आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या चर्चांचे गुऱ्हाळ पुन्हा सुरु झाले आहे. याबाबत बोलतांना रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनावणे म्हणाले, रिपब्लिकन पक्ष ऐक्याच्या भूमिकेत कायम आहे, याबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे अंतिम भूमिका जाहीर करतील, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आज रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीची बैठक संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मुस्ताक बाबा यांची निवड करण्यात आली, यावेळी अनिस पठाण, खुदुस भाई फारुकी, समशेर खान, रफिक दफेदार, खाजाभाई शेख, हसन शेख, अजित शेख, सय्यद हबीब, हसीन शेख, अफजल चौधरी, प्रकाश जाधव, शिरीष चिखलकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना मुस्ताक बाबा यांच्या निवडीची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत गौतम सोनवणे यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. मुस्ताक बाबा रिपब्लिकन पक्षांमध्ये गेली 50 वर्ष कार्यरत असून त्यानंतर पासून ते आंबेडकरी चळवळीचा विचार घेऊन महाराष्ट्र मध्ये मुस्लिम समाजामध्ये बांधणी करीत आहेत. मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर आतापर्यंत त्यांनी अनेक मोर्चा आंदोलनात सहभागी होऊन समाजाला न्याय मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष असून आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागांची मागणी करणार आहे. यावेळेस मुंबई महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणले जातील अशी आशा सोनवणे यांनी व्यक्त केली. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात चाळीस वर्षापासून काम करीत आहे आज रिपब्लिकन नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन मला न्याय दिला आहे, तो विश्वास मी सार्थ करून दाखवणार आहे, असे अल्पसंख्याक आघाडीचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुस्ताक बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या