मॅडम, तुम्हाला मनापासून सलाम !
"मुलांनो, महामानवांचा आदर्श घेतला पाहिजे. आदर्श कुणाचा घ्यावा? शिवाजीसारख्या महामानवाचा घ्यावा."
कार्यक्रमात प्रमुख वक्ते बोलतात आणि काही मुलं सभागृहाबाहेर पडतात. थोड्या वेळाने झुंडच कॉलेजमध्ये येते. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला, असा हल्लागुला सुरू होतो. त्या झुंडीसमोर एक प्राध्यापिका उभी राहते आणि त्यांना समजावून सांगते. ती संदर्भ देते कॉ. गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचा. झुंड ऐकत नाही. ती राडा करते. प्राचार्या माफी मागतात. स्टाफ माफी मागतो; पण ही प्राध्यापिका माफी मागायला नकार देते. झुंड तिच्या अंगावर धावून येते. तिला 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी दमदाटी करते. ती बधत नाही. पोलिसात तक्रार होते. पोलीस अधिकारी FIR दाखल करण्याची धमकी देतो. संस्थेला सांगतो की तुम्ही मॅडमवर कारवाई करा. मॅडमची गाडी फोडली जाते. पाठलाग केला जातो. संस्था प्राध्यापिकेची बदली करते. प्राध्यापिका ती स्वीकारते; पण माफी मागत नाही. ती उच्च न्यायालयात जाते. लढते. अनेक महिने जातात आणि अखेरीस न्यायालय त्यांच्याविरुद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढतं. कोर्ट पोलिसांना खडसावतं. "ही कसली लोकशाही?" असा संतप्त सवाल कोर्ट विचारतं. पोलीस अधिकाऱ्याने संस्थेला दिलेलं पत्र मागे घ्यायला लावतं. या प्राध्यापिकेला न्याय मिळतो.
सातारा पुरोगामी चळवळीसाठी प्रसिद्ध.
रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची.
अध्यक्ष कोण तर शरद पवार !
संदर्भ कोणता तर कॉ. पानसरेंचा.
शिवाजी कोण होता, या प्रसिद्ध पुस्तकाचा.
याच पानसरेंची हत्या होते आणि त्यांचा संदर्भ दिल्याबद्दल एका प्राध्यापिकेला छळाला सामोरं जावं लागतं. वर्षभर कोर्टाची पायरी चढायला लागते !
केवळ दुर्दैवी आहे हे !
प्रा. आहेर यांची रवींद्र पोखरकर यांनी मुलाखत घेतली आहे. जरूर पहा. त्यात त्या म्हणाल्या, मी माफी मागितली असती तर कॉ. पानसरेंचा अपमान ठरला असता. ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आलं.
प्रा. मृणालिनी आहेर मॅडम,
तुम्हाला मनापासून सलाम !
येत्या १० ऑगस्टला आहेर मॅडमचा सत्कार आहे पुण्यात. सलोखा संपर्क गटाने हा सन्मान कार्यक्रम आयोजित केला आहे. मूळ घटना १० ऑगस्टलाच घडली होती. ऑगस्ट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर या सन्मानाला विशेष अर्थ आहे. ज्यांचा संदर्भ दिला त्या कॉ. पानसरे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रा. मेघा पानसरे यांच्या हस्तेच हा सन्मान होणार आहे, हा काव्यात्म न्याय आहे !
अशी काही माणसं असतात म्हणून विचार टिकतो. हा महाराष्ट्र या परिवर्तनवादी परंपरेच्या वटवृक्षावर उभा आहे, याचं भान आपण ठेवूया.
-
श्रीरंजन आवटे

0 टिप्पण्या