Top Post Ad

व्यसनमुक्तीविषयक माहिती आता 'चॅटबॉट'द्वारे नागरिकांना उपलब्ध होणार

संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दरवर्षी २६ जून हा ‘जागतिक अमली पदार्थविरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. “व्यसनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांसाठी प्रतिबंध, उपचार आणि पुनर्प्राप्ती” (Breaking the Chains: Prevention, Treatment and Recovery for All) अशी यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे. मुंबईतील नागरिकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने व्यापक जनजागृती केली जाते. विविध प्रकारच्या व्यसनांवर महानगरपालिकेच्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये उपचार दिले जातात. सन २०२३ मध्ये १८८९ आणि सन २०२४ मध्ये २५३२ रुग्णांनी म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीत ४ हजार ४२१ रुग्णांवर या केंद्रांमधून व्यसनमुक्तीसंदर्भात उपचार करण्यात आले आहेत.

   भरडवाडी, अंधेरी (पश्चिम), राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्र येथे व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने निवासी स्वरुपाची उपचार व्यवस्था उपलब्ध आहे. तर, सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी, घाटकोपर येथील व्यसन उपचार केंद्रात बाह्यरुग्ण कक्ष अंतर्गत (ओपीडी) सेवा उपलब्ध आहे. मद्य, चरस, गांजा, हेरॉइन (गर्द), तंबाखू इत्यादी अमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेलेले रुग्ण येथे उपचारासाठी येतात.

जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिनांक २६ जून २०२५ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, व्यसनमुक्तीविषयक माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी ८९-९९२-२८९-९९ हा 'चॅटबॉट' क्रमांक उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच, आरोग्य सेविकांच्या सहाय्याने जनजागृती रॅलीचे आणि विभागीय पातळीवर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच व्यसनमुक्तीची प्रतिज्ञाही घेतली जाणार आहे.  दरम्यान, आपले कुटुंबिय, नातेवाईक किंवा आपल्या माहितीमध्ये एखादी व्यसनाधीन व्यक्ती असल्यास त्यावर उपचार करण्याच्या हेतूने माहिती घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "हितगूज" या मदतसेवा अंतर्गत ०२२-२४१३१२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या महानगरपालिका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com