संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांनाच दोषी ठरवले होते. खंडपीठात दाखल याचिकेवर सोमनाथ यांच्या कुटुबीयांकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तीवाद केला होता. या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने पोलिसी कार्यपद्धतीवरच ताशेरे ओढले गेले. मात्र, महायुती सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारला सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने हाच आदेश दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. हा महायुती सरकार आणि परभणीतील पोलीस यंत्रणेला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या, मी परभणी वकील संघ, औरंगाबाद वकील संघ, मुंबई उच्च न्यायालय वकील संघ आणि प्रकाश आंबेडकर या सर्वांची आभारी आहे. प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी खंबीरपणे उभे राहून मला न्याय मिळवून दिला. या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं आहे, त्याने बलिदान दिलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचं बलिदान वाया जाऊन दिले नाही, यासाठी मी त्यांची आभारी आहे, पोलिसांनी घरात शिरुन दारं तोडून मारहाण केली. सोमनाथचं इन कॅमेरा शवविच्छेदन झाले होते, ते खरं झालं होतं. त्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. कोणाच्या लेकरावर ही वेळ येऊ नये. माझा मुलगा वकील होणार होता. माझ्या लेकराला डांबून नेऊन पोलिसांनी मारलं मात्र, राज्य सरकारने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाला चार दिवस मारहाण करुन पोलीस कोठडीत ठेवलं. माझ्या लेकराला हाडं तुटेपर्यंत बेदम मारलं, पोलिसांनी माज्या लेकराचा खून केला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या,परभणीमध्ये १० डिसेंबर २०२४ रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली. बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले, ज्यात मृत सोमनाथ सूर्यवंशीलाही अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत गूढ मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती. सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, सोमनाथच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत, असे सांगत सोमनाथ यांच्या आईने ही मदत नाकारली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईला रडू कोसळले.

0 टिप्पण्या