केवळ खेळाडू विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली चेंजिग रूम्स कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीने तोडण्याचे काम ठाणे महापालिकेने केले आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का? असा सवाल १०१ वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे
सोमवार,१६ जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिग रूम, इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली. वास्तवीक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना दोन दिवसांची नोटीस दिली जाते. पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला. दिलीप धुमाळ म्हणाले स्पोर्टिंगने बांधलेल्या चेंजिग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने १२ सप्टेंबर २०२२ रोजी नोटीस पाठवली होती. पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. पण एका न्यायालयीन प्रकरणात आज १७ जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून एक दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करूनसुध्दा हे बांधकाम १६ जून रोजी तोडण्यात आले.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर ९ जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान १७ जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे, अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकऱ्यांनी केली. आज या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूनं निकाल दिला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, कार्यकारिणी सदस्या सुषमा मढवी, सदस्य ऍड अमीर शेख, संदीप पाचंगे उपस्थित होते.

0 टिप्पण्या