कोकणात प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांवर गेल्या १९ जुलै रोजी एस.टी. महामंडळाने ग्रुप पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ३०% जादा भाडे आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी कोणतीही पूर्वसूचना न देता २२ जुलैपासून सुरू करण्यात आली, ज्यामुळे हजारो गणेशभक्तांना मोठा आर्थिक फटका बसू लागला. या निर्णयाविरोधात प्रवासी संघाने तत्काळ निषेध व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एस.टी. महामंडळाच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत ३०% अतिरिक्त भाडेवाढ रद्द करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले. परिणामी, एस.टी. महामंडळाला एक दिवसाच्या आत आपला निर्णय मागे घ्यावा लागला. अखेर प्रवासी संघाच्या तीव्र विरोधानंतर ही ३०% अतिरिक्त भाडेवाढ मागे घेण्यात आली असल्याची माहिती ”कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ, मुंबई यांच्यावतीने अध्यक्ष रविंद्र मुकनाक, कार्याध्यक्ष दीपक चव्हाण, प्रमुख संघटक चंद्रकांत बुदर व अनिल काडगे, कोषाध्यक्ष विश्वनाथ मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ही भाडेवाढ रद्द करण्यात यश मिळाल्यामुळे गणेशभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पत्रकार परिषदेत दीपक चव्हाण म्हणाले, “एस.टी. महामंडळ खिडकीवर किंवा ऑनलाईन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५% सवलत देतो आणि ग्रुप प्रवाशांकडून मात्र ३०% अधिक भाडे घेतो – हा विरोधाभास असह्य होता. आम्ही वेळेत आवाज उठवला नसता, तर प्रवाशांना अन्यायकारक दर सहन करावा लागला असता.” गौरी-गणपती कालावधीत वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची देखील भेट घेतली होती. मंत्री महोदयांनी सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. या यशस्वी लढ्याबद्दल दीपक चव्हाण यांनी माध्यमांचेही आभार मानले. “माध्यमांनी या विषयाला योग्य प्रसिद्धी दिली, म्हणूनच सरकारने दखल घेतली. हा सामूहिक विजय आहे,” असे ते म्हणाले. या मोहिमेत भास्कर चव्हाण, अनिल आगरे, रणजित वरवटकार आणि गणेश फिलसे यांनीही मोलाचे योगदान दिले.
0 टिप्पण्या