Top Post Ad

रिपब्लिकन एकता आघाडीचा ' मराठी मोर्चा ' ला पाठिंबा

केंद्राच्या इशाऱ्यावरून भाजप - महायुतीचे सरकार महाराष्ट्रावर सक्तीने हिंदी लादत आहे.हुतात्म्यांनी बलिदान देत मिळवलेले हे मराठी राज्य पुढील २० वर्षांत हिंदी भाषिक राज्य बनण्याचा धोका त्यातून उभा राहिला आहे, असे सांगतानाच ' महाराष्ट्राला गोबरपट्ट्यात ओढण्याचा त्यामागचा डाव सर्वशक्तीनिशी हाणून पाडावा , असे आवाहन रिपब्लिकन एकता आघाडीतर्फे निमंत्रक अर्जुन डांगळे यांनी केले आहे. हिंदीच्या सक्तिविरोधात पुढील शनिवारी ५ जुलै २०२४ रोजी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काढण्यात येणाऱ्या ' मराठी मोर्चा ' ला रिपब्लिकन एकता आघाडीने आज एका पत्रकाद्वारे सक्रिय पाठींबा जाहीर केला आहे. 

 हे पत्रक अर्जुन डांगळे, सुरेश केदारे, दिवाकर शेजवळ, मिलिंद सुर्वे, सागर संसारे, श्रीकांत तळवटकर, अरविंद निकाळजे, प्राचार्य रमेश जाधव, प्रा. डॉ. जी.के. डोंगरगावकर, प्रा. एकनाथ जाधव यांनी प्रसृत केले आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समविचारांचा वारसा जपण्यासाठी आणि फुले - शाहू - आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक अस्मिता प्रखर  करण्यासाठी आंबेडकरी जनता,  रिपब्लिकन, दलित संघटना या मोर्चात सहभागी होत आहेत, अशी माहिती  रिपब्लिकन एकता आघाडीने पत्रकात दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळण्यात या एकता आघाडीने आणि आंबेडकरवादी विचारवंतांनी महत्वाची भूमिका बजावली होती, असे सांगून अर्जुन डांगळे म्हणाले की, आमच्या या आघाडीत रिपब्लिकन जनशक्ती, दलित पँथर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरवादी भारत मिशन आदी संघटनांचा आणि राज्यभरातील साहित्यिक, विचारवंतांचा मोठा सहभाग आहे. ५ जुलैच्या ' मराठी मोर्चा ' साठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यातील शिक्षणात हिंदीची सक्ती करण्याविरोधात ' झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा ' या एकाच भूमिकेतून ' मराठी मोर्चा ' ची हाक देण्यात आली आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष अग्रभागी राहिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना विधानसभेत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते ॲड. बी. सी. कांबळे यांनी तर अक्षरशः रडकुंडीला कसे आणले होते, याच्या आठवणी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे हे सांगत असत. त्या पार्श्वभूमीवर, हिंदी सक्तीने लादण्याविरोधात येत्या शनिवारी ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत निघणाऱ्या ' मराठी मोर्चा ' ला रिपब्लिकन एकता आघाडीने दिलेल्या पाठिंब्याला विशेष महत्त्व आहे. त्या आघाडीची या संदर्भातील घोषणा ही शे.का.फे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रवादी भूमिकेचा वारसा जपणारी, पुढे चालवणारी आहे. तसेच रिपब्लिकन चळवळीला मुख्य प्रवाहाशी जोडणारी आहे.-  दिवाकर शेजवळ

  • हिंदीची सक्तीने लादवणुक करण्याच्या विरोधातून घडलेल्या लक्षणीय, दखलपात्र घडामोडी...
  • △ काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने पहिल्यांदाच प्रादेशिक, भाषिक अस्मितेशी नाळ तुटू न देण्याची भूमिका घेतलीय. शरद पवार यांचीही भूमिका वेगळी नाही.
  • △ हिंदी सक्तीच्या सरकारी परिपत्रकाची होळी करण्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा जाहीर केला आहे.
  • △ कम्युनिस्टांनी शिवसेनेशी असलेल्या जुन्या हाडवैराला लोकसभा - विधानसभा निवडणुकीपासून मूठमाती दिली असून हिंदीच्या सक्ती विरोधात 'महाराष्ट्रवादी' भूमिकेला प्राधान्य दिले आहे.
  • △ समाजवादी पार्टीचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी ' मराठी मोर्चा' त सहभागी होण्याचा व्यक्त केला मनोदय.
  • △ एकटा भाजप एकीकडे आणि इतर पक्ष एकीकडे असे चित्र राज्यात पहिल्यांदा निर्माण झाले आहे.
  • अन् राजकीय भानाशी फारकत घेतलेले काही लोक मात्र 'आपला पाठींबा कुणी मागितला काय ?' असा सवाल करत निमंत्रणाची वाट पाहात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com