वारी ही अत्यंत महत्त्वाची लोकपरंपरा आहे यात शंकाच नाही. आजही तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा लोकोत्सव आहे, हेही खरे आहे. परंतु... वारी फक्त 15 दिवसांची असते. उरलेल्या 350 दिवसांचे काय ? 15 दिवसांच्या वारीला भागवत धर्म म्हणतात. उरलेल्या 350 दिवसांचा धर्म कोणता ? या दिवसात वारकरी स्वतःला कोणत्या धर्माचे मानतात ? वारीत चालताना एकमेकांशी चांगले वागणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना मिठ्या मारणे, एकमेकांच्या पाया पडणे, एकमेकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे इत्यादी गोष्टी आपुलकीने केल्या जातात. उरलेल्या 350 दिवसात या लोकांचा एकमेकांशी होणारा व्यवहार वारीच्या 15 दिवसात असतो तसाच आणि तितक्याच आपुलकीचा असतो का ? या प्रश्नांची उत्तरे काय आहेत ?
वारकरी हा मुख्यतः हिंदूधर्मीय आहे. त्यात शेतकरी/ शेतमजूर आहे. कष्टकरी/ कामगार आहे. मध्यमवर्गीय आहे. ओबीसी- बहुजन आहे. हा वारकरी ज्यावेळी वारीत जातो त्यावेळी तो स्वतःला भागवत धर्माचा मानतो आणि घरी- गावात परत आला की आपोआप हिंदू होतो. याचा अर्थ तो एकधर्मीय नाही, दोनधर्मीय आहे. तो हिंदूधर्मीयही आहे आणि भागवतधर्मीयही आहे. गंमत म्हणजे हे दोन्ही धर्म वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी आहेत. याचाच अर्थ असा की, प्रत्येक वारकरी दोन परस्परविरोधी धर्मात विभागलेला आहे. याचाच अर्थ तो दुभंगलेला आहे. त्यामुळे त्याची विचारसरणी, जीवननिष्ठा हे सारेच दुभंगलेले आहे. हे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व घेऊन तो आयुष्यभर जगतो. या दुभंगलेपणामुळेच तो वारीत एकमेकांना मिठ्या मारताना जातपात बघत नाही आणि गावात आला की जातपात बघून अंतर दोन हात राखायचे की चार हात हे ठरवतो.याच दुभंगलेपणामुळे तो वारीत भागवत धर्माचा उच्चार करतो आणि घरी आला की गणपती बसवतो, सत्यनारायण घालतो, त्यासाठी ब्राह्मणाला बोलावतो, त्याच्या आज्ञेबरहुकूम सगळे धार्मिक- सांस्कृतिक सोपस्कार पार पाडतो. याच दुभंगलेपणामुळे तो वारीत समता/ मानवता मानतो आणि गावात "सैराटसदृश्य शेवट" करायला मागेपुढे पाहात नाही. या दुभंगलेपणाची असंख्य उदाहरणे गावागावात आणि घराघरात आहेत. वारीत एकमेकांशी चांगले वागणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना मिठ्या मारणे, एकमेकांच्या पाया पडणे, एकमेकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे हे सारे होत असले तरी मुळात या सर्व गोष्टी बाह्य आहेत. त्या बाहेरच्या बाहेर करायच्या आहेत आणि घरी परत येताना वाटेतच टाकून द्यायच्या आहेत. गावात परतल्यावर, घरी आल्यावर घरात, गावात, भावकीत हे सारे "उद्योग" त्याच भक्तिभावाने, तेवढ्याच निष्ठेने कुणी करते का ? याचे उत्तर "नाही" आहे. वारीत जात न बघता मिठी मारली जाते, पण गावात आल्यावर जात न बघता मुलासाठी/ मुलीसाठी लग्नाचे स्थळ शोधले जाते का ? याचेही उत्तर "नाही" आहे.
थोडक्यात, अस्थायी स्वरूपात, थोड्या दिवसांसाठी पुरोगामी होण्याची नामी संधी वारीच्या माध्यमातून हिंदूंना मिळते आणि त्यातून हिंदू धर्माचे ग्लोरीफिकेशन होते. याचा सरळ, उघड आणि संपूर्ण फायदा विनासायास वैदिकांच्या पदरात पडतो. भागवत धर्माच्या (म्हणजे बौद्ध धर्माच्या) जोरावर हिंदू धर्माचे ग्लोरीफिकेशन करायचे, त्याची 350 दिवसांत काळवंडलेली प्रतिमा वारीच्या 15 दिवसांत सहिष्णू, समतावादी, सर्वसमावेशक करायची, "वैष्णवांची मांदियाळी" असे काव्यात्म वर्णन करत करत या उजळलेल्या प्रतिमेचे श्रेय अलगदपणे वैदिक कंपूने घ्यायचे, त्या आधारे सगळ्यांवर अहंकारी पावशेर ठेवायचा, त्या बळावर हिंदूंच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व प्रसंगांवर आणि त्यांच्या एकूण धार्मिक- सांस्कृतिक जीवनावर वर्चस्व राखायचे, असा हा क्रमवार कावा आहे. विशेष म्हणजे, हा कावा राबविण्यासाठी वैदिकांना खूप यातायात करावी लागते आहे, असे नाही. त्यांना हे सारे सहज शक्य होत आहे.
