दादर स्थित छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) याठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २९ जुलै २०२५) भेट दिली. मैदान, पदपथ आणि परिसराच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांशी श्री. गगराणी यांनी संवाद साधला. मैदान परिसरात सुधारणा तसेच नियमित देखभाल, दुरूस्ती तसेच स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात; परिसरातील कट्ट्यांची दुरूस्ती करतानाच पुरेशा प्रकाश व्यवस्थेच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश. गगराणी यांनी विभागाच्या अधिकाऱयांना दिले. स्थानिक आमदार महेश सावंत, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त. विनायक विसपुते आदी याप्रसंगी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील पदपथांची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यात यावी. झाडांचे कठडे व्यवस्थित करतानाच सोप्या आणि आकर्षक रंगसंगतीने ते सुशोभित करावेत. तसेच बाक सुस्थितीत असावेत. जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने सुलभ आसन व्यवस्थेचे नियोजन करावे, अशा सूचना देखील. गगराणी यांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी संपूर्ण कट्टा काही वर्षांपूर्वी सुशोभित करण्यात आला होता. कट्ट्यावर विविध रंगसंगती असलेल्या चौकोनी आकाराचे तुकडे (चिप्स) लावण्यात आले आहेत. ते बदलून पूर्वीसारखा कट्टा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली. स्थानिकांच्या सूचनेचा विचार करत याठिकाणी योग्य ती डागडुजी करावी. तसेच नियमितपणे कट्ट्याची देखभाल व दुरुस्ती करावी, असे निर्देश गगराणी यांनी दिले.
मैदान परिसरातील धुळीच्या विषयाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त. गगराणी म्हणाले की, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय.आय.टी. मुंबई) च्या तज्ज्ञांच्या मदतीने धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. या परिसरात हिरवळीसाठी गवत लागवडीचे काम आय.आय.टी. तज्ज्ञांच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन धूळ प्रतिबंधात्मक आणखी उपाययोजना करण्यात येतील, असे गगराणी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधताना सांगितले.
माहीम किल्ला परिसराला भूषण गगराणी यांनी भेट दिली. सदर किल्ला हा पुरातन वास्तू असून किल्ल्याचे जीर्णोद्धार व पुनरुज्जीवन करावयाच्या उपायोजना व परिसराचे सुशोभीकरण या बाबी एकत्रित विचारात घ्याव्यात. भविष्यात सदरचे ठिकाण मुंबईत येणाऱया पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे प्रेक्षणीय स्थळ म्हणून कशाप्रकारे विकसित करता येईल याचा विचार व्हावा, अशा सूचना श्री. गगराणी यांनी दिल्या.

0 टिप्पण्या