हिंदी भाषेच्या विरोधात या फेसबुकवर मराठी माणसाने इतकी चौखूर अशी " शब्द हत्यारे " उपसलीत की हे सरकार किंवा ते "हिंदी लादणे " गतप्राण व्हायला हवं होतं .पण तसं काही झालंच नाही. तेंव्हा हे माध्यम केवळ आत्मसंतुष्टीचे आहे व त्यातून जनतेचे प्रश्न सुटत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण हा फेसबुकवरील असंतोष कधी संघटीत होत नाही.... सक्रिय होत नाही हे उघड सत्य आहे .

जनतेच्या प्रश्नांवर प्रथमतः विरोधी पक्षांनी सक्रिय व्हायला पाहिजे हि गेल्या ७० वर्षात नागरिकांची धारणा करून देणारा षडयंत्री पक्ष आज सत्तेवर आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . विचार करा ! कॉंग्रेसने न केलेल्या भ्रष्टाचाराचेही भांडवल करून सत्तेवर आलेल्या या पक्षाने हा अनुभव जमेस धरून सत्तेच्या पहिल्याच वर्षांपासून " विरोधी पक्षाला " नियोजनपूर्वक " नो व्हेअर " करण्याचा सपाटा लावला .तो कसा यांची उजळणी करण्याची गरज नाही. एक साधं उदाहरण घ्या ! ज्या अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून तत्कालीन विरोधी पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी जे सत्तापरिवर्तनाचे आंदोलन केले व त्यातून ते सत्तेवर येऊन किती " जनताभिमूख " राहिले , त्यांनी किती आणि कसे कल्याणकारी राज्य केले , आणि ज्या " भ्रष्टाचारा " ची बोंब करून हे सत्तेवर आले तो भ्रष्टाचारच त्यांनी कसा आपल्या " सत्तेच्या सिस्टीम" चाच भाग केला हे जनतेसमोर वेळोवेळी आलेले आहे. ज्या मतदानावर आपली लोकशाही टिकून आहे , ज्या जनादेशाने एखादे सरकार सत्तेवर येते त्या मतदानाची चोरी करून सत्तेवर राहण्याची या सत्ताधारी पक्षाची जी निरंतर कसरत चालू आहे तीही जनतेसमोर उघड झाली आहे. म्हणून तर प्रत्यक्षात जनतेने बहुमताने " नाकारलेले " सरकार आज सत्ता बळकावून बसले आहे . आणि जनता केवळ फेसबुकवर सक्रिय आहे . जनता आज तिच लढाई खरी मानत आहे . प्रत्यक्षातील आंदोलनाच्या लढाईच्या वाऱ्याला ही ती आज उभी राहात नाही. प्रत्यक्ष विरोधात मतदान करूनही जे सरकार बदलत नाही ते या सोशल मिडियावरील विरोधाने बदलेल का ? याचा आज प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे.
जर अण्णा आंदोलनाच्या वेळी हा " सोशल मिडिया " आणि आजचा पक्षपाती सरकारधार्जिणा मिडिया अस्तित्वात असता तर ते आंदोलन यशस्वी झाले असते का ? याचाही विचार याचबरोबर करायला हवा ! वस्तुतः आर.एस.एस. - भाजपाचे लोक त्या आंदोलनात सामील होऊनही ते आंदोलन कदापी यशस्वी झाले नसते . तेंव्हा जनताही प्रत्यक्ष आंदोलनात सक्रिय झाली कारण तिचा " असंतोष " प्रकट होण्याचा तोच एक मार्ग होता .हे ओळखूनच सत्तेवर येताच भाजपाने सोशल आणि न्यूज मिडिया ताब्यात घेतला .आणि जनमताला आपल्या अनुकूल करण्याचा , ठेवण्याचा मार्ग हाती घेतला तो आजतागायत कायम आहे . इतका कि या देशाचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या " मृत्यू" ची याचनाही काही मंडळी उघडपणे करू लागले .पण फेसबुकवर त्याविषयी " ब्र " ही काढला गेला नाही. कारण या मिडियावर अघोषित कब्जा आहे तो सत्ताधारी पक्षाचा ! या उलट गेल्या ७० वर्षांत विरोधी पक्षनेत्याला सरकार आणि जनता पंतप्रधानाइतकाच सन्मान देत आली आहे हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. इतकी मानसिक विकृती या देशावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांमध्येही नव्हती असे या देशाचा इतिहासच सांगतो . असो !
तर भाषा म्हणजे काय , असे ज्ञान पाजळणार्या गृहमंत्र्यांना त्यांचेच " संस्कृती, संस्कार, जगणं " असे जे विधान आहे त्याचेच बॅनर घेऊन मराठी माणसाला आता रस्त्यावर उतरावं लागेल . त्यासाठी आपल्याला विरोधी पक्षांची गरज नाही. आपली जी मराठी भाषेची विविध मंडळ आहेत , सामाजिक संघटना आहेत त्यांनीच पुढाकार घेऊन हे आंदोलन उभे केले पाहिजे. जसे पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी " मिडिया " वर भिस्त न ठेवता शेतकरी विरोधातील तीन विधेयकांविरूध्द प्रत्यक्ष आंदोलनरत राहून ती विधेयके रद्दबातल करून घेतली .या मंडळे , संघटना यांचे केवळ पुरस्कार, संमेलनं , आणि व्याख्यान , महोत्सव भरवून भाषेच्या नावाने स्वतःचे ढोल वाजविणे एवढेच काम नाही. भाषेच्या प्रश्नावर " बचावात्मक सक्रियता " हे आज त्यांचेही एक प्रासंगिक असे निर्वाणीचे कार्य झाले आहे. व्यासपीठावर " त्यागा " चे महत्व सांगून भागत नाही . वेळेला तो करावाही लागतो . आणि ती वेळ आज आली आहे .
खरं तर हि महाराष्ट्र सरकारची गद्दारीच आहे . अर्थात तीन पक्षाचे तीन गद्दार मिळून हे सरकार चालवत आहेत . त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करता येत नाही. मराठी माणूस आणि त्याची मंडळं यांच्याकडूनच आज प्रत्यक्षातील " संघटित विरोधा " च्या नेतृत्वाची अपेक्षा आहे. मग कलाकार , जनता ! कारण आज हा केवळ हिंदी भाषेच्या सक्तीचाच प्रश्न वाटत असला तरी त्याच्या उदरात आणखी काय काय लपले आहे हे केवळ या षडयंत्री केंद्रीय सत्तेलाच ठाऊक आहे . त्या शृंखलेच्या पहिल्याच कडीला विरोध करणे म्हणूनच अनिवार्य ठरत आहे
धन्यवाद !
0 टिप्पण्या