कारण ठरला आहे केवळ एक शब्द ! हा शब्द आहे - हिंदू ! या शब्दाने वैदिकांचे सगळे काम सोपे करून टाकले आहे. "हिंदू" या प्रदेशवाचक शब्दाचे धर्माच्या नावात रूपांतर करून, त्या नावाची आयडेंटिटी सगळ्यांच्या माथी मारून, तिच्यात सर्व प्रकारची परस्परविरोधी मतमतांतरे समाविष्ट आहेत असा आभास निर्माण करून वैदिकवर्चस्ववादी किमया शांतपणे साधली जात आहे आणि तिला झाडून सगळे बळी पडत आहेत. त्यात तमाम साध्याभोळ्या बहुजनांचा आणि एरव्ही अतिशय तल्लख वगैरे असलेल्या पुरोगाम्यांचा समावेश होतो. ही "बळीप्रथा" थांबविणे अजिबात अवघड नाही. मात्र त्यासाठी "हिंदू" हा शब्द वैदिक धर्मसंस्कृतीचा संरक्षक कवच म्हणून कसे बेमालूमपणे काम करतो, हे समजून घ्यावे लागेल. शिवाय भागवत धर्म म्हणजे नक्की कोणता धर्म, याचा शोध घेऊन त्याचे उत्तर स्वीकारण्याची भूमिका अंगीकारावी लागेल.
भागवत धर्म हा दुसरातिसरा काही नसून बौद्ध धर्मच आहे, हे आजवर असंख्य मान्यवरांनी निःसंदिग्धपणे दाखवून दिले आहे. "श्रीविठ्ठल : एक महासमन्वय" या ग्रंथात संत साहित्य-संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात, "ज्ञानदेव- नामदेवांच्या काळाला निकटपूर्वी सतत हजार- दीड हजार वर्षे सारा महाराष्ट्र भगवान बुद्धाच्या अनुयायांनी व्यापलेला होता. महाराष्ट्रातील अशी एकही पर्वतराजी नाही, की जिथे बौद्धांनी आपल्या गुंफा खोदल्या नाहीत. सह्यगिरीच्या कुशीतील या शेकडो गुंफातून बौद्ध भिक्षू ‘बुद्धं सरणं गच्छामि’ हा घोष अखंड घुमवीत होते. अहिंसेच्या अन् करूणेच्या महामंत्राचे पडसाद मराठी भूमीच्या अणुरेणूतून उमटत होते. राजपुरुषांपासून कृषक- कारागिरांपर्यंत सारा समाज या वीतराग- भिक्षूंच्या सेवेसाठी त्याग करायला सिद्ध असल्याचे पुरावे अभिलेखांत आजही उपलब्ध आहेत. भिक्षू हा आदराचा विषय बनलेला होता. त्या आदराची निदर्शक म्हणून भिकोबा अन् भिकूबाई ही स्त्री-पुरुषांची नावे खेडोपाडी प्रचलित झालेली होती.
ज्ञानोबा- तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करुणेचा महापूर महाराष्ट्रभर पसरविला, त्या इंद्रायणीचा उगम तथागताच्या करुणामय जीवितातून स्फूर्ती घेणार्या असंख्य भिक्षूंच्या निवासभूमीत झालेला आहे, हे सत्य सहजी डावलता येण्यासारखे नाही. जे का रंजले गांजले, त्यांना जो ‘आपले’ म्हणेल, तोच साधू आहे अन् त्याच्याच ठायी देव नांदत आहे, असे मानणारे तुकोबा हे उभ्या मानवजातीशी जिव्हाळ्याचे नाते जोडतात, ते या परंपरेच्या पाठबळानेच! आणि म्हणूनच मला असे नि:संकोचपणे म्हणावेसे वाटते की, महाराष्ट्रात हजार- दीड हजार वर्षेपर्यंत नांदलेल्या भगवान बुद्धाने आपल्या हृदयातील करुणेचा कमंडलू बाराव्या- तेराव्या शतकात जाता जाता इथे उपडा केला अन् मग त्याची धारा हृष्ट- पुष्ट होऊन वाहती राहण्यासाठी संतांनी आपल्या भावभक्तीचेे अनेकानेक प्रवाह तिच्यात मिळवले. बौद्ध धर्म भागवत धर्माच्या रुपाने पुन्हा अवतरला."
