ठाणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाण्यात काही ठिकाणी स्वच्छतागृहे बांधून त्यावर होर्डिंगचे सापळे उभारण्याची परवानगी ठाणे महापालिकेने दिली आहे. स्वच्छतागृहांवर मोठे मोठे होर्डिंग कंत्राटदाराने उभारले. कंत्राट मिळालेल्या कंपनीचे पहिले कर्तव्य ठाणेकरांची गैरसोय होऊ नये असे असताना बाळकुम नाक्यावर असलेले शौचालय जवळपास गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शौचालयावर असलेल्या होर्डिंगवर जाहिराती मात्र दणक्यात चालू आहेत. मेट्रोच्या कामामुळे सदर शौचालय बंद असल्याचे पोस्टर शौचालयावर लावण्यात आले आहे. शौचालय बंद असताना जाहिरात करण्याची परवानगी सदर कंपनीला कुणी दिली? बाळकुम नाका हा परिसर वर्दळीचा परिसर आहे. शौचालय बंद असल्यामुळे रोजच्या रोज शेकडो नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालय बंद असताना जाहिरात करण्याचा कोणताही अधिकार जाहिरात कंपनीला नाही, जाहिरातींच्या माध्यमातून लाखो रुपये कमावून स्वच्छतागृहा अभावी ठाणेकरांची गैरसोय करणाऱ्या जाहिरात कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी ठाणे महापालिका जाहिरात विभागाचे उप आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे. एकीकडे करदाते त्रस्त आहेत मात्र जाहिरातदार कंपन्या लाखो रुपये कमवून मस्त आहेत. ठाणे महानगरपालिका ठेकेदारांची, कंत्राटदारांची नसून करदात्यांची, ठाणेकरांची आहे दाखवण्याची हिच ती वेळ म्हणून बाळकुम येथील शौचालय बंद असताना त्यावर जाहिरात करणाऱ्या कंत्राट कंपनीवर कारवाई करावी, अशी विनंती हेमंत मोरे यांनी केली आहे
अगदी मोक्याच्या जागांवर शौचालय कम होर्डींग उभारण्यात आल्या. या जाहिरातीचे कंत्राट आणि एकंदरीतच ठाण्यातील होर्डींगचे कंत्राट ठाणे महानगर पालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या वेगवेगळ्यां कंपन्यांकडे आहे. त्यामुळे या विरोधात कोणीही ब्र काढीत नाही. एखाद्याने तक्रार केली तर तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे असते. या अधिकाऱ्याच्या विरोधात जाण्याची कोणाची हिम्मत नाही. म्हणूनच ही परंपरा काही वर्षांपासून अद्याप सुरू असल्याची चर्चा ठाणेकर करीत आहेत.

0 टिप्पण्या