सन १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतातील लुप्त पावलेला बौद्ध संस्कृतीला पुनर्जीवित करीत आपल्याला आपल्या मूळ संस्कृतीकडे विचारांकडे नेण्याचे काम केले. कारण बाबासाहेबांना माहित होते कि देशाला समतावादी आणि विज्ञानवादी विचारांची गरज आहे आणि हेच विचार समाजातून पसरवले गेले पाहिजेत. आणि त्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांनी सतत एकाद्या ठिकाणी एकत्र येता आले पाहिजे, कारण वारंवार एकत्र येण्याने धम्म विचारांचा प्रचार-प्रसार, किंवा त्यासाठी येणाऱ्या अडचणी याच्यावर चर्चा घडून उपाय योजना आखल्या जातील आणि सोबतच त्यासाठी ठिकठिकाणी बौद्ध विहारांची निर्मिती व्हावी असे बाबासाहेबांची इच्छा होती तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा मूळ मंत्र दिला. त्यांच्या मते बुद्ध विहार हे केवळ धार्मिकस्थळ नसून, ते संघर्षाचे, चळवळीचे आणि एकजुटीचे केंद्र आहेत. आणि यामाधुनच समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजनैतिक विचारांची दारे उघडी करून देता आली पाहिजे.
साल २०१९, कोविड-१९ महामारीने संपूर्ण जगाला एका अर्थाने कुलूप लावले. त्यानंतर जग पूर्वपदावर आले खरे, पण 'सोशल डिस्टन्सिंग' या नवीन आजाराने आपल्याला ग्रासले आहे. हाच आजार आपल्या बुद्ध विहारांनाही ग्रासतोय का, असा प्रश्न पडतो. परंतु आजची परिस्थिती पाहता अनेक विहारांना कुलूप लावलेले दिसून येते. हे कुलूप केवळ ठराविक वेळेला, काही विशिष्ट लोकांच्या मर्जीने उघडले जाते. इतकेच नव्हे तर काही विहारांचा वापर राजकीय पक्ष सरकारी अनुदान उपलब्ध करून देत राजकीय लाचारीच त्या ठिकाणी निर्माण करून ठेवली आहे. तर काही ठिकाणी धम्म विचारापेक्षा नेत्याचीच हुजरेगिरी पाहायला मिळते.यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आपण शिक्षण, धम्म ज्ञान घेतले, यानंतर तिथे सर्वांनी संघटित व्हायला पाहिजे होते, तिथे त्याच संघर्षाच्या केंद्रांनाच कुलूप लावले जात आहे. आणि हे कुलूप विहारांना नसून, विचारांना लावण्याचा प्रयत्न तर नाही ना, असाही प्रश्न मनात येतो. स्वतःच्या स्वार्थासाठी हे करणे कितपत योग्य आहे? बाबासाहेबांनी मनुवाद्यांना दाखवून दिले होते की, आपला समाज जागा झाला तर काय होऊ शकते. कदाचित ही भीती अजूनही त्यांना असावी. पण आपलेच लोक लाचारी पत्करून जर मनुवाद्यांना साथ देत असतील, तर हे कितपत घातक आहे. याचाही विचार केला गेला पाहिजे. कोविड-१९ वर उपचार उपलब्ध आहे, पण या ideological distancing 'विचारांना कुलूप लावण्याच्या' आजारावर उपचार नाही. ही फक्त गुलामगिरी आहे, ज्या गुलामगिरीतून महामानवाने आपल्याला मुक्त केले. आपण पुन्हा त्याच दिशेने चाललो आहोत का?
बाबासाहेबांनी आपल्याला प्रश्न विचारण्याचा जो अधिकार दिला आहे, तो वापरण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा, भविष्यात फक्त अंधकार आणि गुलामगिरीच दिसेल. जर वेळीच विहाराचा योग्य त्याप्रकारे वापर आणि आदर केला गेला नाही तर विहारांना निष्क्रिय व अकार्यश्रम होण्यापासून वेळ लागणार नाही. म्हणून वेळीच काही सुधारणा करण्यात याव्यात अशी माझी वयक्तिक इच्छा आहे . १. विहारांची दारे सतत खुली असली गेली पाहेजेत शक्यतो रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कुलूप लावले गेले तरी चालतील. २. विहारामध्ये दैनिक पेपर आणि पुर्स्तके ठेवली गेली पाहिजेत. ३. सर्व जातीसामुहातील लोकांकरिता (कर्मकांड विरहित) येण्यास, बसण्यास, चर्चा, अभ्यास करण्यास मुभा असावीत. ४. समाजातील तरुण पिढी चौकात, टपरीवर गप्पा मारत बसण्यापेक्षा विहारातील दैनंदिन कामात किंवा त्याच्या जवळील असलेल्या विचारणा वाव किंवा चालना मिळणाऱ्या गोष्टीसाठी त्याला प्रोत्साहन देण्यात यावे. जेणे करून त्याचा चौकातील जाणारा फालातुचा वेळ धम्म किंवा समाजकार्यासाठी उपयोगी पडेल, आणि इतर व्यसनापासून देखील दूर राहण्यास मदतच मिळेल.
५. एखाद्याच्या घरी पाहुणे मंडळी आलेले असेल तरी देखील किंवा विहार जवळील घरात सुखादुखाचे कार्य असताना देखील लांबून येणाऱ्या लोकांसाठी बसण्यास विहारांची दारे खुली असावीत. ६. विहारात येणाऱ्या लोकांना व्यसन, जेवण, झोपणे, खेळ आणि इतर प्रकारची धार्मिक कर्मकांड करण्याची मुभा सोडून मुक्तपणे वापर करण्याची संधी प्राप्त करून द्यावी. ७. भिक्कू संघाचा आदरतिथ्य पाहुणचार करण्यासाठी कधीच व कोणत्याही विहारांची दारे बंद नसावीत. इतकेच काय आपल्या भागातील किंवा इतर बाहेरून आलेल्या आदरणीय भंते याच्या राहण्याची, बसण्याची व प्रवचन उपलब्ध करण्याची सोय करण्यात यावी. ८. इतर लोकांचा वावर झाल्याने विहार कमिटी चा विहारावरील अधिकार संपुष्टात येतील आणि इतर कोणीतरी विहारावर राज्य करेल या भीतीने असो कि, मी बांधलेल्या विहारावर माझाच अधिकार आहे आणि तो अधिकार मी माझ्या मर्जी प्रमाणे विहाराचा वापर करण्यासाठी वापरणार अश्या संकोचित विचाराने विहारांची वाटचाल नसावी.

0 टिप्पण्या