मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत मतदारसंख्येत तब्बल ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. काही मतदान केंद्रांवर ही वाढ २० ते ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले तसेच या मतदारसंघात अनेक अज्ञात व्यक्तींना बीएलओंनी (बूथ लेव्हल ऑफिसर) रजिस्टर करून मतदान करण्याची संधी दिली. यामध्ये अनेक मतदारांचे पत्तेही पडताळता आलेले नाहीत असा दावा आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.'
गांधी यांनी याआधीही एका पोस्टद्वारे आरोप केला होता की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फेरफार झाली असून, 'ही निवडणूक एक प्रकारची मॅच फिक्सिंग होती' असे त्यांचे मत होते. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना केवळ अपवाद नाही, तर ती स्पष्टपणे 'वोट चोरी' (मतांची चोरी) आहे. त्यांनी असा आरोपही केला की, 'या प्रकरणावर निवडणूक आयोगाने अद्याप मौन बाळगले आहे, जे त्यांच्या संभाव्य संगनमताचा इशारा करते.' त्यामुळे राहुल गांधी यांनी मशीन-रिडिंग डिजिटल मतदार यादी आणि मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज तत्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.दरम्यान देशातील चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांत विरोधकांनी पाचपैकी चार जागा जिंकून सरशी साधली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ'ने एका, 'आप'ने दोन, भाजप आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. या पोटनिवडणुकांत माध्यमांना सर्वाधिक बातम्या 'आप'ने दिल्या. पंजाबमधील लुधियाना पश्चिम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा गड असलेल्या गुजरातमधील विसावदर जागा जिंकून केजरीवाल यांनी ते केवळ दिल्ली आणि पंजाबपुरते मर्यादित राहू इच्छित नाहीत, असा संदेश दिला. गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्यात 'आप'चा हा विजय केजरीवाल यांच्यासाठी एक मोठे राजकीय यश मानले जाते. विसावदर जागा मोदी यांनाही सन २००७ नंतर जिंकता आली नव्हती. दिल्लीच्या निकालांनंतर केजरीवाल यांनी मौन बाळगले आहे, या चर्चांना त्यांनी निकालांतून उत्तर दिले. मात्र हे निकाल म्हणजे निवडणुकीत होणारा घोळ आणि इव्हीएम चर्चेवरून विरोधकांचे लक्ष उडवण्याचा डाव असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे.

0 टिप्पण्या