Top Post Ad

टेरेस गार्डन ...

    पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि जनजागृती यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने वेसाक इंडिया, आसरा फाउंडेशन यांच्या सहकार्याने एक छोटेसे पाऊल उचलले आहे. दैनंदिन कामकाजातून याविषयी वेळ मिळणे थोडे अवघडच होते. पण म्हणतात ना... "इच्छा तिथे मार्ग..!"    जनादेश वृत्तपत्राचे मालक संपादक कैलास म्हापदी यांच्यामुळे ठाणे शहर निवासी पर्यावरण तज्ञ विजयकुमार कट्टी हे संपर्कात आले आणि "WASTE TO BEST" या संकल्पनेवर आधारित शासकीय व्यवस्थेतील पहिले TERRACE GARDEN" हे "मिशन" दृष्टीक्षेपात आले.   निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्या शुभहस्ते या संकल्पित टेरेस गार्डन चे पहिले रोपटे लावण्यात आले. आणि बघता बघता हे टेरेस गार्डन अवघ्या एक-दीड महिन्यात पूर्णही झाले.   अर्थातच यासाठी अनेकांनी सहकार्य केले, शुभेच्छा दिल्या, या टेरेस गार्डन मध्ये प्रत्यक्ष कामही केले. या सर्वांचा मी कायम ऋणी असणार आहे.   आपणा सर्वांना आग्रहाची नम्र विनंती आहे की, आपण आपल्या सहकाऱ्यांसह कृपया या टेरेस गार्डनला भेट द्यावी. या ठिकाणी आपण पर्यावरण रक्षण, संवर्धन याविषयीचे मोफत प्रशिक्षण वर्गही आयोजित करणार आहोत.

  • मनोज सुमन शिवाजी सानप 
  • जिल्हा माहिती अधिकारी, 
  • ठाणे
****************************************
  हिरवीगार झाडे चैतन्य आणि उत्साह जागवतात. रंगीबेरंगी, सुगंधी फुले टवटवीतपणा आणतात. तेथे फुललेली औषधी वनस्पती, भाजीपाला, फळे कृतकृत्य झाल्याचा आनंद देतात. टेरेस गार्डन मनाला उभारी देते, प्रसन्न करते. पावसाचे वातावरण झालंय. वातावरणात गारवा आलाय. निसर्गप्रेमींचा मोठा उत्सवच सुरू झालाय. प्रत्येकाला घरीदेखील हिरवाई फुलवावीशी वाटते आहे. टुमदार बंगला किंवा चाळी, वाड्यासमोर परसबाग फुलायची. गेल्या काही वर्षात वाडे, चाळींच्या जागी गृह प्रकल्प साकारलेत. तेथील फ्लॅटमध्येही निसर्गाशी नाते जोडता येते. गच्ची किंवा गॅलरीतल्या छोट्या जागेतही बाग फुलवू शकतो. 

ज्या घरात राहता, त्याला बाल्कनी किंवा टेरेस असतो. त्याचा उपयोग टेरेस गार्डनसाठी कसा करावा, हे समजून घेऊया. टेरेसवर बाग फुलवताना प्रथम टेरेस जलरोधक (वॉटरप्रूफ) बनवा. जेणेकरून लिकेज होणार नाही, तसेच उतार देऊन पाणी वाहण्याची सोय करा. जागेची आखणी करून नेमके काय हवे ते ठरवावे. हे ठरवतांना फुलझाडे, औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला यांची वर्गवारी करा. टेरेसमध्ये सूर्यप्रकाश किती येतो, यावर कोणती रोपे लावावी, हे ठरवावे. टेरेसमध्ये गादीवाफा करावा की, कुंडीत रोपे लावावीत, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग. त्यामुळे योग्य नियोजन करून पहिले कागदावर कच्चे स्केच बनवा. टेरेस गार्डनसाठी कमीत कमी दहा बाय दहाची जागा असेल, तरीही बाग फुलवू शकता. बागेसाठी पाणी देण्याचे नियोजन आवश्यक आहे. ड्रिप करू शकता, ते जमत नसेल, तर झारी किंवा नळीच्या साह्याने पाणी देता येते.

रोपे लावताना शक्यतो मातीच्या कुंड्यांना प्राधान्य द्या. यामध्ये रोपे छान वाढतात. देशी गायीच्या शेणापासून न विरघळणाऱ्या शेणाच्या कुंड्यादेखील बाजारात मिळताहेत. शेण आणि झाडांच्या सालीपासून कुंड्या बनवतात. योग्य प्रकारे हाताळल्यास कुंडी पाच वर्षावर टिकते. प्लॅस्टिक आणि सिमेंटच्या कुंड्यांना हा उत्तम पर्याय. आता इकोफ्रेन्डली प्लॅस्टिकच्या कुंड्याही मिळतात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये लावलेल्या रोपाला आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते. त्यासाठी कुंडीवर वॉटर इंडिकेटर असती. त्यातील पाण्याची उंची घटली की, मग पाणी घालायचे. अशी कुंडी (इनडोअर प्लांटसहित) घरात कुठेही ठेवू शकता. आंब्याच्या पेटीला आतून शेडनेट लावून त्याचा झाडे लावण्यासाठी उपयोग होतो. पॉट भरायला अगदी तळाशी गवताचा उपयोग होतो. रिकामे पिंप, सिमेंट गोणी, टब, बादली यांचादेखील उपयोग कुंडीसारखा करतात.

रोपे लावताना फुलझाडे असतील, तर त्यांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो, शोभिवंत इनडोअर प्लान्टसाठी कमी सूर्यप्रकाश लागतो. यासाठी गार्डनमध्ये शेडनेटचा गरजेप्रमाणे वापरा. कुंडी बनवताना किंवा भरताना वातावरण थंड असेल, अशा वेळी रोप लावावे. सकाळी किंवा सायंकाळी रोपे लावल्यास उत्तम. मातीच्या कुंडीत रोप लावताना कुंडीला तळाशी छिद्र आवश्यक आहे. पाण्याच्या निचऱ्यामुळे मुळ्या सडत नाहीत. छिद्राच्या जागेवर खापर किंवा विटाचे तुकडे ठेवावेत. यानंतर पोयटा, तांबडी माती किंवा कोकोपीटने कुंडी भरावी. रासायनिक खते वापरू नयेत. रापलेले शेणखत, गांडूळखत, लेंडी खत, निंबोळी खत वापरावे. रोप लावताना रोपाची मुळे पूर्ण मोकळी करू नयेत. अलगद पिशवी काढून रोप कुंडीत लावावे, नंतर झारीने पाणी द्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com