डॉ. रावसाहेब कसबे यांचा हि लेख असता तर...
डॉ. अर्चना जाधव यांनी "क्रांतिदर्शी डॉ. म. ना. वानखडे जन्मशताब्दी कृतज्ञता" ग्रंथ पाठवून दिला. ग्रंथ मी लगेचच वाचून काढला. डॉ. म.ना. वानखडे सरांचे विषयी एक चांगली चर्चा व विवेचन हा ग्रंथ वाचताना लक्षात येते. डॉ. यशवंत मनोहर यांनी बऱ्यापैकी मेहनत घेवून सदरचा ग्रंथ साकारला आहे. डॉ. मनोहर यांनी त्यांच्या मिलिंद मधील कॉलेज प्रवेशापासून तर पैठण कॉलेजला त्यांना प्राध्यापक म्हणून पाठवण्याचा डॉ. वानखडे सरांविषयी गोड किस्सा कथन केला आहे. तसेच वानखडे सरांचा नैतिक दरारा काय होता? ते कसे शिस्तप्रिय होते, हे सांगितलेले आहे. ते नविन पिढीसाठी फारच प्रेरणादायी असेल एवढे नक्की. अनेक मान्यवर लेखक, विचारवंत, तसेच म.ना. वानखडे यांच्या कुटूंबातील लोकांनी आठवणी सांगून त्यांची कुटूंबाविषयी आस्था, तळमळ व्यक्त केलेली आहे. या ग्रंथामध्ये डॉ. वंदना महाजन यांच्या लेखाने एक उंची गाठलेली, म्हणजे लेख लिहण्यासाठी त्यांनी चांगली मेहनत घेतली आहे असे दिसते. रा. ग. जाधव, डॉ. भालचंद्र फडके यांनी डॉ.म.ना. वानखडे यांचे विषयी पुर्वी लिहलेले, आज पुन्हा लोकांना कळणार आहे. रा. ग. जाधव, डॉ. भालचंद्र फडके हे डॉ.म.ना. यांना पाहिलेले, समजलेले विचारवंत आहेत.
डॉ. म.ना. यांच्या अनेक पैलूवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. अर्जुन डांगळे, ज.वी. पवार हे दोन पॅथर चळवळीतील नेते, साहित्यिक, कवी यांचेही लेख आहेत. डांगळे यांनी बाबुराव बागुल यांच्या बरोबर आम्ही कसे डॉ. म.ना. कडे जायचो हे सांगून त्यांची साहित्याविषयी असलेली आस्था विषद केली आहे. डॉ. वानखडे हे अर्थातच दलित पँथर निर्मितीत सिंहाचा वाटा असलेले गृहस्थ आहेत हे मान्य करावे लागेल. ब्लॅक लिटरेचरची सुरवात भारतात डॉ. वानखडेमुळे झाली हे वास्तव असताना ते स्विकारण्यासाठी आढेवेढे घेणारे खरच डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे पाईक होते का? असा प्रश्न उभा राहतो. एकंदरीत दलित चळवळीत डॉ. वानखडे यांचे योगदान नाकारता येणार नाही ही वस्तुस्थिती असताना अलिकडे डॉ. म. ना. वानखडेंचा उल्लेख टाळला जात होता, तो या ग्रंथामुळे टाळता येणार नाही. ज. वि. पवार यांनीही यात लेख लिहून माहिती दिली आहे. खरंतर पवार यांचे या अगोदरही पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीत किती विश्वासाहर्यता आहे? हे राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे यांनी पुस्तक लिहून दाखवून दिलेले आहे. म्हणजेच ज.वि. पवारांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे जरा कठीणच आहे.
अर्थात असे लिखाण चळवळीसाठी घातक असून, त्यांचा चळवळीवर विपरित परिणाम होतो तथा चळवळी विषयी संशय कल्लोळ निर्माण केला जातो. परंतु सामान्य वाचकांना हा इतिहास वाटू लागतो. खरंतर डॉ. वानखडेंना समजून घेणे त्यावेळी बऱ्याच जनांना अवघड होते. कारण की तेवढी बौध्दीक क्षमता त्यांच्यात आलेली नव्हती. डॉ. बाबासाहेबांनी मुलाखत घेवून निवडलेला माणुस ७१-७२ मध्ये बाराखडी म्हणून लिहणाऱ्यांना काय कळणार हे वास्तव आहे. याविषयी डॉ. जे. एम. वाघमारे यांचा लेख जास्त उद्दबोधक आहे. त्यांनी मांडलेले सर्व संशोधनात्मक आहे. तर वानखडे सरांविषयी दिलेली माहिती ही वर्णनात्मक कुठेच दिसत नाही. सरांच्या कुशाग्र बुध्दीमतेची अलोट अशी मांडणी आहे. डॉ. जे.एम. वाघमारे यांच्याशी सरांनी केलेली चर्चा, दिलेल्या सुचना, दिलेला विषय, त्या विषया बद्दल वानखडे सरांना असलेली आस्था दलित चळवळीच्या इतिहासातील महत्वाचा भाग आहे. हे वाघमारे सरांच्या लेखातून सिध्द होते.
