पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मे पर्यंत शहरात ज्या ज्या प्राधिकरणांची कामे सुरू आहेत, ती पूर्ण करण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. ही डेडलाइन ७ जूनपर्यंत वाढविण्यात आली. त्यालाही दोन आठवड्याचा काळ लोटला परंतु, त्यानंतरही शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेली प्राधिकरणांची कामे काही पूर्ण झालेली नाहीत. याचा त्रास मात्र ठाणेकर नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष करून घोडबंदर भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम भर पावसात सुरू आहे. महानगर पालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कामे पुर्ण करण्याची डेडलाईन कंत्राटदारांना आणि संबंधित प्राधिकरणाला देते. मात्र ही डेडलाईन म्हणजे आता हास्स्यास्पद ठरली आहे. दरवर्षी तोच तोच प्रकार असून ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया ठाणेकर व्यक्त करीत आहेत.
मेट्रोच्या कामाचा अडथळा, माजिवडा, कापूरबावडी उड्डाणपुलावरील अर्धवट राहिलेली रस्ते दुरुस्तीचे कामे, त्यात पालिकेच्या माध्यमातून ६०५ कोटी खर्च करून काँक्रीट रस्त्यांची कामे केली असली, तरीही या रस्त्यांच्या बाजूला असलेली गटारे, कल्व्हर्ट हे रस्त्याला लागून वर आल्याने त्या रस्त्यांवरून पाणी जाण्यास अडथळा निर्माण होऊन रस्त्यांवरच पाणी साचत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाघबीळ गावातील रस्ताही अर्थवट स्थितीत असून येथील नागरिकांना आता घरी जाताना तारेवरची कसरत करून जावे लागत आहे. दुसरीकडे, माजिवडा आणि कापूरबावडी उड्डाणपुलावरील दुरुस्ती संबंधित प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी हाती घेतली होती. परंतु, हे कामही अर्धवट स्थितीत आहे. सध्या हे काम बंद आहे. पावसाळ्यानंतर हे काम पूर्ण होणार असले तरीही त्या कामात महावितरणचा अडथळा कायम राहणार आहे. शिवाय पादचारी पूल आणि पालिकेच्या शौचालयांचा अडथळा येथे राहणार आहे. मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता एक होत असताना त्याठिकाणी असलेल्या गटारांची कामे योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे.रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, पाणी साचणार नाही, असे दरवर्षी प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, दरवर्षी त्यांचा हा दावा फोल ठरतो. आता पावसाळा सुरू झाला आणि विविध भागात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत कामे आहेत, 2017च्या सुरुवातीला मेट्रोचे काम सुरू झाले. मात्र, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांची कामेही रखडली आहेत. दुसरीकडे, घोडबंदरची कोंडी सोडविण्यासाठी सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेतले आहे. ते कामही ३० टक्क्यांच्या आसपासच झाले आहे. या कामांमुळे रस्ते खोदलेले आहेत, तसेच येथील गटारांची कामेही हाती घेण्यात आली आहेत.यामुळे ठाणेकराना नियमितपणे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक पावसाळ्यात अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र पालिका केवळ बघ्याची भूमिका घेते. तर इतर प्राधिकरण महापालिकेकडे बोट दाखवतात. यामध्ये अनेक ठाणेकरांनी आपले प्राण गमावले असल्याची संतप्त प्रतिक्रिया घोडबंदर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

0 टिप्पण्या