Top Post Ad

... शेवटी आर्य समाजप्रणित जात-पात-तोडक मंडळाने नियोजित अधिवेशनच रद्द केले

 Annihilation of caste हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरलेला आहे. वास्तविक पाहता हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचे अध्यक्ष म्हणून न दिलेले भाषण होय. आर्य समाजप्रणित जात-पात-तोडक मंडळ या संस्थेने त्यांच्या लाहोर येथील वार्षिक परिषदेसाठी डॉ. आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्यांचे लिखित भाषण वाचल्यानंतर मंडळाला त्यातील काही मुद्दे आवडले नाहीत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुद्द्यांवर माघार घेण्याचे नाकारले आणि ते आपल्या लिखित भाषणावर ठाम राहिले. शेवटी मंडळाने त्यांचे नियोजित अधिवेशनच रद्द केले. बाबासाहेबांनी सदर भाषणाचे महत्त्व लक्षात घेऊन ते पुस्तकरूपाने प्रसिध्द केले.

जातीचे स्वरूप, जातीचे आधार, जतिसंस्थेचे समाजावर झालेले अनिष्ट परिणाम, जतिसंस्थेने आपल्यासमोर निर्माण केलेली आव्हाने आणि जातीच्या उच्चाटनाचे उपाय यावर या पुस्तकातून सखोल विचार मांडलेले आहेत. जाती संस्थेविषयी एवढी मूलगामी मांडणी आतापर्यंत क्वचितच कोणी केलेली असावी. डॉ. आंबेडकर यांच्या या सूत्रबद्ध मांडणीतून त्यांच्या विचारांची स्पष्टता, तर्कशुद्धता, क्रांतिकारकता, वैचारिक धाडस आणि त्यांनी घेतलेला जातीचा मूलगामी वेध या वैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो. बाबासाहेबांच्या अत्युत्कृष्ट ग्रंथांपैकी एक, असा हा छोटेखानी ग्रंथ आहे. या ग्रंथाचे आतापर्यंत अनेक मराठी अनुवाद प्रकाशित झालेले आहेत. मीही आजपासून या ग्रंथाच्या एका एका परिच्छेदाचा क्रमाने अनुवाद सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक परिच्छेदाखाली चर्चा या शीर्षकाखाली अक्षरश: चर्चाच करणार आहे. हा अनुवाद फार स्वैर नसला तरी तो प्रत्येक वेळी शब्दशः ठेवता आलेला नाही.
Part 1 -
Friends, I am really sorry for the members of the Jat-Pat Todak Mandal who have so very kindly invited me to preside over this conference. I am sure they will be asked many questions for having selected me as the president. The Mandal will be asked to explain as to why it has imported a man from Bombay to preside over a function which is held in Lahore. I believe the Mandal could easily have found someone better qualified than myself to preside on the occasion. I have criticised the Hindus. I have questioned the authority of the Mahatma whom they revere. They hate me. To them I am a snake in their garden. The Mandal will no doubt be asked by the politically minded Hindus to explain why it has called me to fill this place of honour. It is an act of great daring. I shall not be surprised if some political Hindus regard it as an insult. This selection of mine certainly cannot please the ordinary religiously minded Hindus.
मित्रांनो, जात-पात तोडक मंडळाच्या सदस्यांनी मला मोठ्या प्रेमाने या परिषदेचा अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले आहे, याबद्दल मला खरोखरच वाईट वाटते. याचे कारण, मला अध्यक्ष म्हणून निवडल्यामुळे त्यांना अनेक प्रश्न विचारले जातील, याची मला खात्री आहे. लाहोरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी मंडळाने मुंबईतून माणूस का आणला, याचा खुलासा करण्यास त्यांना सांगितले जाईल. मला विश्वास आहे की मंडळाला या परिषदेच्या अध्यक्षपदासाठी माझ्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती सहजपणे मिळाली असती. मी हिंदूंवर टीका केलेली आहे. तसेच ते ज्या महात्म्याला पूजनीय मानतात त्या महात्म्याच्या अधिकारावर मी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हिंदू लोक माझा द्वेष करतात. त्यांच्यासाठी मी त्यांच्या बागेतला साप आहे. मंडळाने या मानाच्या जागेसाठी माझी का निवड केली, याचे स्पष्टीकरण राजकीय मानसिकतेचे हिंदूं त्यांच्याकडे मागतील, यात शंका नाही. मंडळाचे हे एक धाडसाचे कृत्य आहे. राजकीयदृष्टीने विचार करणाऱ्या काही हिंदूंनी हा त्यांचा अपमान मानला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. माझी ही निवड सर्वसामान्य धार्मिक वृत्तीच्या हिंदूंना नक्कीच आवडणार नाही.