डॉ. यशवंत मनोहर सरांनी त्यांच्या काळातील किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वानखडे सरांचा प्रभाव होता. तसेच त्यांचे मार्गदर्शन कसे असायचे हे सांगताना डॉ.म.ना. वानखडे हे जसे शिक्षक होते, तसेच ते एक कुटूंब वत्सल नागरिक ही होते. कुटूंबाची काळजी घ्यावी म्हणून जसे प्रत्येक सदस्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवले तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या रोपट्यांची निगा राखून त्यांचा वटवृक्ष कसा करता येईल याकडे लक्ष दिलेले आहे, हे स्पष्ट होते. मिलिंद महाविद्यालयात येणाऱ्या मुलांना साहित्य चळवळीत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याचे काम सरांनी केल्याचे बऱ्याच लेखकांच्या लेखातून दिसून येते. अनेक लेखकांनी त्याच त्याच मुद्यांना हात घातलेला दिसतो. खरंतर खोलात जावुन मागोवा घेवून लिहिता आले असते, तसे दिसत नाही. डॉ. वानखडे सरांच्या कुंटूंबातील सर्वच लोकांनी सरांच्या आठवणी सांगून त्यांचे गुण सांगितलेले आहेत. तसेच त्यांचा प्रेमळ स्वभाव वर्णन करून म. ना. वानखडे सर वाचकांच्या समोर उभे केले आहेत.
एकुण ६३ लेखकांनी हा ग्रंथ सजवलेला आहे. डॉ. वानखडे सरांच्या एकंदरीत बऱ्यापैकी पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे. त्यामुळे डॉ. वानखडे यांची उंची ही काय होती हे कळते. जेष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल त्यांचे वर्णन "ते प्रखर बुध्दीमत्ता असलेला विद्वान असे करायचे" अर्थातच बागुल त्यांचे वर्णन असे करायचे ते वानखडे सर खरंच किती बुध्दीवान असतील याचा अंदाज येतो. कारण बागुल ऐरैगैऱ्याला बुध्दीवान म्हणणार नाहीत त्यांच्या अनेक आठवणी ते सांगायचे. त्या आठवणींमध्ये ते पुर्णतः गुंतून जायचे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आलेखच समोर ठेवायचे. बाबुराव बागुल यांच्या 'सुड' या दीर्घ कथेला लिहिलेली सरांची प्रस्तावना जर वाचली तर या विद्वानाची उंची कळते. मी मिलिंदचा विद्यार्थी असल्याने सरांविषयी प्रा. ल. बा. रायमाने, प्रा. अविनाश डोळस, प्रा. मनोहर झिल्टे, प्रा.जे.जी. खैरनार हे सतत सांगायचे तर पुढे बाबुराव बागुल यांच्याकडून ऐकण्याचे भाग्य मिळाले खरंतर या ग्रंथात डॉ. रावसाहेब कसबे यांचाही लेख हवा होता, तसेच प्रा. प्रकाश शिरसाठ या चळवळीतील सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याचाही लेख असायला हवा होता. या उणिवा मला तरी जाणवल्या आहेत. डॉ. रावसाहेब यांच्या माहितीने नक्कीच सरांची तात्विक बाजू मांडली गेली असती. कारण आज तरी तात्विक मांडणी व स्पष्टीकरण करणारे लेखक बुध्दीवंत अभावाने दिसतात.एकंदरीत पुस्तकाचे मुख्यपृष्ठ, बांधणी, टाईप, कागद या सर्वच गोष्टींनी शोभा वाढवलेली आहे. नविन संशोधकांना हा ग्रंथ एक संदर्भासाठी नक्कीच कामी येईल. तसेच समग्र दलित चळवळ काय असते याचाही वाचकांना अंदाज येईल. आम्ही गेली चार वर्षांपासून प्राचार्य म. भि. चिटणीस, डॉ. म.ना. वानखडे, लेखक बाबुराव बागुल यांच्या नावाने बाबुराव बागुल यांच्या स्मृतीदिनी स्मृती पुरस्कार देत असतो. या वर्षी म.ना. वानखडे सरांच्या स्मृती दिनी ठाणे (मुंबई) येथे आदरांजली कार्यक्रम घेतला होता. डॉ. बाबासाहेब यांच्या नंतर हया तीनच नावांनी आंबेडकर वाद पुढे नेलेला आहे हे आम्ही सांगत होतो, त्याला या ग्रंथाने पुष्टी मिळाली एवढे नक्की.
- अॅड. नाना अहिरे
- सचिव- डॉ. आंबेडकर राईटर्स असोशिएशन
- मो.९८२०८५५१०१

0 टिप्पण्या