-शासन कोणाचेही असो शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत लढा चालू राहील, मात्र आता झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला कदापि स्वस्त बसू देणार नाही, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात येथील सर्व कामगार संघटनांच्या बैठकीत आज दिला आहे. मागील दिनांक १४ जून रोजी गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयात पहिल्या बैठकीत, पुढील आंदोलनाची दिशा संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत घेण्याचा एकमुखी ठरावाद्वारे निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे आज परेलच्या मनोहर फाळके सभागृहामध्ये पार पडलेल्या १२ कामगार संघटनांच्या बैठकीत सचिन अहिर बोलत होते.
प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, गिरणी कामगारांसाठी घरांसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी सरकारची मानसिकता असली पाहिजे.
सर्व श्रमिक संघटनेचे रमाकांत आंब्रे,संयुक्त मराठी मुंबई चळवळचे रमाकांत बने, गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उभे आणि सरचिटणीस बाळ खवणेकर, मुंबई गिरणी कामगार युनियनचे ऍड.अरुण निंबाळकर, एनटीसी कामगार असोसिएशनचे ऍड.बबन मोरे,मनीषा पेडामकर, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे , हेमंत धागा,जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ व संघटन सचिव राजेंद्र साळसकर, जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी ,आदी कामगार नेत्यांनी आपल्या भाषणात एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. गिरणी कामगार रोजगार आणि निवारा, कल्याण सेवाभावी संस्था, गिरणी कामगार सभा, सातारा जिल्हा कामगार समिती आशा मिळून १२ कामगार संघटनांचे नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीला कोकण,पुणे, सातारा,कोल्हापूर आदी जिल्ह्यातील गिरणी कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.
शेलू आणि वांगणी येथील घरांच्या विक्रीसाठी कामगार वारसांवर जो जादा जो दबाव आणला जात आहे, त्याचा बैठकीत निषेध करून आमदार तसेच माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी सांगितले की, सरकारच्या अध्यादेशातील कामगारांच्या घराचा हक्क डावलणारे कलम रद्द करावे लागेल. घराचा प्रश्न राजकीय नसून गिरणी कामगारांच्या हक्काचा आहे. त्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी सन्माननीय खासदार आमदार यांची कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाद्वारे भेट घेण्यात येईल. कामगारांच्या घराच्या प्रश्नावरील आंदोलनाची तारीख येत्या २७ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल. उपस्थितांचे आभार रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी मानले. सर्वश्री उपाध्यक्ष अण्णा शिर्षेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या