पत्रकारितेच्या इतिहासात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आता पत्रकार भवनामध्ये नाट्च शुक्रवार या नवीन सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात होत आहे. याची अधिकृत घोषणा आज प्रसिद्धी माध्यमांच्या उपस्थितीत करण्यात आली. दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रायोगिक नाटकांचे मोफत सादरीकरण पत्रकार भवन येथे होणार आहे. नवोदित व प्रायोगिक रंगकर्मीसाठी हा रंगमंच खुला असून, नाट्यप्रेमींना याचा निःशुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे. मात्र ज्यांना ऐच्छिक मदत द्यायची असेल त्यांनी जरूर मदत करावी. त्यांसाठी दानपेटी उपलब्ध असणार आहे. असे संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्यासह विश्वस्त देवदास मटाले, मी भारतीय या दीर्घाकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता रविंद्र देवधर, पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, कार्यवाह शैलेंद्र शिर्के उपस्थित होते. .
याबाबत अधिक माहिती देतांना संदिप चव्हाण पुढे म्हणाले, ‘मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळ देणं आणि नव्या प्रयोगशील नाटकांना मंच मिळवून देणं, हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचा मूळ हेतू आहे. पत्रकार संघ केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर समाजातील उपक्रमशील घटकांसाठीही एक प्रेरणास्थान असावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ या उपक्रमाला ‘इंडियन ऑईल’चे प्रायोजकत्व लाभले असून या उपक्रमात सादरीकरण करणार्या नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्पे १० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. तसेच संघाचे सभागृह पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या नाट्य शुक्रवार उपक्रमाचे संचलन करण्यासाठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले यांच्या नेतृत्वाखाली रविंद्र देवधर आणि नयना रहाळकर यांची समिती स्थापन करण्यात आली असून, नाट्य शुक्रवार अंतर्गत प्रायोगिक रंगभूमीची नाटके स्वीकारण्याचा अंतिम निर्णय ही समिती घेईल, अशा तऱ्हेने या अभिनव संकल्पनेचा तपशीलवार परिचय अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी करून दिला.
0 टिप्पण्या