"भागवत" हा शब्द बुद्धाच्या "भगवान" या उपाधीवरून तयार झालेला आहे, हे पाली- संस्कृत भाषेचे अभ्यासक असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी अनेकदा म्हटलेले आहे. "सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध" या गाजलेल्या ग्रंथात ते लिहितात, "भागवत संप्रदायाचे ‘भागवत’ हे नाव ‘भगवत्’ या शब्दापासून आले आहे. ‘भगवत्’ हा शब्द भारताच्या इतिहासात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांना उद्देशून वापरण्यात आला होता. यावरून भागवत संप्रदायाला बुद्धांच्या विचारांतूनच प्रेरणा मिळाली, हे उघड आहे. शंकराचार्यांनी भागवत संप्रदायाला अवैदिक का मानले आणि भागवत संप्रदायानेही अहिंसा वगैरे तत्त्वे का उचलून धरली, याचा उलगडा या ऐतिहासिक वास्तवातून होतो. पुढच्या काळात या संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात वैदिकीकरण घडविण्यात आले."
खरेतर, केवळ भागवत संप्रदायच नव्हे, तर नाथ संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, महानुभाव संप्रदाय इ. संप्रदायांचे बौद्ध धर्माशी जवळचे नाते आहे. मराठी विश्वकोशात ‘बुद्ध’ या शीर्षकाखाली पुढीलप्रमाणे नोंद करण्यात आली आहे - "बुद्धाने जन्मजात उच्चनीचता अमान्य करून कर्मावरच उच्चनीचता अवलंबून आहे हे आग्रहाने प्रतिपादन केले आणि ह्याचा परिणाम म्हणून महाभारत (शांतीपर्व अध्याय 254, उद्योगपर्व 43.27.29) व भागवत (1.8.52, 7.11.35, 9.2.23) यासारख्या ग्रंथांतून त्याची विचारसरणी ब्राह्मण वर्गालाही मान्य होऊ लागल्याचे स्पष्ट दिसते. हीच विचारसरणी मध्ययुगात रामानंद, चैतन्य महाप्रभू, कबीर, सिद्ध संप्रदाय, नाथ संप्रदाय, एकनाथ, तुकाराम, लिंगायत (वीरशैव), महानुभाव ह्यांच्या वाड्.मयातून आजच्या वारकरी पंथापर्यंत येऊन पोहचते."
साधू, संत, भक्ती यासारखे भागवत संप्रदायात आज प्रचलित असणारे असंख्य शब्द बौद्ध धम्मातील असून पाली भाषेत त्यांचे मूळ आहे. ही भाषा गौतम बुद्धाच्या अनुयायांनी जपलेली, वाढविलेली भाषा होती. अलीकडच्या काळात संपूर्ण भारतभर आणि जगभर प्रसिद्ध झालेले, आकर्षणाचा विषय ठरलेले सातार्याचे कास पठार सर्वांना ठाऊक आहे. हा ‘कास’ शब्द पाली भाषेतील आहे. जीवन जगताना माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य देणे, नीती, मानवता, समता ही मूल्ये सर्वांत महत्त्वाची मानणे, मन शुद्ध राखणे, कर्मकांड न करणे, सदाचाराचे महत्त्व सतत सांगणे ही भागवत संप्रदायाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या सर्व गोष्टी बुद्ध धम्मातून आलेल्या आहेत. "वारकरी चळवळीत आढळणारी सर्व चांगली तत्त्वे ही बौद्ध धर्मातूनच घेण्यात आली आहेत," हे विधान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी वारंवार आपल्या लेखनात, भाषणात, मुलाखतींमध्ये केले आहे. बौद्ध धम्म स्वीकारताना त्रिसरण- पंचशील म्हटले जाते. हे पंचशीलच भागवत धर्माची शेकडो वर्षे आचारसंहिता होती.
मी प्राणिमात्राची हिंसा करणार नाही, खोटे बोलणार नाही, चोरी करणार नाही, मादक पदार्थांचे सेवन करणार नाही, व्यभिचार करणार नाही, ह्या बौद्ध धम्मात प्रवेश घेताना करावयाच्या प्रतिज्ञा आहेत. वारकरी संप्रदायातही याच आशयाच्या शपथा घेतल्या जातात. या पार्श्वभूमीवर पुरोगाम्यांना एक सवाल आहे ... तुम्ही पुरोगामी आहात ही चांगली गोष्ट आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मूळ सत्याकडे जाणार आहात का ? सांस्कृतिक बाबतीत खऱ्या अर्थाने "परिवर्तनवादी" होणार आहात का ? स्वतःची (आणि जवळच्या हिंदू कुटुंबांची, आसपासच्या हिंदू समाजाची) वर उल्लेख केलेल्या दुभंगलेपणातून मुक्तता करणार आहात का ? दुभंगलेपण टाळून अभंग होणार आहात का ? विसंगती टाकून स्वतःशी, इतिहासाशी आणि आपण मानत असलेल्या परिवर्तनाच्या ईमानाशी सुसंगत होणार आहात का ?
@ संदीप सारंग

0 टिप्पण्या