Top Post Ad

नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप आमचा नाही... शेतकऱ्यांच्या विषयावर नाना पटोले आक्रमक

 भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

    शेतकरी प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर नाना पटोले यांना विधिमंडळातून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले, त्यानंतर विधिमंडळ परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. भाजपा युती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान करतात, आधी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. नंतर कर्जमाफीचे पैसे मुलामुलींच्या लग्नाला वापरा अशी वायफळ बडबड केली तर आता बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतात, शेतकऱ्यांच्या घरच्यांना कपडे, मोबाईल हेही मोदी देतात असे विधान केले. २०१४ च्या आधी लोणीकर कपडे घालत नव्हते काय?, नंगे फिरत होते का?, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतमालाला हमी भाव देऊ, शेतीला २४ तास मोफत वीज देऊ अशी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि आता शेतकऱ्यांचा अपमान करतात. हा सत्तेचा माज आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. शेतकऱ्यांची लढाई लढत राहणार, आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न डगमगता शेतकऱ्यासाठी लढत राहू. शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर व मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, असेही नाना पटोले म्हणाले.

 पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले.या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा म्हणून घोषणाबाजी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

राज्यात आज शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे, दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्याविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा करतात.लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही यावरूनच त्यांचे समर्थनच सरकार करत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही,निलंबन करतात. शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करू ,तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू अशी आक्रमक भूमिका काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com