मुंबईकर नागरिकांना विविध स्वरुपाच्या रक्त चाचण्या अत्यल्प दरात आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करुन देणे, हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा अविभाज्य घटक आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १०० आरोग्य संस्थांमध्ये दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून आपली चिकित्सा योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच, महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘आपली चिकित्सा’ ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांमध्ये बाह्यस्रोताद्वारे (Out-Source) नागरिकांना नाममात्र दरात रक्त चाचणी सुविधा उपलब्ध करून देणे, हा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजना अंतर्गत, मूलभूत व प्रगत तपासण्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे तसेच विलेपार्ले स्थित डॉ. रू. न. कूपर रुग्णालय व जोगेश्वरी स्थित हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय यांचा समावेश आहे.
दरम्यान, जून २०२५ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार 'लाइफनिटी हेल्थ' या संस्थेची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे. 'आपली चिकित्सा' योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असणा-या व तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार ६६ मूलभूत तपासण्या व १७ प्रगत अशा ८३ तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे.दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून ‘आपली चिकित्सा’ योजनेचा प्रारंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १०० आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे.*दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून • १६ उपनगरीय रुग्णालये • ३० प्रसूतिगृहे • ५ विशेष रुग्णालये • डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय • एचएचबीटी ट्रॉमा रुग्णालय • विभाग ‘ए’ ते ‘ई’ मधील सर्व महानगरपालिका दवाखाने या ठिकाणी सेवा कार्यान्वित होणार आहे: महानगरपालिकेच्या धोरणांतर्गत रुग्णांना रक्त चाचणी अहवाल व्हॉट्स ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली (HMIS) द्वारे सर्व रुग्णांच्या माहितीचे संकलन, व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या