चर्चा -
1. जात पात तोडक मंडळ ही सुधारणावादी विचारांच्या आर्य समाज या धार्मिक संघटनेची एक शाखा आहे. लाहोर येथील या संघटनेने जाती, पाती तोडण्याच्या कामाला वाहून घेतले होते. संतराम हे या संघटनेचे एक महत्त्वाचे क्रियाशील नेते होते. त्यांच्याच पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या संघटनेच्या 1936 मध्ये होणाऱ्या वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले होते. आंबेडकरांनी त्यांच्या या अधिवेशनासाठी करावयाच्या नियोजित भाषणाच्या शेवटी, ते हिंदू धर्म सोडणार असल्याचा ओझरता उल्लेख केला होता. तो उल्लेख काढावा, असे मंडळाने बाबासाहेबांना सूचित केले होते. बाबासाहेबांनी या गोष्टीला नकार दिला होता. मंडळाच्या म्हणण्यानुसार या कारणामुळेच हे अधिवेशन रद्द करण्यात आले होते. मला वाटते, आंबेडकरांनी जातीबरोबरच चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर कडक टीका केली होती. तसेच जातीला धर्मग्रथांनी मान्यता दिल्यामुळेच जातीला अधिकृतता मिळाली आहे, असे त्यांचे मत होते. जातीचे निर्मूलन करायचे असेल तर जातीला अधिकृतता देणाऱ्या या ग्रंथांची मान्यता नष्ट करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली होती. चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे, (त्यांच्या मते कर्मावर आधारित असलेल्या) समर्थन करणाऱ्या जात-पात-तोडक मंडळाला त्यांच्या अधिवेशनात या प्रकारचे अध्यक्षीय भाषण मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच त्यांनी हे अधिवेशनच रद्द करून टाकले असावे. त्याचे कारण मात्र आंबेडकरांनी सदर भाषणात हिंदू धर्म सोडण्याचा उल्लेख केला, हे सांगण्याचे ठरविण्यात आले आले असावे.

2. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड करताना मंडळाचे प्रभावशाली सदस्य संत राम यांचा पुढाकार असण्याची शक्यता आहे. परंतु त्यावेळी बरेच धार्मिक प्रवृत्तीचे हिंदू बाबासाहेबांना अनुकूल नव्हते. त्यामुळे मंडळाला आपल्या निवडीसाठी टीकेला तोंड द्यावे लागेल, असा बाबासाहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याचे आढळते.
3. त्या वेळी महात्मा गांधींची लोकप्रियता शिगेला पोचली होती. आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्यावर वेळोवेळी कठोर टीका केली होती. त्यामुळेही बरेच हिंदू बाबासाहेबांवर रागावलेले होते. या गोष्टीची आंबेडकरांना जाणीव असल्याचे त्यांच्या भाषणावरून लक्षात येते.

4. बागेतील साप - ही संकल्पना बहुतेक बायबलवरून घेतली असण्याची शक्यता आहे. बायबलच्या कथेनुसार देवाने निर्माण केलेल्या इडन गार्डनमध्ये आदम आणि ईव्ह विहार करीत होते. देवाने त्यांच्यासाठी सगळं काही दिले होते. परंतु बागेतील ज्ञानवृक्षाचे फळ खाण्यास मात्र देवाने प्रतिबंध घातला होता. परंतु सैतानाने सापाचे रूप धारण करून ईव्ह हिला ते फळ खाण्यासाठी मोहित केले. ईव्हने ते आदमलाही खायला दिले. ते फळ खाल्यामुळे त्यांना बऱ्या वाईटाचे ज्ञान झाले. आणि देवाची आज्ञाभंग केल्यामुळे त्यांचे इडन गार्डनमधून तत्काळ पतन झाले.
मला वाटते अध्यात्मिकदृष्ट्या देवाने त्यांना निर्माण केले, तेव्हा ते निर्विकारी, म्हणूनच सुख दुःखापलीकडील अवस्थेत होते. परंतु फळ खाल्यामुळे ते लौकिकातील सुख दुःखाच्या चक्रात अडकले गेले. आंबेडकरांनी येथे या कथेचा अर्थ व्यावहारिकदृष्ट्या लावल्याचे दिसून येते. त्यांनी हिंदूंना त्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांना त्यांच्या बऱ्या वाईटाचे ज्ञान दिले. त्यामुळे येथे हिंदूंचे कल्याणच होणार होते. परंतु हिंदूंना ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना आंबेडकर म्हणजे इडन गार्डनमधील साप वाटले असावेत.
आंबेडकरांना येथे ही कथा अभिप्रेत नसल्यास, त्यांच्या भाषणातील वाक्याचा अर्थ, हिंदूंना आंबेडकर म्हणजे हिंदूंचे वाईट करणारा आणि त्यांचे आसपासच राहणारा साप असल्याचे वाटते, असा करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com