Top Post Ad

ती एक जागृत नरसंहार होती

 अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना ही एक ‘अपघात’ नव्हती. ती एक जागृत नरसंहार होती.  २५० हून अधिक निरपराध नागरिक मृत्यूमुखी गेले. त्यात डॉक्टर होते, विद्यार्थी होते, शिक्षक होते , समाजाचे आधारस्तंभ.
एक क्षण... आणि सगळं काही संपलं.

आणि त्याच क्षणी, टीव्ही स्क्रीन्सवर मिरवू लागले ‘LIVE अपडेट्स’.
“आम्हीच पहिले पोचलो!”
“आम्हीच पहिलं दाखवलं!”
“आमचं एक्सक्लुसिव्ह!”
वास्तविक या मृत्यूच्या राशींवर उभं राहून त्यांनी ‘ब्रेकिंग न्यूज’ची जाहिरात केली.  कॅमेऱ्यांपुढे पडलेली मृतदेहं, पायाखालून ओसंडून वाहणारा रक्ताचा तलाव, आणि त्यात ठेचून गेलेली माणुसकी.  पायलट सबरवाल यांचे ८८ वर्षांचे वडील अजूनही सुन्न होते, आणि त्यांच्याच समोर माइक ढकलून विचारलं गेलं, 
"आपल्या मुलाच्या मृत्यूवर काय म्हणाल?
एक बाई आपल्या विमान अपघातात मृत झालेल्या आई-वडिलांना शोधायला आली. तिच्यासमोर माइक धरून काय साध्य केलं या लोकांनी?
माझा संताप शब्दांमध्ये बसत नाही.
असं कोण करतो? कुठून येतो हा निर्लज्जपणा?
काय पत्रकारिता एवढ्या खाली घसरली आहे की, शोकसमयी ‘reaction’ हवी वाटते?
दुःख विकण्याची ही स्पर्धा आहे.
आज माणूस रडतो, उद्या तो ‘viral clip’ बनतो.
एका क्षणी डॉक्टर होते . दुसऱ्या क्षणी ‘Burnt casualties’ मध्ये बदलले आणि तिसऱ्या क्षणी “स्क्रीनवर रडवणारा फुटेज”.
हे काय सुरू आहे?
तुमचं 'Exclusive' हे तुमचं गर्वाचं प्रमाणपत्र नाही,
तर माणुसकी गहाण टाकून मिळवलेलं दया वाटावी असं यश आहे.
आज पत्रकारितेचं स्वरूप हे "कुणी लवकर पोचतो?", "कुणी जास्त चिखल दाखवतो?", "कुणी रडणाऱ्याचे शब्द पहिल्यांदा ऐकवतो?" एवढ्यापुरतं उरलंय.
दिवस भरभरून मरणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना,
तुम्ही त्यांचं दुःख, त्यांचे फाटलेले कपडे, त्यांचा गलका त्या सगळ्याला ‘footage’ म्हणून वापरता???
तुम्हाला फक्त स्क्रीनवरचा इम्पॅक्ट दिसतो.
पण तो कोणाच्या आयुष्याचा शेवट आहे, हे समजण्याइतकी संवेदनशीलता हरवली आहे का?
हो, आता वेळ आली आहे.

पण या सगळ्या शोकांतिकेला एक ‘नव्या प्रकारचं धार्मिक फेसपेंट’ लावलं गेलं.
कोणीतरी सांगितलं,"त्या विमानात भगवद्गीता वाचली गेली."
आणि ते पुन्हा पुन्हा दाखवलं गेलं.
काय सांगायचंय यांना?
गीता वाचली. छान.
पण माणूस वाचला का?
ते विमान वाचलं का?
श्लोक ऐकवले गेले . पण श्वास थांबले.
मग ती गीता फक्त वाचली गेली की, दाखवली गेली?
दुःखाचं प्रतीक की, टीआरपीसाठी वापरलेलं धार्मिक ढाल?
हे गीतेचे श्लोक संकटात शांती देतात, हे मान्य.
पण जेव्हा माणूस गमावल्याचं दुःख उरात धगधगत असतं,
तेव्हा श्लोकांचे आवाजही TV चॅनलवरचे धंदे वाटायला लागतात.
"गीता वाचली" हे दाखवणं हे श्रद्धेचा अपमान नाही का?
ज्यांनी गीता वाचली, त्यांच्या नशिबावरून – आपण एवढं तरी शिकायला हवं ना .
की फक्त धार्मिक वाचन पुरेसं नाही, जीवनरक्षणाची यंत्रणा सुधारणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
या रिपोर्टर मंडळींनी त्यांच्या गुडघ्यात अडकलेल्या अक्कलला डोक्यात खेचून आणायची वेळ आली आहे.
कारण आज जर तुम्ही ‘दुःख’ कव्हर करत आहात,
उद्या कोणीतरी तुमचं दुःख ‘content’ म्हणून वापरणार तेंव्हा कळेल, माणुसकी काय असते.
मी कोणत्याही एका चॅनलचं नाव घेत नाही.
कारण ही फक्त एका चॅनलची चूक नाही. ही संपूर्ण यंत्रणाचं नैतिक दिवाळं आहे. या अशा पत्रकारांचं खरं तर जागेवरच मुस्काड फोडला पाहिजे

डॉ.गौरी साखरे, अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com