मुंबईसाठी देणगी असलेला मरीन ड्राइव्ह परिसर नैसर्गिक अंगाने नितांत सुंदर आहे. मुंबईकरांची पहाट आरोग्यदायी आणि सायंकाळ आल्हाददायक करण्यात भर घालणारा हा परिसर आपण अधिक सुंदर ठेवायला हवा. नरिमन पॉईंटपासून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) पर्यंत आणि त्यापुढील परिसराचे सौंदर्य अधिक खुलविण्यात सातत्य ठेवा, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केल्या. आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसराची गगराणी यांनी पायी फिरून पाहणी केली. या पाहणीप्रसंगी त्यांनी महानगरपालिका अधिकारी, पोलिस अधिकारी यांना विविध सूचना केल्या. महानगरपालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, पोलिस उप आयुक्त प्रशांत परदेशी, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, महानगरपालिकेचे संबंधित सहायक आयुक्त, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
मरीन ड्राइव्ह परिसरात खूप उपाययोजना केल्या तरी देखील काही नागरिक दुभाजक ओलांडतात. या समस्येवरही तोडगा काढण्याबाबत गगराणी यांनी महानगरपालिका आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) परिसरातील छोटी चौपाटी येथील बांधकाम साहित्य काढून तेथे स्वच्छता राखावी. तसेच या ठिकाणी रस्त्यालगत असलेली पोलिसांची चौकी तेथून हटवून मागील छोटी चौपाटी येथील बांधकामात स्थलांतरीत करावी, असे निर्देश गगराणी यांनी दिले. याच बांधकामात प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, तसेच गिरगांव चौपाटीकडून येणाऱ्या नागरिकांसाठी येथे येण्यासाठी छान पायवाट साकारावी, इत्यादी विविध सूचना त्यांनी केल्या.नरिमन पॉईंट परिसरातील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) परिसरात अनावश्यक असलेले रस्तारोधक (बॅरिकेड्स) काढून टाकण्याबाबत श्री. गगराणी यांनी सूचना केली. या परिसराला मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. त्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसर अधिक सुटसुटीत आणि स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा. अनावश्यक असलेले सूचनाफलक काढून टाकावेत. मरीन ड्राइव्ह परिसरात पायी चालण्याची जागा, नागरिकांसाठी आसन व्यवस्थेकरिता बाकडे सुस्थितीत ठेवा, जेणेकरून पायी चालून दमलेले नागरिक येथे काही वेळासाठी विसावा घेवू शकतील. परिसरातील विजेच्या खांबांवर वाहिन्या लोंबकळणार नाहीत, याची काळजी घ्या. या खांबांची वेळोवेळी रंगरंगोटी करा. दिव्यांग नागरिकांच्या व्हिलचेअरसाठी असलेली जागा अधिक सुटसुटीत ठेवा, या परिसरातील दुभाजक सतत स्वच्छ ठेवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे आयुक्त म्हणाले.
‘आरे’चे स्टॉल आणि त्यांची रंगरंगोटीमध्ये साम्य ठेवायला हवे. हा परिसर आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक सुविधा पुरवाव्यात. संपूर्ण परिसरात महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणीही कोणतेही फलक, पोस्टर्स लावणार नाही, याची काळजी घ्यावी, मरीन ड्राइव्ह परिसर महानगरपालिकेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. त्याची काळजी घेणे, तो सतत स्वच्छ, सुंदर आणि पर्यटनदृष्ट्या निसर्गरम्य ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असेही आयुक्त श्री. गगराणी यांनी आवर्जून नमूद केले. मरीन ड्राइव्ह परिसरात पारशी गेटवर प्रकाश राहील, अशा पद्धतीने तेथे दिव्यांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी केल्या.

0 टिप्पण्या