालयातून त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. अन्यथा “संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करेल” असा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी राजेंद्र कदम यांची भेट घेतली असून, ब्रिगेड संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे संभाजी ब्रिगेड मुंबई प्रदेश सचिव प्रवक्ता प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या