ठामपा परिक्षेत्रातील प्राथमिक शाळांमध्ये केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त माध्यमातून पंतप्रधान शालेय पोषण आहार सेवाभावी संस्थामार्फत पुरवला जातो. मात्र १६ जूनला शाळा सुरू होऊनही ०४ ऑगस्टपासून विद्यार्थ्याना शालेय खिचडी दिली जात आहे. अशीच परिस्थिती गणवेष, स्काऊट गाईडचा गणवेष आणि शैक्षणिक साहित्य वाटपात असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. मनपा शाळां तसेच खाजगी विनाअनुदानित व अनुदानित शाळांवर नियंत्रण ठेवण्याकरिता मंजुर पर्यवेक्षकांची संख्या सहा असताना सद्यस्थितीत ५ पदे रिक्त आहेत. ठाणे शिक्षण विभागामध्ये अधिक्षकासह आठ गट प्रमुख आणि २४ केंद्र समन्वयकाची पदे रिक्त आहेत. चार वरिष्ठ लिपिकांपैकी ३ पदे रिक्त तर १६ लिपिकांपैकी केवळ आठच कार्यरत आहेत. शिपायांची मंजुर पदे ११२ असून सद्यस्थितीत केवळ ४५ शिपाई कार्यरत आहेत. शिक्षण समितीच्या मुख्य कार्यालयात १८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मंजुर असताना सातच कर्मचारी आहेत. शाळांमध्ये ८५६ शिक्षकांची पदे मंजुर असताना १७४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्यामुळे पालिकेला तासिकेवर शिक्षकांची नियुक्ती करावी लागल्यामुळे मनपा शाळेतील पटसंख्या ७२ हजारावरून ३० हजारावर आली आहे.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, तर शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मुलभूत हक्क आहे. परंतु ठाण्यात शिक्षण व्यवस्थाच कोलमडली असुन विद्यार्थी व शिक्षक उपाशी आणि सरकारी अधिकारी मात्र तुपाशी असल्याचा आरोप ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. शाळांची दुरावस्था झालीच आहे. त्याचबरोबर एकही शालेय योजना धड सुरू नसुन महायुती सरकारने विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांपासुन देखील वंचित ठेवत एकप्रकारे ठाण्यात शिक्षणाच्या आयचा घो... करून ठेवला आहे. तेव्हा, उपमुख्यमंत्र्याच्या ठाण्यातच जर अशी अवस्था असेल तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे काय धिंडवडे निघत असतील. याकडे लक्ष वेधुन काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले आहेत. ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील शिक्षण समिती तसेच मनपा व खाजगी, अनुदानित व विनाअनुदानीत शाळांच्या विविध समस्या तसेच सरकारच्या अपयशी धोरणांबाबत वाचा फोडली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जे. बी. यादव, रविंद्र कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत, संगीता कोटल व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले. ठाणे मनपा क्षेत्रामध्ये एकूण ७६९ खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व मनपा शाळां असुन त्यात ९५ प्राथमिक तर ७ माध्यमिक अशा एकुण १०२ शाळा ठाणे महापालिकेच्या तर २०९ खाजगी अनुदानित आणि ५६० विनाअनुदानित शाळा आहेत. २०१४ साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारने शिक्षण समितीमार्फत कारभार हाकण्यास सुरुवात केली. मात्र, तेव्हापासुनच शैक्षणिक अधोगती सुरु झाल्याकडे विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधले. ठामपा शाळांच्या एकूण ७६ इमारतीपैकी सद्यस्थितीत ६९ इमारती कार्यरत असुन उर्वरीत ७ शाळांची दुरवस्था बनल्याने विद्यार्थ्याना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागते. ठाणे महापालिकेला ३५९ कोटी ३४ लाख इतके अनुदान प्राप्त होते, तरीही विद्यार्थी व शिक्षकांच्या हाती धत्तुरा मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असुन स्वतः मुख्यमंत्र्यानीच या अव्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या