राज्य पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि तडफदार अधिकारी किशोर शिंदे यांची बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने त्यांच्या पोलीस प्रशिक्षणातील बॅचमेट्सनी सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.या भेटीत भुषण जाधव, जयदेव वानखडे आणि गोविंद कासले हे त्यांचे बॅचमेट्स सहभागी झाले होते. त्यांनी किशोर शिंदे यांच्या नेतृत्वगुणांचे, कार्यक्षमतेचे आणि जनतेशी असलेल्या प्रभावी संवाद कौशल्याचे कौतुक केले.
किशोर शिंदे यांनी यापूर्वी अंबरनाथ पोलीस ठाण्यात ‘पोलीस निरीक्षक (गुन्हे)’ या पदावर कार्यरत असताना अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला होता. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलीस आयुक्तांकडून प्रशंस्तीपत्रही देण्यात आले होते. त्यांनी आतापर्यंत पोलीस विभागात विविध ठिकाणी सेवा बजावताना अनेक गुन्हे उकलले असून समाजाभिमुख आणि संवेदनशील कार्यशैलीसाठी त्यांची ओळख आहे.
सदिच्छा भेटीदरम्यान किशोर शिंदे यांनी सांगितले की, “बदलापूरसारख्या गतिमान आणि विकसित होत असलेल्या शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या विश्वासास पात्र राहणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल.”
त्यांच्या या नियुक्तीमुळे पोलीस खात्यात आणि बदलापूर शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याचे कार्य अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि जनहितकारी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

0 टिप्पण्या