Top Post Ad

भा.ज.पा.जिंकली... कशी?.... राजकारण करणाऱ्यांसाठी, आवड असणाऱ्यांसाठी फारच महत्वाचा दस्तैवज

भा.ज.पा.जिंकली... कशी?.....पुस्तकाच्या नावावरून पहिल्यांदा वाद झालेत, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही ते त्यांच्या विरोधातलं वाटलं. …पण पुस्तक वाचुन झाल्यावर एक गोष्ट मी अत्यंत विश्वासाने सांगू शकतो की हे पुस्तक कुणाच्याच विरोधातलं आणि समर्थनातलं नाही आणि समर्थनातलंही नाही, हे पुस्तक ११०% निरीक्षण-परिक्षण - विश्लेषण आणि विवेचन या सदरातलं आहे. यात १-२ ठिकाणी लेखनचुका (Typographic Mistakes) आहेत पण त्या पुस्तकाच्या एकुण पसराऱ्याच्या ०.०००००१% इतक्या कमी महत्वाच्या आहेत.


पुस्तकाचं वाचतांना करतांना मला जाणवलं की पुस्तकाचं ढोबळमानाने तीन भागात वर्गिकरण करता येईल १ सांख्यिकी आणि २ वस्तुस्थिती आणि ३ या दोहोंच्या आधारे विश्लेषण. पुस्तकात तुम्हाला अनेक प्रकारची सांख्यिकी बघायला मिळते ज्यात २०२४ च्या निवडणुकांमधले श्रीमंत उमेदवार, त्यांची संपत्ती वगैरे सारखी माहिती मिळते त्याचप्रमाणे पक्षांना मिळालेली मतं, योजनांची आकडेवारी, मतदानाची आकडेवारी, घराणेशाहीतुन आलेले उमेदवार ( नाकाने कांदे सोलणाऱ्या तत्वहीन - विचारहीन भाजपचेही आहेत बरं का), निवडणुकांवेळी झालेले वेगवेगळी सर्वेक्षणं अशी नानाविध प्रकारची सांख्यिकी या पुस्तकात एकाचवेळी उपलब्ध होते. वस्तुस्थिती मांडतांनाही ती अनेक ठिकाणी थेट नावांचा उल्लेख करून, घटनांचे संदर्भ देऊन मांडण्यात आली आहे. काही गोष्टी तर अगदी विस्मरणात गेलेल्या पण पुस्तकात आल्याने त्या केवळ आठवतच नाही तर त्यांचं या निवडणुकांमधे किती अनन्यसाधाराण महत्व होतं हे लक्षात येतं.

उदा - फडणवीसांनी केलेली डिनर डिप्लोमसी किंवा वारकऱ्यांना जोडण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा उध्दवसाहेबांनी मविआच्या नेत्यांना “मुख्यमंत्री पदाचा चेहरा” घोषित करा सांगण्यासाठी केलेला प्रयत्न. या अनेक वस्तुस्थिती क्रमवार या पुस्तकात वाचायला मिळतात. विश्लेषणाच्या बाबतीत तर पुस्तक बाप झालंय, सांख्यिकी आणि वस्तुस्थिती दोहोंचा वापर विश्लेषणासाठी केला गेलाय, शिवाय त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवरच्या माहितीचा (ground lavel information) वापर झाल्याने अनेक प्रकारच्या दडलेल्या गोष्टी पुढे आल्यात. RSS चा या निवडणुकीनंतर कुठेच उल्लेख झाला नाही पण पडद्याआड त्यांनी केलेलं काम पुस्तकात आलंय. BJP सारख्या आचारहीन-विचारहीन पक्षाला मिळणारं यश हे खरं तर संघाच्या निरपेक्षपणे काम करणाऱ्या निवडक प्रशिक्षीत गटाचं (cadre) चं यश म्हणायला हवं पण भाजपवाले संघाला आणि सरसंघचालकांना सतत मांजरसुंब्याच्या फाट्यावर नेऊन बसवतात (हे माझं मत). या सगळ्यांचं विश्लेषण इथे ठळकपणे जाणवतं.

एक गोष्ट वाचुन झाल्यावर प्रकर्शाने जाणवली की भाजपा सारख्या बलाढ्य राक्षसीवृत्तीच्या राजकीय पक्षाविरोधात लढण्याचं सर्वोत्तम कौशल्य आणि रणनिती कुणी आखली असेल तर ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी. योग्यवेळी त्यांच्या सुचना मित्रपक्षांनी ऐकल्या असत्यातर मविआ वर ही वेळ आली नसती. मविआ मधल्या अनेक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तीक किंवा पक्षीय फायद्यासाठी आतुन भाजपबरोबर तडजोड केली होती. हे पुस्तक नाव न घेता २०२४ च्या विधानसभा रणसंग्रामातील नायक, खलनायक आणि खंडोजी खोपडे यांच्याविषयी बोलतं. मविआ नेत्यांनी - कार्यकर्त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायला हवं शिवाय खंडोजी खोपडेची माहितीही गोळा करायला हवी. थोरल्या महाराजांनी जे केलं ते विसरू नये. स्वार्थाने असेल किंवा भयाने शत्रुला मिळणारे खंडोजी खोपडाच विरोधकांचे बलस्थान असतात, त्यातही असे खोपडा थेट पक्ष नेत्यांच्या आजुबाजुला असेल तर आजचं पानीपत उद्याचं महाभारत होऊ शकतं.

भा.ज.पा.जिंकली... कशी... हे पुस्तक राजकारण करणाऱ्यांसाठी, आवड असणाऱ्यांसाठी फारच महत्वाचा दस्तैवज आहे. कुठल्याही बाजुचे असा पण सुधारणा व्हावी असं वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवं असं पुस्तक.
(हल्ली राजकारणातले लोक वाचत नाही, म्हणुन तर राजकारणाचे बळी ठरतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com