प्रसारमाध्यमांना माहिती देताना उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) तथा प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे म्हणाले की, वरळी, वांद्रे, धारावी, वेसावे (वर्सोवा), मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), गावदेवी, हाजीअली, प्रभादेवी, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, खेरवाडी, वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी), सांताक्रूझ, माटुंगा, वडाळा, शीव – कोळीवाडा, अंधेरी पूर्व, वेसावे, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पूर्व, जुहू, विलेपार्ले पश्चिम, ओशिवरा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी परिसरातील लोकसंख्येला फायदा होणार आहे, असे ताम्हाणे यांनी नमूद केले.
उप प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे म्हणाले की, या प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती देखील केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची स्थापत्यविषयक प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. सन २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांमध्ये पावसाळ्यातही कामे होतील, अशारितीने नियोजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प ठरवलेल्या कालावधीत पूर्ण होतील. स्थापत्य कामांनी पकडलेला वेग लक्षात घेता संयंत्रांची मागणी, खरेदी या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर स्थापत्य कामे, संयंत्रे असूनही कामगार, कर्मचारी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल, असे मेंगडे यांनी नमूद केले.
*वरळी मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* वरळी येथे सुमारे ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे होवून उभारणीने वेग घेतला आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती ३४.४ टक्के झाली आहे. या मलजल प्रक्रिया केंद्राची रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम सुएझ अल्ट्राफॉर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास दिनांक ३० मे २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी दिनांक ०५ जुलै २०२२ पासून हे काम सुरू झाले आहे. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी हा ५ वर्षे असून प्रचालन व परिरक्षण कालावधी पुढील १५ वर्षे आहे. तंत्रज्ञान प्रदाता सुएझ वॉटर टेक्नॉलॉजीज अँड सोल्यूशन्स (इंडिया) प्रायव्हेलट लिमिटेड हे आहेत. तर, प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स आयव्हीएल इंडिया एन्व्हायर्नमेंटल आर अँड डी प्रा. लि. जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये मेम्ब्रेन बायो रिअॅक्टर (एमबीआर) हे तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.
*वांद्रे स्थित मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक सुमारे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती ३४.७८ टक्के झाली आहे. केंद्राची रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम कंत्राटदार मेसर्स लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांना दिनांक ३१ मे २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी दिनांक ०५ जुलै २०२२ पासून काम सुरू झाले. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी हा ५ वर्षे इतका तर प्रचालन व परिरक्षण कालावधी त्यापुढे १५ वर्षे आहे. तंत्रज्ञान प्रदाता सुएझ वॉटर टेक्नॉलॉजीज अँड सोल्यूशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत. तर, प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स आयव्हीएल इंडिया एन्व्हायर्नमेंटल आर अँड डी प्रा. लि. हे जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये मेम्ब्रेन बायो रिअॅक्टर (एमबीआर) हे तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.
*वेसावे (वर्सोवा) मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* वेसावे (वर्सोवा) येथे सुमारे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाची भौतिक प्रगती ३२.१५ टक्के झाली आहे. या मलजल प्रक्रिया केंद्राची रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम मेसर्स डिआरएन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंत्राटदारास दिनांक ३१ मे २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी निर्मिती करण्याचे काम दिनांक ०५ जुलै २०२२ पासून सुरू झाले आहे. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी हा ४ वर्षे असून प्रचालन व परिरक्षण कालावधी त्यापुढील १५ वर्षे आहे. तंत्रज्ञान प्रदाता मेसर्स झायलेम वॉटर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत. तर, प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स लिमिटेड जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये सिक्वेन्सि्यल बॅच रिअॅक्टर तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.
*घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* घाटकोपर येथे सुमारे ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाची भौतिक प्रगती ४२.०० टक्के झाली आहे. या मलजल प्रक्रिया केंद्राची रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम मेसर्स जीव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड या कंत्राटदारास दिनांक ३१ मे २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी निर्मिती करण्याचे काम दिनांक ०५ जुलै २०२२ पासून सुरू झाले आहे. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी ४ वर्षे असून प्रचालन व परिरक्षण कालावधी त्यापुढील १५ वर्षे आहे. तंत्रज्ञान प्रदाता मेसर्स एसएफसी एनव्हायरोन्मेंटल टेक्नॉलॉजिस लिमिटेड हे आहेत. तर, प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड हे जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये एसबीआर तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.
*भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* भांडुप येथे सुमारे २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाची भौतिक प्रगती ५१.३० टक्के झाली आहे. या मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम संयुक्त उपक्रम मेसर्स जेडब्यूआयएल ओएमआयएल एसपीएमएल या कंत्राटदारास दिनांक १३ जुलै २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी दिनांक २३ ऑगस्ट २०२२ पासून काम सुरू झाले आहे. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी ४ वर्षे असून प्रचालन व परिरक्षण कालावधी त्यापुढील १५ वर्षे आहे. तंत्रज्ञान प्रदाता मेसर्स रोठवेल वॉटर कंपनी लिमिटेड आहेत. प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स लिमिटेड जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये कॉन्स्टंट लेवल कन्टिन्युअस फ्लो सिक्वेंन्शियल बॅच रिअॅक्टर तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.
*मालाड स्थित मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* मालाड परिसरात सुमारे ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती २८ टक्के झाली आहे. केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम कंत्राटदार मेसर्स एनसीसी लिमिटेड यांना दिनांक ३० मे २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी निर्मितीचे काम दिनांक ०५ जुलै २०२२ पासून सुरू झाले आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी ६ वर्षे इतका तर प्रचालन व परिरक्षण कालावधी त्यापुढील १५ वर्षे आहे. प्रकल्पाचे सल्लागार म्हणून झायलेम वॉटर सॉल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये सिक्वेन्सि्यल बॅच रिअॅक्टर तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.
*धारावी स्थित मलजल प्रक्रिया केंद्राची माहिती* धारावी परिसरात सुमारे ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम वेगाने सुरू आहे. प्रकल्पाची भौतिक प्रगती ३३.४० टक्के झाली आहे. केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम संयुक्त उपक्रम मेसर्स वेल्सपन ईडॅक प्रा. लि. यांना दिनांक २७ मे २०२२ रोजी प्रदान केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी निर्मितीचे काम दिनांक ०५ जुलै २०२२ पासून सुरू झाले. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी ५ वर्षे इतका तर प्रचालन व परिरक्षण कालावधी त्यापुढे १५ वर्षे आहे. प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स लिमिटेड जबाबदारी सांभाळत आहेत. या प्रकल्पामध्ये सिक्वेन्सियल बॅचिंग रिअॅक्टर तंत्रज्ञान प्रस्तावित आहे.


0 टिप्पण्या